आठवडय़ातून दोन ते तीन तास फुटबॉल खेळल्यामुळे महिलांच्या उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे शरीरातील अतिरिक्त मेद घटविणे, हाडांची मजबुती आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठीही हा इलाज प्रभावी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. दक्षिण डेन्मार्कमधील अध्यापक पीटर क्रस्ट्रप यांनी महिलांनी फुटबॉल खेळल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर त्याचा होणारा सकारात्मक परिणाम याबाबत संशोधन मांडले आहे. ज्या महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, अशा महिलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केल्यानेही त्यांच्या प्रकृतीला ते अत्यंत लाभदायक ठरत असल्याचे क्रस्ट्रप यांनी स्पष्ट केले. फुटबॉल खेळल्याने होणारे फायदे दीर्घकालीन असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील १४ वर्षांपासून याबाबत संशोधन सुरू आहे. रुग्णाचा आजार दूर किंवा कमी करण्याच्या दृष्टीने फुटबॉलचा वापर कसा करता येईल याद्वारे हा प्रयोग करण्यात आला.

फुटबॉल प्रशिक्षणाच्या माध्यमातून शारीरिक क्षमतांच्या विकासास मदत होते, त्याचप्रमाणे हृदयरोग आणि तत्सम आजार दूर राखले जाण्यासही मदत होत असल्याचे क्रस्ट्रप यांनी स्पष्ट केले. ३५ ते ५० या वयोगटातील उच्च रक्तदाब असलेल्या ३१ महिलांची निवड करून त्यांना आठवडय़ातून तीन वेळा एक तासाचे फुटबॉल प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील १९ महिलांचा उच्च रक्तदाबाचा त्रास कमी झाल्याचे स्पष्ट झाले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)