Piles Treatment: मुळव्याध ही गुदद्वाराशी संबंधित समस्या आहे. यामध्ये गुदद्वाराच्या आत किंवा बाहेर मांसाची गाठ तयार होऊ लागते. त्यामुळे व्यक्तीला खूप वेदना होऊ शकतात आणि शौच करतानाही त्रास होतो. अनेक लोक मुळव्याधाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करत राहतात. लाज, संकोच किंवा माहितीच्या अभावामुळे ते उपचार घेत नाहीत. त्यामुळे मुळव्याधाचा त्रास हळूहळू गंभीर होऊ शकतो.

अनेकदा लोक मुळव्याध झाल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा इतरांकडून ऐकून देशी उपचार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्रास कमी होण्याऐवजी तो आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या रिपोर्टमध्ये मुळव्याध म्हणजे काय, तो कशामुळे होतो, त्याचे निदान कसे केले जाते आणि त्यावर योग्य उपचार कोणते आहेत, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला मुळव्याधाचा त्रास होत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.

मुळव्याध म्हणजे काय आणि यामध्ये काय होते?

आपल्या सर्वांच्या गुदाशयामध्ये म्हणजेच गुदद्वाराच्या भागात नसांचा एक समूह असतो. या नसांचा समूह मलाशय आणि गुदद्वाराच्या आतील भागाला झाकणाऱ्या श्लेष्मल त्वचेच्या थरात असतो. जेव्हा या नसा सुजतात आणि बाहेर येऊ लागतात, तेव्हा त्याला हेमोरॉइड्स किंवा मुळव्याध म्हणतात.

मुळव्याधचे मुख्यतः दोन प्रकार असतात. एक म्हणजे इंटर्नल हेमोरॉइड्स आणि दुसरा म्हणजे एक्सटर्नल हेमोरॉइड्स.

इंटर्नल हेमोरॉइड्स गुदद्वाराच्या आत तयार होतात, तर एक्सटर्नल हेमोरॉइड्स गुदद्वाराच्या बाहेर येतात आणि त्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते. यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते तसेच त्वचा कापली किंवा सोलली जाऊ शकते. जर बाहेर आलेल्या मुळव्याधमध्ये रक्ताची गाठ म्हणजेच ब्लड क्लॉट तयार झाला, तर अचानक आणि तीव्र वेदना होऊ शकतात. एक्सटर्नल हेमोरॉइड्समध्ये गुदद्वाराच्या आसपास गाठ किंवा उंचवटा जाणवू शकतो.

इंटर्नल हेमोरॉइड्समध्ये नेहमी वेदना होतीलच असे नाही. रक्तस्राव झाला तरी वेदना होणे आवश्यक नाही. शौच केल्यानंतर रक्त दिसू शकते किंवा टॉयलेट पेपरवर रक्ताचे डाग दिसू शकतात. इंटर्नल हेमोरॉइड्स बाहेर येऊ शकतात किंवा गुदद्वारातून पुढे वाढू शकतात. त्यामुळे त्रास आणखी वाढू शकतो.

मुळव्याध का होतो?

बहुतेक वेळा जुनाट बद्धकोष्ठतेमुळे, म्हणजेच सतत किंवा वारंवार होणाऱ्या बद्धकोष्ठतेमुळे मुळव्याध होऊ शकतो. यामध्ये शौच करताना जास्त जोर द्यावा लागतो. तसेच बराच वेळ टॉयलेटमध्ये बसून राहावे लागते. यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि रक्त साचू लागते. त्यामुळे गुदद्वारातील नसा फुगू लागतात आणि त्यांचा आकार वाढतो.

याच कारणामुळे गर्भावस्थेदरम्यान महिलांना मुळव्याधचा त्रास अनेकदा होतो. कारण गर्भाशयाचा नसांवर सतत दबाव पडत असतो.

मुळव्याध आहे हे कसे समजते?

मुळव्याध झाल्यास शौच करताना रक्त दिसू शकते आणि वेदनाही होऊ शकतात. अशी लक्षणे दिसल्यास जनरल फिजिशियन, जनरल सर्जन, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, प्रोक्टोलॉजिस्ट किंवा कोलोरेक्टल सर्जन यांच्याशी संपर्क साधता येतो.

डॉक्टर रुग्णाची वैद्यकीय माहिती जाणून घेतात आणि शारीरिक तपासणी करून मुळव्याध आहे की नाही हे तपासतात. केवळ तपासणी करून मुळव्याध स्पष्टपणे समजत नसेल, तर डिजिटल रेक्टल एग्झामिनेशन केले जाऊ शकते. यामध्ये मलामध्ये रक्त आहे की नाही हे तपासले जाते.

तसेच एनोस्कोप नावाच्या उपकरणाच्या मदतीने गुदद्वाराच्या आतील भागाची तपासणी केली जाऊ शकते. जर गुदद्वारातून रक्त येत असेल आणि त्यामागे मुळव्याध हे कारण नसेल, तर इतर कारण शोधण्यासाठी कोलोनोस्कोपी केली जाऊ शकते.

मुळव्याध कसा बरा होतो?

फायबरचे सेवन

मुळव्याधमध्ये औषधे किंवा शस्त्रक्रियेसोबतच जीवनशैली आणि आहारात बदल करणेही खूप महत्त्वाचे असते. डॉक्टरांकडून तपासणी करून औषधे घेतल्यानंतर घरी काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

रुग्णाला आहारातून फायबर घेण्याचा सल्ला दिला जातो. फायबरयुक्त पदार्थांमुळे मल मऊ होतो आणि शौच करणे सोपे होते. त्यामुळे ब्रोकोली, बीन्स, ओट ब्रान, पूर्ण धान्य आणि ताजी फळे खाऊ शकता.

शौच करण्यास उशीर करू नका

जर शौचाला होण्याची इच्छा होत असेल किंवा शौचाचा दबाव जाणवत असेल तर बाथरूमला जाण्यास उशीर करू नका. लगेच शौचाला जावे. यामुळे मलाशय आणि गुदद्वारावर जास्त दबाव पडणार नाही.

सिट्झ बाथ

मुळव्याधमध्ये डॉक्टर सिट्झ बाथ घेण्याचा सल्ला देऊ शकतात. यामध्ये मोठ्या टबमध्ये किंवा बाथटबमध्ये कोमट पाणी आणि डॉक्टरांनी सांगितलेले औषध टाकून त्यात बसले जाते. यामुळे शरीराच्या खालच्या भागाला उब मिळते.

सिट्झ बाथमुळे खाज, जळजळ आणि वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. मुळव्याधामध्ये साधारण २० ते २५ मिनिटे सिट्झ बाथ घेण्याचा सल्ला दिला जातो.

मुळव्याधमध्ये कोणते उपचार किंवा प्रक्रिया केल्या जातात?

मुळव्याधाचा त्रास खूप गंभीर असेल आणि औषधे किंवा जीवनशैलीतील बदल करूनही तो कमी होत नसेल, तर डॉक्टर शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय प्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात.

यामध्ये मुळव्याधासाठी बँडिंग तंत्राचा वापर केला जाऊ शकतो. या प्रक्रियेमध्ये मुळव्याधच्या गाठीला एका बँडने बांधले जाते. त्यामुळे काही आठवड्यांमध्ये ती गाठ सुकून निघून जाऊ शकते. याशिवाय हेमोरॉइडेक्टॉमी आणि स्टेपलिंग यांसारख्या वैद्यकीय प्रक्रियाही मुळव्याधच्या उपचारासाठी केल्या जाऊ शकतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)