Plastic Free Health Challenge : सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारे प्लास्टिकचा वापर करत असतो; पण तुम्हाला माहितेय का, हे प्लास्टिक केवळ कचराच करत नाही, तर ते आपल्या रक्तप्रवाहात आणि अवयवांपर्यंतही पोहोचतेय. अलीकडील एका संशोधनातून असे दिसून आले की, प्लास्टिकमधून बाहेर पडणारी रसायने (जसे की, बीपीए व थॅलेट्स आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रणालींना नुकसान पोहोचवत आहेत. त्यावर डॉ. तरंग कृष्ण यांनी १४ दिवस प्लास्टिकचा वापर न केल्यास शरीरात काय परिणाम दिसतील यावर सविस्तर माहिती दिली आहे.
१) पहिल्या ३ दिवसांत शरीरातील विषारी घटकांचे निर्मूलन
तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणे बंद करताच, तुमच्या शरीरात नवीन रसायने प्रवेश करणे थांबते. पहिल्या तीन दिवसांतच तुमचे मूत्रपिंड आणि यकृत हे अवयव तुमच्या रक्तातील जुने विषारी घटक काढून टाकण्यास सुरुवात करतात. मग त्यामुळे तुम्हाला पूर्वीपेक्षा हलके वाटू लागते.
२) सातव्या दिवसापर्यंत हार्मोन्सची पातळी स्थिर
प्लास्टिकमधील रसायने आपल्या शरीरातील अंतःस्रावी प्रणालीमध्ये व्यत्यय आणतात, ज्यामुळे तणाव आणि चिडचिड वाढते. एक आठवडा प्लास्टिकमुक्त जीवनशैली जगल्याने हार्मोन्सची पातळी स्थिर होऊ शकते आणि महिलांमधील पीसीओडी (PCOD) व पुरुषांमधील थायरॉईडच्या समस्यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
३) दहाव्या दिवशी पचनक्रियेत सुधारणा
प्लास्टिकच्या भांड्यात गरम केलेले अन्न खाल्ल्याने त्यातून बाहेर पडणारी रसायने पोटाच्या आतील आवरणाला नुकसान पोहोचवतात. १० दिवस काचेची किंवा स्टीलची भांडी वापरल्याने पचनमार्गातील दाह कमी होतो. त्यामुळे गॅस आणि आम्लपित्तापासून आराम मिळतो आणि चयापचय क्रिया वेगवान होते.
४) बाराव्या दिवशी त्वचेला नवी नैसर्गिक चमक
जेव्हा तुमच्या शरीरातील विषारी प्लास्टिकचे कण कमी होतात, तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या त्वचेवर थेट दिसतात. रक्त शुद्ध झाल्यामुळे मुरमे कमी होतात आणि तुमच्या त्वचेला नवी चमक येते. तुमच्या झोपेची गुणवत्ताही सुधारते.
५) १४ दिवसांनंतर शरीराचे पुनरुज्जीवन
दोन आठवड्यांच्या अखेरीस तुमचे शरीर ‘क्लीन मोड’मध्ये येते. संशोधनानुसार १४ दिवसांच्या विश्रांतीमुळे शरीरातील बीपीएची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. तुमची रोगप्रतिकार शक्ती आता अधिक मजबूत आणि संसर्गांशी लढण्यास अधिक सक्षम होते.
