Potato on Gas Cylinder Viral Kitchen Hack: घरातील स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा नसते, तर रोज नवनवीन जुगाड आणि छोट्या छोट्या उपायांनी घर सांभाळण्याचं एक मोठं केंद्र असतं. विशेषतः गृहिणींकडे अशा अनेक भन्नाट किचन ट्रिक्स असतात, ज्या पाहिल्यानंतर “हे आधी का सुचलं नाही” असा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक हटके आणि चर्चेत आलेला जुगाड तुफान व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे या जुगाडासाठी ना कोणतं महागडं उपकरण लागतं, ना मोठा खर्च… फक्त लागतो एक साधासुधा बटाटा! होय, ऐकायला हे विचित्र वाटत असलं तरी एका गृहिणीनं गॅस सिलिंडर आणि बटाट्याचा असा काही भन्नाट संबंध दाखवला आहे की, अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

“गॅस सिलिंडरला बटाटा लावला आणि परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसला नाही,” अशा स्वरू प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

स्वयंपाकघरातील छोट्या गोष्टींचा मोठा त्रास

दररोजच्या धावपळीच्या जीवनात स्वयंपाक करताना महिलांना अनेक छोट्या छोट्या समस्यांना सामोरं जावं लागतं. कधी गॅसजवळ तेलकटपणा वाढतो, तर कधी सिलिंडरच्या तळाशी गंज जमा होतो. अनेकदा सिलिंडर हलवताना फरशीवर काळे डाग पडतात. हे डाग इतके हट्टी असतात की, कितीही साफसफाई केली तरी ते सहजगत्या निघत नाहीत.

काही वेळा सिलिंडरच्या तळाशी ओलावा साचल्यामुळे गंज अधिक वाढतो. त्याचा परिणाम केवळ सिलिंडरवरच नाही, तर घरातील फरशीवरही दिसून येतो. त्यामुळे अनेक गृहिणी या समस्येमुळे त्रस्त असतात. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जुगाडाने या समस्येवर घरगुती उपाय सुचवला आहे. विशेष म्हणजे हा उपाय इतका सोपा आहे की, तो पाहून अनेक जण लगेच करून पाहत आहेत.

नेमका काय आहे हा जुगाड?

व्हायरल व्हिडीओनुसार, सर्वप्रथम एक बटाटा घ्यायचा आणि त्याचे दोन भाग करायचे. त्यानंतर कापलेल्या बटाट्याचा आतील भाग गॅस सिलिंडरच्या तळाशी हलक्या हाताने चोळायचा. आता अनेकांना प्रश्न पडेल की, यामुळे नेमकं काय होतं? पण याच ठिकाणी या जुगाडाची खरी कमाल समोर येते.

शेवटी समोर आलं बटाट्याचं रहस्य!

गॅस सिलिंडरच्या तळाशी वेळोवेळी गंज जमा होतो. हा गंज नंतर फरशीवर उमटतो आणि घराची स्वच्छता बिघडवतो. पण, बटाट्यात असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे सिलिंडरच्या तळाशी जमा झालेला गंज कमी होण्यास मदत मिळू शकते, असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

बटाट्याचा रस गंजाचे डाग कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे सिलिंडरखाली पडणारे काळे डागही कमी होण्यास मदत होऊ शकते. परिणामी फरशी स्वच्छ राहते आणि वारंवार फरशी घासण्याचा त्रासही कमी होतो.

हा व्हायरल व्हिडीओ Aysha’s Kitchen Hacks या यूट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक महिलांनी या ट्रिकवर प्रतिक्रिया देत हा उपाय उपयोगी वाटल्याचे म्हटले आहे.

येथे पाहा व्हिडीओ

तथापि, हा उपाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. प्रत्येक घरातील परिस्थितीनुसार त्याचा परिणाम वेगवेगळा असू शकतो. तरीही घरगुती छोट्या समस्यांवर अशा हटके जुगाडांमुळे अनेकांना दैनंदिन कामात दिलासा मिळताना दिसत आहे.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)