Blood Pressure Control: रक्तदाब असो वा कोलेस्ट्रॉल, हृदयाशी संबंधित समस्या सध्या अनेकांच्या चिंतेचा विषय बनल्या आहेत. अशा वेळी आपल्या ताटात नेमकं काय असावं, याकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आहारातील काही पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. एका डॉक्टरने अशाच एका फळाची माहिती दिली असून,, त्याचा नियमित आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे हे फळ दिसायला साधं असलं तरी त्यातील काही पोषक घटक हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.

हृदयासाठी कोणतं फळ ठरू शकतं फायदेशीर?

डॉ. शालिनी सिंह सालुंके यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे हृदयाच्या आरोग्यासाठी एका फळाचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या मते, हृदय सक्षम ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्या एका उदाहरणाद्वारे या फळाचे महत्त्व समजावून सांगतात.

डॉक्टरांच्या मते, जसं एखाद्या वाहनाचं इंजिन सुरळीत चालण्यासाठी योग्य दर्जाचं इंजिन ऑईल आवश्यक असतं, त्याचप्रमाणे शरीरातील हृदयाचं कार्य सुरळीत राहण्यासाठीही काही आवश्यक पोषक घटकांची गरज असते. या फळातून असे काही पोषक घटक मिळू शकतात.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत?

डॉ. शालिनी सिंह सालुंके यांच्या माहितीनुसार, या फळामध्ये प्युनिकालाजिन आणि नायट्रेट्स यांसारखे घटक आढळतात. हे घटक रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीतपणे चालू राहावे यासाठी आधार देण्यास मदत करू शकतात.

रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत राहिल्यास रक्तप्रवाहासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या फळाचे सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास सहायक ठरू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, केवळ एखाद्या फळाच्या सेवनावर रक्तदाब नियंत्रण अवलंबून नसते. रक्तदाब नियंत्रित राहावा यासाठी आहार, व्यायाम, झोप आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे या घटकांचाही तितकाच विचार केला जाणे आवश्यक आहे.

कोलेस्ट्रॉलसाठीही उपयुक्त?

या फळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिऑक्सिडंट्स आढळतात. विशेषतः अँथोसायनिन्स आणि इतर पॉलीफेनॉल्स यांचा त्यात समावेश होतो, असे डॉ. शालिनी सिंह सालुंके यांनी नमूद केले आहे.

डॉक्टरांच्या मते, हे घटक LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सिडेशनची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये थर म्हणजेच प्लाक तयार होण्याचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते. रक्तप्रवाह सुरळीत राहणे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे

हृदयाच्या आरोग्याचा संबंध केवळ हृदयाप्रमाणेच रक्तवाहिन्यांच्या आरोग्याशीही असतो. डॉ. शालिनी यांच्या मते, या फळातील पोषक घटक रक्तवाहिन्यांच्या आतील थराला म्हणजेच एंडोथीलियमला आधार देण्यास मदत करू शकतात.

रक्तवाहिन्यांचे कार्य चांगले राहिल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाच्या एकूण आरोग्यासाठी ‘या’ फळाचा आहारातील समावेश उपयुक्त ठरू शकतो.

शरीरातील सूज कमी करण्यास मदत?

‘या’ फळामध्ये असलेले पॉलीफेनॉल्स शरीरातील दीर्घकाळ टिकणारी सूज म्हणजेच दाह कमी करण्यास मदत करू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. दीर्घकाळ राहणारा दाह, उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांच्या आतील थराच्या कार्यातील बिघाड यांचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे आहारातून मिळणारे प्रतिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

मग हे फळ नेमकं कोणतं?

आता या फळाचा खुलासा करूया. बाहेरून कडक साल आतमध्ये असंख्य लालसर दाणे आणि प्रत्येक दाण्यात भरलेला रस जणू लाल माणकांनी भरलेलं छोटंसं भांडंच! या लालसर दाण्यांमुळे याला अनेकांच्या आहारात विशेष स्थान मिळालं आहे.

हे फळ म्हणजे डाळिंब

डॉ. शालिनी सिंह सालुंके यांच्या माहितीनुसार, डाळिंबामध्ये आढळणारे पॉलीफेनॉल्स, अँथोसायनिन्स, प्यूनिकालाजिन व नायट्रेट्स यांसारखे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे डाळिंबाचा हंगाम असताना त्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

(महत्त्वाची टीप : डाळिंब हे संतुलित आहाराचा भाग म्हणून उपयुक्त ठरू शकते; मात्र रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकारावर उपचार म्हणून केवळ त्यावर अवलंबून राहू नये. आधीपासून आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला आणि निर्धारित उपचार सुरू ठेवणे आवश्यक आहे.)