Pomegranate vs Apple Which Is Better for Heart Health: हृदय सक्षम ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबाबत अनेक जण जागरूक असतात. विशेषतः फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. सफरचंद आणि डाळिंब ही दोन्ही फळे चवीला उत्तम असण्यासोबतच अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहेत. त्यामध्ये तंतू, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. हे घटक हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकतात. मात्र, जेव्हा हृदयाच्या आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा सफरचंद आणि डाळिंब यांपैकी नेमके कोणते फळ अधिक फायदेशीर ठरते? एका फळामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करणारे घटक अधिक आहेत; तर दुसरे फळ कोलेस्ट्रॉल आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चला तर मग, या दोन्ही फळांमधील पोषक घटकांची तुलना जाणून घेऊया.
हृदयाच्या आरोग्यासाठी सफरचंद की डाळिंब?
सफरचंद आणि डाळिंब या दोन्ही फळांचा संतुलित आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. दोन्ही फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, तंतू आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक हृदयविकारांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
डाळिंबाचे फायदे : डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. त्यातील पॉलीफेनॉल्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. काही संशोधनांमध्ये डाळिंबाच्या सेवनाचा रक्तदाब कमी होणे, शरीरातील दाह कमी होणे आणि हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह सुधारण्याशी संबंध आढळला आहे.
सफरचंदाचे फायदे : सफरचंदामध्ये तंतू आणि विविध प्रकारचे पॉलीफेनॉल्स असतात. नियमित सेवनामुळे एकूण कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते. त्याशिवाय रक्तवाहिन्यांचे कार्य, रक्तदाब आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासही सफरचंद उपयुक्त ठरू शकते.
दोन्ही फळांमधील पोषक घटकांची तुलना
सफरचंद आणि डाळिंब या दोन्ही फळांमध्ये पोषक घटक असले तरी त्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. अर्धा कप डाळिंबाचे दाणे आणि एक मध्यम आकाराचे सफरचंद यांमधील पोषक घटकांची तुलना खालीलप्रमाणे :
सफरचंद आणि डाळिंबातील पोषक घटकांची तुलना
उष्मांक : अर्धा कप डाळिंबाच्या दाण्यांमधून ७२ उष्मांक मिळतात; तर एका मध्यम आकाराच्या सफरचंदातून ९६ उष्मांक मिळतात.
प्रथिने : डाळिंबामध्ये १.४५ ग्रॅम प्रथिने असतात; तर सफरचंदामध्ये ०.४ ग्रॅम प्रथिने असतात.
एकूण चरबी : डाळिंबातून १ ग्रॅम चांगली चरबी मिळते; तर सफरचंदातून ०.३ ग्रॅम चांगली चरबी मिळते.
कर्बोदके : डाळिंबामध्ये १६ ग्रॅम कर्बोदके असतात; तर सफरचंदामध्ये २३ ग्रॅम कर्बोदके असतात.
तंतुमय पदार्थ : डाळिंबामध्ये ३.५ ग्रॅम फायबर असते; तर सफरचंदामध्ये ४ ग्रॅम फायबर असते. म्हणजेच फायबरच्या बाबतीत सफरचंद किंचित पुढे आहे.
साखर : डाळिंबामध्ये १२ ग्रॅम साखर असते; तर सफरचंदामध्ये १७ ग्रॅम साखर असते.
मॅग्नेशियम : डाळिंबातून १० मिलिग्रॅम मॅग्नेशियम मिळते; तर सफरचंदातून ८.५ मिलिग्रॅम मॅग्नेशियम मिळते.
पोटॅशियम : डाळिंबामध्ये २०५ मिलिग्रॅम पोटॅशियम असते; तर सफरचंदामध्ये १६९ मिलिग्रॅम पोटॅशियम असते.
सोडियम : डाळिंबामध्ये २.६ मिलिग्रॅम सोडियम असते, तर सफरचंदामध्ये ३.४ मिलिग्रॅम सोडियम असते.
या तुलनेनुसार, तंतूंचे प्रमाण सफरचंदात किंचित जास्त आहे; तर डाळिंबामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम व पोटॅशियमचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
कोणत्या फळामध्ये फायबर जास्त असते?
हृदय सक्षम ठेवण्यासाठी एखाद्या भाजी वा फळामधील तंतू म्हणजेच फायबर महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः विद्राव्य तंतू शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासाठी साह्य मिळू शकते. परिणामी रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखणे आणि वजन व्यवस्थापित करणे यांसाठी मदत होते.
सफरचंदामध्ये तंतूंचे प्रमाण चांगले असते. विशेषतः त्याच्या सालीमध्येही तंतू असतात. त्यामुळे सफरचंद सालीसह खाल्ल्यास अधिक तंतू मिळू शकता. दुसरीकडे, डाळिंबाचे दाणेही तंतूंचा चांगला स्रोत आहेत.
अँटिऑक्सिडंट्सच्या बाबतीत कोणते फळ सरस?
अँटिऑक्सिडंट्स हा शरीरातील पेशींचे नुकसान करणाऱ्या मुक्त मूलकांपासून संरक्षण करण्यास मदत करणारा घटक आहे. फळे आणि भाज्या अँटिऑक्सिडंट्सचे महत्त्वाचे स्रोत आहेत.
डाळिंबामध्ये पुनिकॅलॅजिन नावाचे पॉलीफेनॉल आढळते. या घटकामध्ये प्रभावी अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत. त्याशिवाय डाळिंबामध्ये इलॅजिटॅनिन्स, टॅनिन्स, फ्लॅव्होनॉल्स, अँथोसायनिन्स व इलॅजिक अॅसिड यांसारखे घटक असतात.
सफरचंदामध्ये पॉलीफेनॉल्स, फ्लॅव्होनॉइड्स व क जीवनसत्त्व आढळते. हे घटक शरीराचे ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे अँटिऑक्सिडंट्सच्या दृष्टीने डाळिंब विशेष महत्त्वाचे ठरते, तर सफरचंदही पोषणाच्या बाबतीत मागे नाही.
सफरचंद आणि डाळिंब खाण्याची योग्य पद्धत कोणती?
या दोन्ही फळांचे पोषणमूल्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. डाळिंबाचे ताजे दाणे खावेत. सफरचंद स्वच्छ धुऊन सालीसह खावे.
त्याशिवाय ओट्स किंवा साध्या ग्रीक योगर्टमध्ये या फळांचे तुकडे घालून खाता येतात. सलाड, धान्यांपासून तयार केलेले पदार्थ किंवा स्मूदीमध्येही त्यांचा समावेश करता येतो. बदाम, अक्रोड, बिया किंवा कमी चरबीयुक्त चीज यांसोबत ही फळे खाल्ल्यास आहार अधिक पौष्टिक होऊ शकतो.
थोडक्यात सांगायचे तर, हृदयाच्या आरोग्यासाठी सफरचंद किंवा डाळिंब यांपैकी एकाच फळाची निवड करण्याची गरज नाही. दोन्ही फळांचे वेगवेगळे फायदे आहेत. त्यामुळे आहारात विविध फळांचा समावेश करणे अधिक योग्य ठरते. केवळ एखादे फळ खाल्ल्याने हृदयविकार टाळता येत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली यांनाही तितकेच महत्त्व आहे.
