Pradeep Rawat Cancer: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे ब्लड कॅन्सरमुळे निधन झाले आहे. ७४ वर्षीय प्रदीप रावत यांनी ‘गजनी’, ‘लगान’, ‘योगी’ आणि ‘बदला’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘अश्वत्थामा’ची भूमिका विशेष गाजली आणि त्यांना त्यातून मोठी ओळख मिळाली. कॅन्सरविरुद्धची झुंज अपयशी ठरल्याने त्यांचे नुकतेच निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप गेल्या चार वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते; मात्र दीड महिन्यापूर्वी हा आजार पुन्हा बळावला आणि गेल्या महिन्याभरापासून ते रुग्णालयात दाखल होते. त्यांना ब्लड कॅन्सरचा आजार होता. रक्ताचा कर्करोग हा अस्थिमज्जा (बोन मॅरो) सारख्या रक्त तयार करणाऱ्या उतींमध्ये आणि रोगप्रतिकार प्रणालीमध्ये उद्भवतो. जेव्हा रक्ताचा कर्करोग होतो, तेव्हा शरीर संसर्गाशी लढण्यास किंवा रक्तस्त्राव थांबवण्यास असमर्थ ठरते. रक्ताचा कर्करोग प्रामुख्याने लिम्फोमा, ल्युकेमिया किंवा मल्टिपल मायलोमा या स्वरूपात दिसून येतो. याची सुरुवातीची लक्षणं काय आहेत जाणून घेऊयात..

रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत?

रक्ताचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखणे कठीण असते. याची लक्षणे शरीराच्या सामान्य आजारांसारखीच असतात. तरीही रक्ताच्या कर्करोगाच्या बाबतीत दिसून येऊ शकणारी काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

  • खोकला
  • झोपेत घाम येणे
  • वारंवार होणारे संसर्ग
  • ताप किंवा थंडी वाजणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • अंगावर खाज सुटणे किंवा पुरळ येणे
  • छातीत दुखणे
  • अशक्तपणा जाणवणे
  • सतत थकवा
  • भूक न लागणे
  • मळमळ
  • सुजलेल्या लसिका ग्रंथी

रक्ताच्या कर्करोगाची कारणे काय आहेत आणि कोणाला जास्त धोका असतो?

वय – काही प्रकारचे रक्त-कर्करोग विशिष्ट वयोगटांमधील व्यक्तींना होतात; उदाहरणार्थ, ल्युकेमिया हा आजार १४ वर्षांखालील मुलांमध्ये किंवा ४० वर्षांवरील प्रौढांमध्ये आढळतो.

तंबाखूचे सेवन – तंबाखूच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि डीएनए (DNA)चे नुकसान होते, ज्यामुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

मद्यपान – अतिप्रमाणात मद्यपान केल्याने अस्थिमज्जेमधील (bone marrow) पेशींच्या निर्मितीवर परिणाम होतो, ज्यामुळे रक्ताचा कर्करोग होऊ शकतो.

कौटुंबिक इतिहास – जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला रक्ताशी संबंधित आजार (hematological disease) झाला असेल तर त्या व्यक्तीला रक्ताचा कर्करोग (blood cancer) होण्याचा धोका वाढतो.

किरणोत्सर्गाचा संपर्क – हानिकारक किरणोत्सर्ग आणि रसायने डीएनएला (DNA) हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

रक्ताच्या कर्करोगाचे विविध प्रकार कोणते आहेत?

रक्ताच्या कर्करोगाचे हे तीन सर्वांत सामान्य प्रकार आहेत:

ल्यूकेमिया (Leukemia) – ल्यूकेमियाची सुरुवात अस्थिमज्जेमध्ये होते आणि त्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींची असामान्य निर्मिती होते. या अतिरिक्त पांढऱ्या रक्तपेशी योग्यरित्या कार्य करत नाहीत आणि शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमकुवत करतात.

लिम्फोमा (Lymphoma) – हा कर्करोग लिम्फोसाइट्समध्ये विकसित होतो; या पेशी रोगप्रतिकारक शक्तीचा भाग असून संसर्गाशी लढण्याचे काम करतात. याचा परिणाम शरीराच्या लसिका प्रणालीवर होतो, ज्यामुळे लिम्फोसाइट्सची अनियंत्रितपणे वाढ होते.

मायलोमा – हा आजार प्लाझ्मा पेशींमध्ये विकसित होतो, ज्या एक प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशी आहेत. प्लाझ्मा पेशी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार करण्याचे आणि जंतूंशी लढण्याचे काम करतात. मल्टिपल मायलोमामध्ये कर्करोगाच्या प्लाझ्मा पेशी अस्थिमज्जेमध्ये जमा होतात आणि निरोगी रक्त पेशींवर मात करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.