Post-abortion care: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, “सर्व महिलांना (विवाहित आणि अविवाहित) सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार आहे.” सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, अविवाहित महिलांना २४ आठवड्यांच्या आत अवांछित गर्भधारणा संपवण्याचा अधिकार आहे. या निर्णयामुळे गर्भपात वैद्यकीय समाप्ती (MTP) चर्चेत आली आहे. तथापि, गर्भपात ही शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रक्रिया असू शकते हे समजून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. अशा प्रक्रियेनंतर महिलेच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून ती बरी होईल.

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अहमदाबादमधील शेल्बी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसूती तज्ज्ञ डॉ. स्वाती चिटणीस म्हणाल्या, “जरी प्रत्यक्ष गर्भपात प्रक्रियेला जास्त वेळ लागत नसला तरी त्याचे परिणाम एखाद्याचे शरीर आणि त्याच्या भावना यांवर खूप परिणाम करू शकतात. त्यामुळे या प्रक्रियेनंतर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. फॉलो-अप अपॉइंटमेंट शेड्यूल करणेदेखील महत्त्वाचे आहे.”

गुंजन आयव्हीएफ वर्ल्ड ग्रुपच्या संस्थापक व अध्यक्षा, स्त्रीरोगतज्ज्ञ व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. गुंजन गुप्ता गोविल म्हणाल्या की, गर्भपातानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भपात ही कमी जोखमीची प्रक्रिया आहे, जी सुरक्षित आहे. तथापि, गर्भपातानंतर उदभवणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अडचणींना कसे तोंड द्यावे याबद्दल लोकांना माहिती असली पाहिजे.

डॉक्टरांच्या मते, गर्भपातानंतर त्या संबंधित महिलेने घ्यावयाची खबरदारी तत्काळ, मध्यवर्ती व दीर्घकालीन अशा तीन श्रेणींमध्ये विभागली जाऊ शकते.

स्पर्श रुग्णालयातील महिलांसाठी प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्राच्या मुख्य सल्लागार व संचालक डॉ. प्रतिमा रेड्डी म्हणाल्या, “रक्तस्राव आणि संसर्गाची जाणीव असणे, गर्भपातानंतर प्रकृती बरी होण्यामध्ये थंडी वाजून ताप येणे आणि पोटदुखी यांसारखे अडथळे येऊ शकतात हे लक्षात घेऊन, त्याबाबतची तत्काळ स्वरूपाची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर आणि योग्य दिवशी घेत आहात ना याची खातरजमा करीत राहा.” त्या पुढे म्हणाल्या की, मध्यवर्ती खबरदारीमध्ये जास्त रक्तस्राव होत असल्यास त्याचे निरीक्षण करणे आणि तसे झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे या बाबी समाविष्ट आहेत. त्याव्यतिरिक्त गर्भनिरोधक घेणे ही मध्यवर्ती व दीर्घकालीन खबरदारी असेल.

गर्भपात झाल्यानंतर टिप्स

डॉ. गुंजन गोविल यांच्या मते, गर्भपात झाल्यानंतर तुम्ही काही खबरदारी घेतली पाहिजे. भरपूर पाणी आणि निरोगी द्रवपदार्थ प्या, भरपूर झोप व विश्रांती घ्या, तसेच निरोगी, संतुलित आहार घ्या. कमीत कमी दोन आठवडे कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध टाळा, तसेच जास्त व्यायाम आणि वजन उचलणे टाळा. गर्भपातानंतर वैद्यकीय पाठपुरावा करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला वेदना आणि पेटके येत असतील, तर ते कमी करण्यासाठी गरम पाण्याचा शेक घ्या. ​​तसेच, तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे पाळा.

डॉ. प्रतिमा रेड्डी यांच्या मते, “गर्भपाताचा परिणाम स्त्रीच्या मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. कधी कधी गर्भपातानंतर येणाऱ्या संभाव्य नैराश्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना वैद्यकीय सल्ल्याची वा समुपदेशनाची आवश्यकता भासू शकते.अशा परिस्थितीत गर्भपातानंतर महिलांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. जरी हा एक स्वेच्छेने घेतलेला निर्णय असला तरी कधी कधी स्त्रीला त्यामुळे अपराधीपणा वाटू शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या उदभवू शकतात. जर ही भावना कायम राहिली, तर समुपदेशकाची मदत घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.”