इलेक्ट्रॉनिक कंपनी फिलिप्सने चिनी मोबाईल कंपनी शाओमीवर (Xiaomi) पेटंटचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. फिलिप्सने याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. फिलिप्सच्या पेटंटचं उल्लंघन केलेल्या शाओमीच्या सर्व स्मार्टफोन्सची भारतातील विक्री रोखण्याची मागणी फिलिप्सने कोर्टाकडे केली आहे.

काय आहे प्रकरण?
आतापर्यंत समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, शाओमीने फिलिप्सच्या UMTS एनहॅन्समेंट (HSPA, HSPA+) पेटंटचं उल्लंघन केलं आहे. त्याविरोधात फिलिप्सने शाओमीच्या काही स्मार्टफोनची विक्री, असेंबलिंग, थर्ड पार्टी वेबसाइटवरुन विक्री आणि आयात थांबवण्याची मागणी केली आहे. ‘शाओमी आपल्या स्मार्टफोनच्या काही मॉडेलमध्ये युनिव्हर्सल मोबाइल टेलीकम्यूनिकेशन सर्व्हिस म्हणजे UTMS एनहॅन्समेंट (HSPA, HSPA+) आणि LTE टेक्नोलॉजीचा वापर करत आहे, पण पेटंटनुसार या टेक्नॉलॉजीवर आमचा अधिकार आहे’ ,असं फिलिप्स कंपनीकडून कोर्टात सांगण्यात आलं.

तर, शाओमीकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान यापूर्वी २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने शाओमी आणि फिलिप्स या दोन्ही कंपन्यांना आपल्या भारतीय बँक अकाउंटमध्ये 1,000 कोटी रुपये बॅलेन्स ठेवण्याचा आदेशही दिला आहे.