Post Pregnancy Hair Fall Home Remedy : प्रेग्नन्सीनंतर अनेक महिलांना अचानक केस गळण्याचा सामना करावा लागतो. बाळ झाल्यानंतर काही महिन्यांनी केस झपाट्याने गळू लागतात, ज्यामुळे काळजी वाटू लागते; पण ही समस्या अनेक महिलांमध्ये सामान्य होत आहे. केस गळणे ही केवळ बाह्य सौंदर्याची बाब नाही, ती शरीरात होत असलेल्या बदलांचे लक्षणदेखील असू शकते. अनेकदा महिला हे तात्पुरते आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, पण सतत केस गळाल्याने ते कालांतराने खूप पातळ दिसू लागतात. अनेकदा टक्कल पडतेय की काय अशी भीती सतावते, पण यामागे नेमकं काय कारण आहे आणि त्यावर उपाय काय जाणून घेऊ….

प्रसूतीनंतर स्त्रीचं शरीर अधिक सेंसिटिव्ह होते, कारण ते हळूहळू त्याच्या पूर्वस्थितीत येण्याचा प्रयत्न करत असते. या काळात केसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, म्हणून डॉक्टर या समस्येबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला देतात.

प्रेग्नन्सीनंतर केस गळण्याची कारणे कोणती?

आरएमएल हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सलोनी चढ्ढा यांनी सांगितले की, प्रेग्नन्सीदरम्यान महिलेच्या शरीरात विविध हार्मोनल बदल होतात, ज्याचा तिच्या केसांवरही परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान शरीरात काही हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे केस जास्त काळ वाढीच्या स्थितीत राहतात. प्रसूतीनंतर जेव्हा हे हार्मोन्स हळूहळू सामान्य पातळीवर येतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात केस गळू लागतात.

Award Banner

याव्यतिरिक्त, प्रेग्नन्सीनंतर पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. या काळात अनेक महिलांमध्ये पुरेसे लोह, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो. नवजात बाळाची काळजी घेतल्याने झोपेचा अभाव आणि शारीरिक थकवा वाढू शकतो, ज्यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये ताण आणि शरीराच्या रिकव्हरी स्टेजमुळेदेखील केस गळती वाढू शकते.

प्रेग्नन्सीनंतर महिलांमध्ये केस गळण्याचा धोका का वाढतो?

आजकाल प्रेग्नन्सीनंतर केस गळण्याची समस्या पूर्वीपेक्षा जास्त सामान्य आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी हे याचे एक प्रमुख कारण मानले जाते. अनेक महिला त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे संतुलित आहार खाऊ शकता नाहीत, ज्यामुळे त्यांच्या शरीरास आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत.

याव्यतिरिक्त प्रेग्नन्सीनंतर लवकर कामावर परतण्याचा दबाव, झोपेची कमतरता आणि मानसिक ताण यांचाही शरीरावर परिणाम होतो. वाढते प्रदूषण आणि केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा जास्त वापर, यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. या सर्व कारणांमुळे आजकाल अनेक महिलांमध्ये प्रेग्नन्सीनंतर केस गळणे सामान्य होत आहे.

केस गळती रोखायची कशी?

प्रेग्नन्सीनंतर केस निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या केसांना पुरेसे पोषण मिळावे यासाठी प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहाराचा समावेश केला पाहिजे. याव्यतिरिक्त पुरेशी झोप घेणे आणि तणाव टाळणेदेखील आवश्यक आहे.

केसांची काळजी घेण्यासाठी सौम्य आणि सुरक्षित हेअर प्रोडक्ट्स वापरणे चांगले. नियमितपणे तेलाने मालिश केल्याने केसांची मुळे मजबूत होतात. केस गळती जास्त असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.