Kitchen Ingredient for Plants: उन्हाळा सुरू झाला की घरातील कुंड्यांमधील रोपांची काळजी घेणे आणखी महत्त्वाचे ठरते. वाढत्या तापमानामुळे अनेकदा रोपांची पाने करपलेली दिसतात. काही रोपांची वाढ थांबते, तर काही झाडे हिरवीगार असूनही त्यांना ना फुलं येतात ना फळं. अनेक बागप्रेमी या समस्येमुळे चिंतेत असतात. भरपूर पाणी, महागडी खते आणि विविध औषधे वापरूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
विशेष म्हणजे या समस्येचे कारण अनेकदा रोपांमध्ये पोषणाची कमतरता नसते, तर त्यामागे मातीची बिघडलेली स्थिती असू शकते. अनेकांना वाटते की जास्त खत आणि जास्त पाणी दिल्याने रोपांची वाढ झपाट्याने होईल. मात्र, वास्तवात अनेकदा याच अति काळजीचा फटका रोपांना बसत असतो.
उन्हाळ्यात माती सतत ओलसर राहिल्यास मुळांजवळ बुरशी निर्माण होण्याची शक्यता वाढते. सुरुवातीला ही समस्या दिसून येत नाही, मात्र हळूहळू मुळांची ताकद कमी होऊ लागते. त्यानंतर कीटक आणि विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. परिणामी रोपांना मिळणारे पोषण या अनाहूत पाहुण्यांकडे वळते आणि झाडांची वाढ खुंटू लागते.
अनेकदा बागकामाची आवड असलेले लोक रोपांच्या पानांकडे पाहून उपाय शोधतात. पण, खरी समस्या जमिनीखाली सुरू असते; त्यामुळे रोपे बाहेरून हिरवीगार दिसत असली तरी त्यांची फुलधारणा कमी होते. काही वेळा फुलांच्या कळ्या येऊनही गळून पडतात, यामुळे बागकाम करणाऱ्यांची निराशा वाढते.
मात्र अनुभवी बागप्रेमी सांगतात की, या समस्येवर उपाय शोधण्यासाठी महागडी उत्पादने खरेदी करण्याची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली एक साधी वस्तू यामध्ये उपयुक्त ठरू शकते. विशेष म्हणजे हा पदार्थ जवळपास प्रत्येक घरात असतो. अनेक वर्षांपासून स्वयंपाकात वापरला जाणारा हा घटक रोपांच्या देखभालीतही उपयोगी ठरू शकतो, असे काही बागकाम तज्ज्ञांचे मत आहे.
हा उपाय करताना प्रमाणाचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण कोणतीही गोष्ट अति प्रमाणात वापरल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. माती हलकी करून, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात हा उपाय केल्यास रोपांना फायदा होऊ शकतो.
यासाठी सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडण्याचा सल्ला दिला जातो. कडक उन्हात कोणतेही द्रावण वापरल्यास त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. उलट पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन रोपांपर्यंत आवश्यक घटक पोहोचत नाहीत.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असा कोणता पदार्थ आहे जो स्वयंपाकघरात सहज मिळतो आणि रोपांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो?
येथे पाहा व्हिडीओ
याचे उत्तर आहे – हिंग.
काही बागकाम तज्ज्ञांच्या मते, एक लिटर पाण्यात केवळ चिमूटभर हिंग मिसळून ते साधारण एक ते दीड तास तसेच ठेवावे. त्यानंतर हे पाणी फवारणीसाठी वापरता येऊ शकते. तसेच ते प्रत्येक रोपाच्या मुळाशी थोड्या प्रमाणात घालण्याचाही सल्ला दिला जातो.
कोरडा हिंग वापरत असाल तर माती हलकी उकरून चिमूटभर हिंग सर्व बाजूंनी पसरवावा. मात्र, प्रमाण मर्यादित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात रोपांची काळजी घेताना हा सोपा उपाय अनेक बागप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अर्थात प्रत्येक रोपाची गरज वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करताना निरीक्षण आणि योग्य प्रमाण याला सर्वाधिक महत्त्व द्यावे.
