Pregnancy Anxiety Symptoms : प्रेग्नेंसीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. या वेळी होणाऱ्या हार्मोनल चढ-उतारामुळे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. खरतरं हा काळ अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा मानला जातो; परंतु आई होण्याचा हा प्रवास महिलांसाठी इतका सोपा नसतो.
या काळात नियमित तपासण्या आणि वैद्यकीय चाचण्या करणे गरजेचे असते. अनेकदा सर्व चाचण्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, डॉक्टरही सांगतात की आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत; तरीही मनात सतत भीती, अस्वस्थता जाणवत राहते. कधी प्रसूतीची भीती वाटते, तर कधी बाळाच्या आरोग्याबद्दल मनात वारंवार नकारात्मक विचार येतात. सर्व काही सुरळीत असतानाही प्रेग्नेंसीमध्ये ही अँक्झायटी का जाणवते, याबद्दल हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्समधीस स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. माधवी रेड्डी वेन्नापुसा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
प्रेग्नेंसीमध्ये विनाकारण चिंता जाणवण्याची कारणे
१. महिला तणावामुळे अधिक संवेदनशील बनतात:
प्रेग्नेंसीमध्ये सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतानाही चिंता किंवा भीती जाणवणे ही एक सामान्य बाब आहे. या काळात शरीरात मोठे हार्मोनल, भावनिक आणि शारीरिक बदल होतात, ज्याचा थेट परिणाम मनावर होतो. यामुळे महिला तणावाबाबत अधिक संवेदनशील बनतात.
२. भविष्याची चिंता आणि भीती:
बाळाचे आरोग्य, प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदना, पालकत्वाची जबाबदारी तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात होणारे बदल याबद्दल सतत चिंता वाटू शकते. अनेकदा महिलांना हीसुद्धा भीती वाटते की, या प्रवासात त्यांच्याकडून एखादी चूक झाली, तर त्याचा वाईट परिणाम बाळावर होईल.
३. शारीरिक लक्षणे आणि मानसिक ताण:
या काळात हृदयाचे ठोके वेगाने पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अस्वस्थता जाणवणे यांसारखी शारीरिक लक्षणे दिसू शकतात. काहीतरी वाईट घडेल या भीतीपोटी महिलांना वारंवार धीर देण्याची गरज भासते किंवा त्यांना शांत झोप येत नाही. या सर्व भावनांचा अर्थ असा अजिबात नाही की महिला परिस्थिती हाताळण्यास असमर्थ आहे; ही आयुष्यातील एका मोठ्या बदलावर शरीराने दिलेली एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.
सतत जाणवणाऱ्या भीतीकडे दुर्लक्ष करू नका
डॉक्टरांच्या मते, प्रेग्नेंसीमध्ये सतत किंवा जास्त प्रमाणात होणाऱ्या चिंतेकडे दुर्लक्ष करू नये. जर या अँक्झायटीमुळे झोपेत अडथळा येत असेल, रोजची कामे करणे कठीण जात असेल वा प्रेग्नेंसीचा आनंद घेता येत नसेल, तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी किंवा मानसोपचारतज्ज्ञांशी (मेंटल हेल्थ एक्सपर्ट) संपर्क साधावा.
अँक्झायटी कशी दूर करावी?
योग्य समुपदेशन (काउंसलिंग), जवळच्या लोकांचा भावनिक पाठिंबा, रिलॅक्सेशन व्यायाम, हलका-फुलका व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि इंटरनेटवरील चिंता वाढवणाऱ्या माहितीपासून दूर राहणे फायदेशीर ठरते. कुटुंबातील सदस्यांनी महिलांचे म्हणणे न रागावता किंवा कोणतेही मत न बनवता शांतपणे ऐकून घेतले पाहिजे आणि त्यांना व्यावहारिक मदत केली पाहिजे. वेळेवर मदत घेतल्यास आईचे भावनिक आरोग्य सुधारते आणि प्रेग्नेंसीचा प्रवास अधिक आनंददायी होतो.
