Flowers Plants Fertlizer: पावसाचा सीझन असला तरी आता उकाडा वाढत आहे. तुमच्या बाल्कनीत किंवा खिडकीत छोट्याश्या कुंडीत लावलेल्या रोपांची अधिक काळजी घेण्याची आता वेळ झाली आहे. आपल्याकडे खरंतर एक प्रेमळ पण चुकीचा समज असा असतो की जितकं जास्त खाऊ घालाल तितकी सुदृढथा वाढते.
रोपांच्या बाबत सुद्धा हाच नियम काहीजण लागू करतात. खतच नाही तर अनेकदा रोपांमध्ये भरपूर पाणी घातलं जातं, बरं का मंडळी असं केल्याने सततचा ओलावा हा बुरशीच्या वाढीला कारणीभूत ठरू शकतो. रोपांच्या मुळाशी बुरशी लागल्यास कीटक- किडे सुद्धा वाढू शकतात आणि यामुळे रोपांच्या वाट्याचं पोषण सुद्धा नष्ट होतं. आज आपण ही बुरशी लागू नये यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत. यासाठी आपल्याला किचनमधील हिंगाची डबी कामी येणार आहे.
SP गार्डनिंग मराठी या युट्यूब चॅनेलवर हिंगाचा वापर करून रोपांसाठी आवश्यक खत पाणी कसे तयार करता येईल अशी माहिती दिलेली आहे. आधी ही पद्धत पाहूया व मग काही महत्त्वाचे नियम सुद्धा जाणून घेऊया.
हिंगाचा वापर रोपांसाठी कसा कराल?
- १ लिटर पाण्यासाठी एक चिमूटभर हिंग पुरेसे आहे.
- साधारण १ ते दीड तास हे पाणी तसेच ठेवावे.
- हिंगाचे सत्व पाण्यात उतरल्यावर पाण्याचा रंग हलका पिवळा होईल.
- आपल्याला सर्वप्रकारच्या रोपांवर स्प्रे बॉटलने या पाण्याची फवारणी करता येऊ शकते.
- स्प्रे करून झाल्यावर आपण प्रत्येक रोपाला लहान आकाराचा एक ग्लासभर असे हे पाणी घालू शकता.
जर आपण कोरड्या हिंगाचा वापर करणार असाल तर आधी माती नीट उकरून रोपांच्या जवळ चिमूटभर हिंग घालू शकता. हिंग एकाच ठिकाणी टाकून ठेवू नका, नीट पसरवून रोपांना सर्व बाजूंनी हिंग लागेल असे पाहा.
हिंगाचा वापर करताना काय लक्षात ठेवावे?
हिंग हे प्रमाणातच वापरा, अतिरेक वाईटच हे लक्षात ठेवा. हिंगाचे पाणी घालताना माती कोरडी असेल आणि पाणी घालण्याआधी तुम्ही माती थोडी हलवून वर खाली केलेली असेल याची खात्री करा. खरंतर दर १५ दिवसांनी माती थोडी हलवत राहणे रोपांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
