Pomegranate Health Benefits : डाळिंबाला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते. त्याच्या जास्त किमतीमुळे, हे फळ काही लोकांच्या खिशाला जड जाऊ शकते. पण तुम्हाला माहीत आहे का की, डाळिंब महाग असले तरी आरोग्यासाठी एक मौल्यवान फळ आहे. एक डाळिंब एकाच वेळी अनेक आजारांवर उपचार करू शकते. त्याचे सेवन केल्याने अतिसार, अन्नजन्य संसर्ग आणि ॲनिमियावर उपचार होण्यास मदत होते. अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की, डाळिंबाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि उलट्या, अतिसार व ताप टाळता येतो. डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, प्रत्येक फळ किंवा सुपरफूड प्रत्येकाच्या शरीरप्रकाराला अनुकूल नसते?

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. रूपाली जैन सांगतात की, डाळिंब आरोग्यासाठी फायदेशीर आहे; परंतु त्याचे सर्व फायदे प्रत्येकालाच मिळतील, असे नाही. चला, तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की, डाळिंबामुळे शरीराला कोणते फायदे मिळतात आणि कोणत्या लोकांनी त्याचे सेवन टाळावे.

आयुर्वेदात डाळिंबाला एक स्वादिष्ट फळ का मानले जाते?

आयुर्वेदात डाळिंबाला रुचकर फळ मानले जाते. याचा अर्थ असा की, ते भूक आणि अन्नाची चव वाढवण्यास मदत करू शकते. ज्यांना भूक कमी लागते, त्यांच्यासाठी डाळिंबाचे सेवन करणे विशेषतः फायदेशीर ठरते.

ॲनिमिया आणि कमी हिमोग्लोबिनसाठी डाळिंब उत्तम!

डाळिंब रक्तवर्धक मानले जाते. त्यामुळे ॲनिमिया किंवा कमी हिमोग्लोबिनचा त्रास असलेले लोक त्याचा आहारात समावेश करू शकतात. तथापि, ॲनिमियाच्या उपचारासाठी केवळ डाळिंबावर अवलंबून राहू नये; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे.

भूक आणि जुलाब कमी करण्यासाठी प्रभावी

आयुर्वेदानुसार, ग्रहणी व्याधीसारख्या स्थितींमध्येही डाळिंबाचे सेवन प्रभावी ठरते. आयुर्वेदानुसार, जेव्हा पचनशक्ती कमकुवत झाल्यामुळे भूक लागत नाही किंवा वारंवार शौचास जावे लागते, तेव्हा डाळिंबाचे सेवन गुणकारी ठरते.

रक्तस्रावाच्या समस्यांमध्येही उपयुक्त

आयुर्वेदात, डाळिंबाचे सेवन रक्तपित्तासारख्या स्थितींमध्येदेखील प्रभावी आहे, ज्यामध्ये मूळव्याधीतून रक्तस्राव, नाकातून रक्त येणे किंवा महिलांमध्ये मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे यांचा समावेश होतो.

आम्लपित्त असल्यास खा गोड डाळिंब

ज्या लोकांना आम्लपित्ताचा त्रास होतो, ते डाळिंबाचे सेवन करू शकतात. डॉक्टर आम्लपित्ताच्या रुग्णांना आंबट डाळिंबाऐवजी गोड डाळिंब खाण्याचा सल्ला देतात.

स्मरणशक्तीसाठी एक टॉनिकसुद्धा

डाळिंब बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठीदेखील प्रभावी मानले जाते. त्याचे सेवन केल्याने विस्मृतीवर उपचार होण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते.

दिवसभरात किती डाळिंब खावे?

एका वेळी अर्धे ते एक डाळिंब खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याव्यतिरिक्त, तुम्ही डाळिंबाचा अंदाजे ३०-४० मिलिलिटर रस पिऊ शकता.

डाळिंब कोणी खावे?

  • आयुर्वेदात डाळिंबाला दीपक आणि रुचिकर म्हटले आहे म्हणजेच ते पचनशक्ती आणि भूक वाढवते. ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांनी डाळिंबाचे सेवन करावे.
  • ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर आहे, त्यांनी गोड पिकलेले डाळिंब खावे.
  • ज्यांना अतिसार किंवा वारंवार पातळ शौचास होण्याची प्रवृत्ती आहे, त्यांनी डाळिंबाचे सेवन करावे. डाळिंब हे मल घट्ट करणारे फळ मानले जाते.
  • पित्ताच्या समस्या असलेले लोक गोड डाळिंबाचे सेवन करू शकतात. आम्लपित्ताचा त्रास असलेल्यांसाठीही गोड डाळिंब गुणकारी आहे.

कोणी डाळिंब खाऊ नये?

  • बद्धकोष्ठता असलेल्या लोकांनी डाळिंब खाणे टाळावे. डाळिंब हे रेचक मानले जाते म्हणजेच ते मल घट्ट करते, त्यामुळे बद्धकोष्ठता असल्यास ते टाळावे.
  • जर तुम्हाला छातीत जास्त जळजळ आणि पोटात आम्लपित्ताचा त्रास होत असेल, तर डाळिंब खाणे टाळा.
  • ज्यांना डाळिंबाची ॲलर्जी आहे किंवा ते खाल्ल्यानंतर पोट फुगण्याचा त्रास होतो, त्यांनी त्याचे सेवन टाळावे.