PM Modi Mann Ki Baat Amla Benefits : रविवारी ‘मन की बात’च्या १३८ व्या भागात देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आवळ्याच्या फायद्यांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, आपले पूर्वज पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांबद्दल सांगत आले आहेत. आवळ्याचे लोणचे, मोरंबा, रस आणि च्यवनप्राश आपल्या घरांमध्ये शतकानुशतके वापरले जात आहे. हाच आवळा आता उत्तर प्रदेशातील प्रतापगडची नवी ओळख बनत आहे. तेथील शेतकरी आणि महिलांसाठी आवळ्याची शेती रोजगाराच्या आणि आर्थिक प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करत आहे.
आवळ्यामध्ये पोषक घटकांचा खजिना
आवळ्यामध्ये असणारे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. आयुर्वेदात आवळ्याचा अनेक प्रकारे वापर केला जातो. आवळा हा प्रामुख्याने व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सच्या भरपूर प्रमाणासाठी ओळखला जातो. १०० ग्रॅम आवळ्यामध्ये एका संत्र्यापेक्षा तब्बल २० पट जास्त व्हिटॅमिन सी असते.
आवळ्यापासून शरीरास होणारे फायदे
- व्हिटॅमिनचा खजिना: आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. याशिवाय यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर आणि इतर महत्त्वाची जीवनसत्त्वे व खनिजे आढळतात.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते: आवळ्याचे सेवन केल्याने शरीर आतून मजबूत बनते. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडत नाही आणि सर्दी, खोकला व फ्लू सारख्या संसर्गांपासून शरीराचा बचाव होतो.
- पचनक्रिया सुधारते: आवळा खाल्ल्याने शरीरातील फायबरची कमतरता भरून निघते. आवळा पाचक एन्झाईम्सना चालना देतो आणि बद्धकोष्ठतेची (कांस्टिपेशन) समस्या दूर करतो. यामुळे पोट फुगणे कमी होते आणि पोट नैसर्गिकरीत्या थंड राहून ॲसिडिटी नियंत्रणात राहते.
- त्वचा तरुण ठेवते: आवळा त्वचेसाठीही अतिशय गुणकारी आहे. यातील अँटी-ऑक्सिडंट्स अँटी-एजिंगचे काम करतात. याच्या नियमित सेवनाने अकाली वृद्धत्वाची समस्या कमी होते आणि त्वचा चमकदार बनते.
- केसांसाठी फायदेशीर: आवळ्याच्या वापरामुळे केस अकाली पांढरे होण्यापासून रोखता येतात. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि कोंडा (डँड्रफ) कमी होण्यास मदत होते.
- डायबिटीजवर नियंत्रण: आवळ्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. आवळ्यामध्ये ‘क्रोमियम’ नावाचे खनिज असते, जे पेशींना इन्सुलिनप्रती अधिक सक्रिय बनवते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमधील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
- हृदयासाठी उपयुक्त: आवळा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. याने वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तभिसरण सुरळीत राहते आणि धमण्यांमध्ये अडथळा (ब्लॉक) निर्माण होण्याचा धोका कमी होतो.
- आयर्न शोषून घेण्याची क्षमता वाढवते: जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करता, तेव्हाच शरीरात लोह (आयर्न) योग्य प्रकारे शोषले जाते. पालक, राजमा किंवा नाचणी यांसारख्या लोहयुक्त पदार्थांसोबत आवळा खाल्ला तर शरीरात आयर्नचे अवशोषण मोठ्या प्रमाणावर वाढते.
आवळा कसा खावा?
आवळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता. बहुतेक लोक आवळ्याचा ज्यूस पिणे पसंत करतात. ताज्या आवळ्याचा रस काढून पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. याव्यतिरिक्त तुम्ही आवळ्याची चटणी, मोरंबा, लोणचे किंवा आवळा पावडरचे देखील सेवन करू शकता.
