Piles Signs: मूळव्याध म्हणजेच पाइल्स ही एक सामान्य समस्या आहे. यामध्ये गुदद्वाराच्या किंवा मलाशयाच्या आसपासच्या नसांना सूज येते. बद्धकोष्ठता, शौच करताना जास्त जोर लावणे, बराच वेळ टॉयलेटमध्ये बसणे आणि आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे ही मूळव्याध होण्याची प्रमुख कारणे आहेत. मूळव्याध झाल्यावर दुखणे, खाज येणे, जळजळ होणे आणि शौचासोबत रक्त येणे अशा समस्या होतात. साधारणपणे मूळव्याधचे दोन मुख्य प्रकार असतात.
पहिला म्हणजे आतील मूळव्याध आणि दुसरा म्हणजे बाहेरील मूळव्याध. दोन्ही प्रकारांची लक्षणे आणि त्रास वेगवेगळा असतो. अशावेळी मूळव्याधाची समस्या कधी गंभीर होऊ शकते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आंतरिक मूळव्याध म्हणजे काय?
आंतरिक मूळव्याध मलाशयाच्या आतल्या नसांमध्ये होते. सुरुवातीला यामध्ये जास्त वेदना होत नाहीत. मात्र, शौच करताना ताजे लाल रक्त दिसू शकते. काही वेळा मूळव्याधच्या नसांना जास्त सूज आल्यामुळे त्या गुदद्वाराच्या बाहेर येऊ लागतात. आंतरिक मूळव्याधची तीव्रता लक्षात घेऊन त्याचे चार ग्रेडमध्ये वर्गीकरण केले जाते. सुरुवातीच्या ग्रेडमध्ये नस आतच राहतात, तर पुढील ग्रेडमध्ये त्या बाहेर येऊ लागतात. काही वेळा त्या हाताने पुन्हा आत घालाव्या लागतात.
बाहेरील मूळव्याध म्हणजे काय?
बाहेरील मूळव्याध गुदद्वाराच्या बाहेरच्या नसांना सूज आल्यामुळे होते. यामध्ये दुखणे, खाज आणि सूज जास्त जाणवते. काही वेळा नसांमध्ये रक्ताची गाठ तयार होते. याला Thrombosed Hemorrhoid असे म्हणतात. या स्थितीत अचानक खूप वेदना होऊ शकतात आणि गुदद्वाराजवळ गाठीसारखे जाणवू शकते. ही समस्या सहसा जीवघेणी नसते. मात्र, खूप वेदना होत असतील किंवा अचानक सूज आली असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
मूळव्याधमुळे जीवाला धोका होतो का?
सामान्य मूळव्याध सहसा जीवघेणी नसते. मात्र, त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करणे योग्य नाही. विशेषतः सतत किंवा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असेल, तर शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया होऊ शकतो.
तसेच, प्रत्येक वेळी शौचासोबत रक्त येण्याचे कारण मूळव्याधच असेल असे नाही. गुदद्वाराला भेग पडणे (फिशर), आतड्यांशी संबंधित इतर आजार आणि काही वेळा कॅन्सरमुळेही रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर ते फक्त मूळव्याध आहे असे समजून स्वतःहून उपचार करणे योग्य नाही.
डॉक्टरांना कधी दाखवावे?
गुदद्वारातून सतत किंवा जास्त प्रमाणात रक्त येत असेल, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवत असेल, बेशुद्ध पडल्यासारखे वाटत असेल, खूप वेदना होत असतील किंवा काळ्या रंगाची शौच होत असेल, तर लगेच डॉक्टरांची मदत घ्यावी.
तसेच, अनेक दिवसांपासून बद्धकोष्ठता, दुखणे, खाज किंवा शौचासोबत रक्त येण्याची समस्या सुरू असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे चांगले.
मूळव्याध टाळण्यासाठी बद्धकोष्ठता होऊ न देणे सर्वात महत्त्वाचे आहे. आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि डाळी यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. पुरेसे पाणी प्या आणि शौच करताना जास्त जोर लावू नका.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
