न्यू हॉर्वर्डच्या संशोधकांचा दावा
भारतात कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला कमालीचे दारिद्रय़, कमी वयातील मातृत्व, मातेच्या आरोग्याच्या समस्या, निकृष्ट आहार आणि आरोग्यविषयक नसलेली जनजागृती आदी बाबी कारणीभूत असल्याचा दावा न्यू हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे.
या संशोधकांनी भारतातील कुपोषणाच्या समस्यांवर अभ्यास केलेला आहे. कुपोषणाची कारणे आणि त्याला जबाबदार असलेले घटक यांचा सविस्तर अहवाल या संशोधकांनी तयार केला. या अहवालात भारतातील ४० टक्के मुलांची उंची वजनाच्या मानाने कमी असून साधारण ३० टक्के मुलांचे वजन वाजवीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे.
या संशोधनाचे उद्दिष्ट लहान मुलांमधील कुपोषणाच्या समस्येविषयीचे सर्वसमावेशक विश्लेषण आणि त्यांच्याशी निगडित कारणांचा अभ्यास करणे असा आहे. या वेळी कुपोषणाची समस्या भारतात फोफावण्यासाठीच्या पंधरा प्रमुख कारणांचा अभ्यास केला गेला. सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती दुर्बल आणि मुलांसाठी पोषण आहाराचा अभाव हे त्यापैकी प्रमुख कारण असल्याचे संशोधकांनी सांगितले.
हे संशोधन करण्यासाठी अभ्यासकांनी सहा ते ५९ महिने वय असलेल्या जवळपास २९ हजार मुलांचा अभ्यास केला. मुलांमधील खुरटेपणा आणि कमी वजनाच्या समस्येसाठी कमी वयातील मातृत्व, मातांमधील शिक्षणाचा अभाव, हलाखीची गरिबी, आहारातील पोषकतेचा अभाव आणि मातेचे कमी वजन कारणीभूत असल्याचे आढळून आले. यासोबतच मातेच्या दुधातील जीवनसत्त्व ‘ए’,आयोडिनयुक्त मीठ, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता यांचा अभाव आदी घटकही कुपोषणास कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
कुपोषण नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी स्तरावर उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे संशोधनाचे प्रमुख अभ्यासक आणि नागरी आरोग्य व भूगोलशास्त्राचे प्राध्यापक एस. व्ही. सुब्रमणियन यांनी सांगितले. जर लोकांना त्यांच्या राहणीमानात आणि आहारातील बदल करण्यास सांगितले तर हा पर्याय अंशकालीन मदत म्हणून पूरक ठरेल, पण तत्काळ पोषक आहार आणि राहणीमान सुधारणीसाठीच्या कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून अंमलबजावणी शक्य होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
