मानवी मनातील प्रासंगिक भीतीचे दर्शन घडवणारे ‘फोबिया’ चित्रप्रदर्शनाचे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सादरीकरण

सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार दिनशॉ मोगरेलिया यांचे हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे २८ जून ते ४ जुलै या कालावधीत संपन्न होत आहे.

Phobia exhibition at Jehangir Art Gallery
मानवी मनातील प्रासंगिक भीतीचे दर्शन घडवणारे 'फोबिया' चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सादर (Photo : PR)

मानवी मनास वाटणार्‍या प्रासंगिक भीतीचे व त्या भीतीचे वैशिष्ट्यपूर्ण रेखाटन, वैविध्यपूर्ण आकर्षक रंगसंगती आणि कलात्मक रचना यांचा सुंदर मेळ साधणार्‍या अनोख्या ‘फोबिया’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार दिनशॉ मोगरेलिया यांचे हे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे २८ जून ते ४ जुलै या कालावधीत संपन्न होत असुन सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान सर्व कलारसिकांना विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे. या प्रदर्शनात त्यांनी जलरंग, पेन आणि कलर इंक या माध्यमांचा वापर करुन मानवी मनातील भीती, त्यांची कारणे आणि त्यापासून संभावणारे दुष्परिणाम यावर सखोल अभ्यास करुन वैशिष्ठ्यपूर्ण आणि कलात्मक शैलीचा वापर करुन सुमारे १२० अप्रतिम चित्रे सादर केली आहेत. 

आवाजाची भीती, पायऱ्यांची, वाईनची, वृद्धत्वाची तसेच प्रेमात पडण्याची भीती असणारे हेलिओफोबिया (Heliophobia), ओईनोफोबिया (Oenophobia), इलिंगोफोबिया (Illyngophobia), स्कोपोफोबिया (Scopophobia) अशा अनेक ‘फोबिया’सारख्या गहन विषयावरील चित्रसंकल्पना असून देखील त्यांची ही चित्रे डोळ्यांना सुखावणारी आहेत. सर्वच चित्रे पाहताना कोठेही रुक्षपणा जाणवत नाही, हे दिनशॉ मोगरेलियांचे मोठे यश आहे.

प्रत्येक चित्र वास्तववादी करण्यासाठी त्यांनी विविध रंग छटांचा खुबिने उपयोग केला आहे. ”मानवी मनास सलणार्‍या आणि भयप्रद वाटणार्‍या अवस्थेचे हे जणू चित्रमय सादरीकरण आहे. तेही फारच आकर्षक तर्‍हेने. लोकांना अशा तर्‍हेच्या भीतीसंबधी चित्रांमधून एक प्रकारे जागृती करणे आणि ती वस्तुस्थिती अनुभवल्यास त्यावर योग्य वेळी सकारात्मक इलाज आणि उपचार करण्याची नितांत आवश्यकता ह्यावर चित्रांतून भर देण्यात आला आहे.” अशा भावना ज्येष्ठ चित्रकार दिनशॉ मोगरेलिया यांनी व्यक्त केल्या.

दिनशॉ मोगरेलिया मूळचे नाशिकचे असून त्यांचा जन्म २१ जून १९३९ रोजी झाला. १९४७साली ते मुंबईत आले. यानंतर सर. जे.जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. १९६४ साली पदवी संपादन केल्यानंतर विविध जाहीराती, एजन्सी आणि अनेक व्यावसायिक संस्थांसाठी इलस्ट्रेशन, पेंटींग्स आणि डिझाईनिंगचे भरपूर काम केले आहे. गेली सहा दशके अविरत काम करुन त्यांनी एक सृजनशील व्यावसायिक कलाकार म्हणून नावलौकीक संपादन केला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Phobia exhibition on occasional fears in human mind presented at jehangir art gallery pvp

Next Story
फक्त चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय चांगली आहे चेरी; जाणून घ्या ‘हे’ पाच आरोग्यदायी फायदे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी