How to Reduce Acidity In Pregnancy : गरोदरपण हा एक अदभुत अनुभव आहे; पण याचबरोबर काही शारीरिक समस्याही जाणवतात. त्यापैकी एक म्हणजे छातीत जळजळ आणि अपचन. जवळपास प्रत्येक दुसऱ्या गर्भवती महिलेला या समस्येचा अनुभव येतो. छातीत जळजळ होणे, तोंडात आंबट चव येणे, मळमळ व उलट्या ही सामान्य लक्षणे आहेत. कधी कधी ही जळजळ इतकी तीव्र होते की, जणू काही आग घशापर्यंत पोहोचत आहे असे वाटते. ही स्थिती निश्चितच त्रासदायक आहे; परंतु योग्य माहिती आणि खबरदारीने ती बऱ्याच अंशी नियंत्रणात आणता येते.
…
आम्लपित्ताचा त्रास का वाढतो?
गर्भधारणेमुळे शरीरात हार्मोनल बदल होतात, विशेषतः प्रोजेस्टेरॉन या हार्मोनमध्ये वाढ होते. त्यामुळे पचनसंस्थेची क्रिया मंदावते, अन्न पचण्यास विलंब लागतो आणि पोटातील आम्ल वाढते. बाळाची वाढ होत असताना, गर्भाशयामुळे पोटावर दाब येतो, ज्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होते.
आम्लपित्ताची लक्षणे
छातीत आणि घशात जळजळ होणे.
वारंवार आंबट ढेकर येणे.
तोंडात आंबट चव येणे.
मळमळणे किंवा उलटी झाल्यासारखे वाटणे.
जेवणानंतर जडपणा जाणवणे.
आहारात कोणते बदल केले पाहिजेत?
जास्त वेळ उपाशी राहू नका, थोड्या थोड्या वेळाने खा.
लापशी, खिचडी यांसारखे हलके आणि सहज पचणारे अन्न खा.
जास्त उकडलेल्या भाज्या आणि साधे अन्न खा.
नारळाचे पाणी, ताक आणि थंड पेये घ्या.
दिवसभर पुरेसे पाणी प्या.
कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?
जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे.
आंबट फळं आणि पॅकेज फूड टाळा,
चहा आणि कॉफी टाळा.
जेवणानंतर लगेच झोपणे टाळा.
रोजच्या ‘या’ सवयींमध्ये करा बदल
जेवणानंतर १०-१५ मिनिटे फिरा.
झोपताना डाव्या कुशीवर झोपा.
सैल आणि आरामदायक कपडे घाला.
पुरेशी झोप घ्या.
आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय:
लवंग आणि आवळा पाण्यात भिजवून, ते पाणी सकाळी प्या.
ओवा किंवा बडीशेपची पावडर पाण्यात मिक्स करून, थोडी साखर घालून प्या.
थंड दूध किंवा केळे खाल्ल्यानेही आराम मिळतो.
डॉक्टरांना भेटणे केव्हा आवश्यक असते?
पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना.
रक्ताची उलटी होणे.
काळ्या रंगाचा मल
भूक लागल्यावर जास्त त्रास होणे.
गरोदरपणात ॲसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे; परंतु योग्य आहार, रुटीन आणि सोप्या उपायांनी त्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. आपल्या शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या आणि गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
