नियोजन आहाराचे : खोकला

खोकल्याची ढास थांबत नसेल तर एक कप गरम पाण्यात एक चमचा तिळाचे तेल घ्यावे. एक चमचा लोणी पातळ करून घ्यावे हळूहळू चाटावे, त्यानेही ढास थांबते.

– डॉ. अरुणा टिळक

खोकल्याची ढास रात्रीच्यावेळी जर लागली, तर अख्खे घर बेचैन होते. त्यापासून बचाव कसा करावा हे बघू या. ओला (कफयुक्त) व सुखा खोकला असे दोन प्रकार आहेत. बऱ्याच वेळा छोट्याशा आजारावर स्ट्राँग औषधे दिल्याने अ‍ॅलर्जीसारखा खोकला होतो. अशा वेळी ते औषध बंद करावे.

जेवणात गरम पाणी, हळद-दूध घ्यावे. अति तेलकट, शेंगदाण्याचे, डालड्याचे (खारी/नानकटाई) पदार्थ, मिठाई अति खाण्यात आल्यास घसा जड होतो, चिकट कफयुक्त खोकला होतो. अशा वेळी हे पदार्थ बंद करावेत. ग्लासभर गरम पाण्यात दोन लवंगा, दोन मिरी, थोडे ज्येष्ठ मध तुकडा घालून उकळवावे. असे गरम पाणी थोडे- थोडे प्यावे. गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. भूक लागेल तेव्हाच जेवण घ्यावे. खोकला झाला की अन्नाची इच्छा कमी होते. अशा वेळी गरम ताजे अन्न घ्यावे.

खोकल्याची ढास थांबत नसेल तर एक कप गरम पाण्यात एक चमचा तिळाचे तेल घ्यावे. एक चमचा लोणी पातळ करून घ्यावे हळूहळू चाटावे, त्यानेही ढास थांबते.

द्राक्ष, डाळिंब, मनुका या फळांचा चांगला फायदा होतो, तर पेरू, सीताफळ, केळी अशी फळे टाळावीत. संध्याकाळचे जेवण लवकर घ्यावे. ज्वारीची भाकरी, अळशीची चटणी त्यावर तिळाचे तेल घ्यावे. कोहळ्याची, दुधीची भाजी पथ्याच्या आहेत त्या खाव्यात. कोरफड भाजून त्यातला गर काढून तुकडे करावेत. त्यावर हळद, मध घालून लोणचे करावे. एक छोटा चमचा दोन वेळा खावे. ओल्या हळदीचा कीस, सैंधव असे लोणचे उपयोगी पडते.

कोरडा खोकला कशाने थांबत नाही यावेळी बकुळीच्या फुलांचा रस खडीसाखरेबरोबर घ्यावा. मोहोरीच्या तेलात सैंधव घालून ते छातीला लावावे आणि शेकवावे. लहान मुलांना खोकला असेल तर अळशी भाजून त्याची पुरचुंडी बांधून त्याने छाती, पाठ शेकवावी. अळशी भाजून त्यात पाणी घालून झाकून ठेवावे. दोन दोन चमचे पाणी पाजावे, त्याने कफ पातळ होतो. लहान मुलांची छाती कफाने भरलेली असल्यास लसणाची माळ गळ्यात घालावी, कफ पडून जातो. गवती चहा, तुळशीची पाने पाण्यात उकळून घेणे. लवंग, खडीसाखर चघळावी खोकला कमी होतो. कंकोळ घ्यावा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने वरील उपाय करावेत.

arunatilak@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Planning diet cough phlegmatic strong drugs akp

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या