Hair fall after delivery: आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो. पण, या आनंदासोबतच अनेक महिलांना एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो; तो म्हणजे प्रसूतीनंतर होणारी भयंकर केस गळती. डिलिव्हरीनंतर शरीरातील हार्मोन्समध्ये वेगाने बदल होतात, ज्यामुळे अचानक केस खूप मोठ्या प्रमाणात गळू लागतात. त्यानंतर बाळंतपणानंतर माझे केस इतक्या झपाट्याने का गळत आहेत? ते पुन्हा पूर्वीसारखे कधीच होणार नाहीत का? बाह्यरुग्ण विभागात महिला रुग्णांकडून डॉक्टरांना हा प्रश्न अनेकदा ऐकायला मिळतो. कधीकधी केसगळती इतकी गंभीर असते की, आपल्याला एखादा गंभीर आजार झाला असावा अशी भीती त्यांना वाटते. हा प्रश्न महिलांमध्ये सामान्य झाला आहे. चला याचं उत्तर जाणून घेऊयात…

प्रसूतीनंतर अनेक स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनसारख्या संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) पातळीत प्रसूतीपूर्व पातळीच्या तुलनेत हळूहळू घट होते. यामुळे केस गळतीची समस्या उद्भवते, जिला ‘पोस्टपार्टम टेलोजेन एफ्लुव्हियम’ असे म्हटले जाते. साधारणपणे ही समस्या प्रसूतीनंतर दोन ते चार महिन्यांनी सुरू होते आणि पुढील काही महिन्यांत हळूहळू कमी होत जाते. बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत बाळ एक वर्षाचे होईपर्यंत केसांची वाढ पुन्हा पूर्ववत होते.

स्त्रियांमधील प्रसूतीनंतरचे केस गळणे हे कधी एखाद्या वैद्यकीय स्थितीचे लक्षण असते?

प्रसूतीनंतर वर्षभरानंतरही केस गळणे सुरू राहिल्यास आणि केस पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या पातळ झाले असल्यास त्याची तपासणी केली पाहिजे. अनेकदा हे लोह, व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे असू शकते. तसेच सतत थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

मुलाची काळजी घेण्यासोबतच स्वतःची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे

आपल्या बाळाची काळजी घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. अनेकदा माता आपला आहार, शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि विश्रांती याकडे सर्वांत शेवटी पाहतात, याचा परिणाम केवळ त्यांच्या केसांवरच नाही तर त्यांच्या संपूर्ण शरीराच्या बरे होण्याच्या प्रक्रियेवरही होतो. संतुलित आहार, पुरेशी प्रथिने, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, अंडी किंवा प्रथिनांचे इतर स्रोत, मोसमी फळे, भरपूर पाणी आणि शक्य तितकी विश्रांती शरीराला लवकर बरे होण्यास मदत करते.

घरगुती उपायांच्या जाळ्यात अडकू नका

जर तुम्हाला केस गळण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घरगुती उपाय किंवा सप्लिमेंट्स घेणे टाळा. योग्य निदानामुळे समस्येचे मूळ कारण ओळखता येते आणि त्यावर योग्य उपचार करता येतात. बहुतेक प्रकरणांमध्ये ही समस्या कालांतराने आपोआपच सुटते. जर केस गळण्यासोबत इतर लक्षणे दिसत असतील किंवा समस्या कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका.