Home Remedies for Grey Hair: आरशात केस विंचरताना एखादा पांढरा केस दिसला की अनेकांची चिंता वाढते. विशेषतः कमी वयात केस पांढरे होऊ लागले तर हा त्रास अधिक जाणवतो. वाढत्या वयासोबत केस पांढरे होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, काही लोकांमध्ये तरुण वयातच केसांचा रंग बदलू लागतो. यामागे केवळ कामाचा ताण किंवा चुकीची जीवनशैली जबाबदार असेलच असे नाही. आनुवंशिकता, पोषणाची कमतरता, धूम्रपान आणि काही आरोग्यविषयक समस्या यांचाही संबंध असू शकतो.

केस पांढरे का होतात?

केसांचा नैसर्गिक रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे ठरतो. केसांच्या मुळाशी असलेल्या पेशी मेलॅनिन तयार करतात. जसजसे वय वाढते, तसतशी या पेशी कमी सक्रिय होऊ लागतात आणि केसांचा रंग फिका होत जातो, त्यामुळे केस काळ्यापासून राखाडी किंवा पांढरे दिसू लागतात.

मात्र, कमी वयात केस पांढरे होण्यामागे काही वेगळी कारणेही असू शकतात.

१. आनुवंशिकता: आई-वडिलांचे केस कमी वयात पांढरे झाले असतील तर पुढच्या पिढीतही अशी शक्यता असू शकते.

२. सततचा ताण: दीर्घकाळचा ताण केसांच्या रंगद्रव्याशी संबंधित पेशींवर परिणाम करू शकतो, त्यामुळे काही व्यक्तींमध्ये केस लवकर पांढरे होण्यास त्याचा हातभार लागू शकतो.

३. पोषणाची कमतरता: शरीराला आवश्यक पोषक घटक पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः व्हिटॅमिन B12 आणि लोहाच्या कमतरतेचा अकाली केस पांढरे होण्याशी संबंध आढळला आहे.

४. धूम्रपान: धूम्रपानाचा संबंधही अकाली केस पांढरे होण्याशी जोडला गेला आहे.

५. काही आरोग्यविषयक समस्या: काही ऑटोइम्यून आजार किंवा इतर आरोग्यविषयक स्थितींमध्येही केसांचा रंग बदलू शकतो, त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात केस पांढरे होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

नारळाच्या तेलात मिसळा ‘या’ दोन गोष्टी

केसांची मुळे आणि टाळू निरोगी ठेवण्यासाठी तेलाने मसाज करण्याची पद्धत अनेक वर्षांपासून वापरली जाते.

१. नारळ तेल आणि आवळा

तीन चमचे नारळाचे तेल घेऊन त्यात दोन चमचे आवळा पावडर मिसळा. हे मिश्रण हलके गरम करून आवळा तेलात व्यवस्थित मिसळू द्या. त्यानंतर तेल पूर्णपणे थंड झाल्यावर टाळू आणि केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने केस नेहमीप्रमाणे धुवा. आवळ्याचा वापर पारंपरिक केसांच्या निगेमध्ये केला जातो.

२. नारळ तेल आणि मेंदीची पाने

तीन ते चार चमचे नारळाचे तेल घेऊन त्यात स्वच्छ धुतलेली मेंदीची पाने घाला. मंद आचेवर तेल गरम करताना पानांचा रंग बदलू लागल्यावर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर ते गाळून टाळूला आणि केसांना लावू शकता. मेंदीमुळे केसांना नैसर्गिक रंगाची छटा मिळू शकते.

आहाराकडेही लक्ष द्या

कमी वयात केस पांढरे होत असतील, तर केवळ तेल किंवा घरगुती उपायांवर अवलंबून राहण्यापेक्षा आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटकांचा समतोल आहारात असावा. कोणतीही जीवनसत्त्वांची किंवा खनिजांची सप्लिमेंट्स स्वतःहून सुरू करण्याऐवजी गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्यावी.

पांढरे केस हे अनेकदा नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतात. मात्र, अगदी कमी वयात अचानक मोठ्या प्रमाणात केस पांढरे होऊ लागले, केसगळतीही वाढली किंवा इतर लक्षणे जाणवत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

(Disclaimer : या लेखातील माहिती सर्वसामान्य माहितीसाठी आहे. नारळ तेल, आवळा किंवा मेंदी यामुळे पांढरे केस पुन्हा काळे होतील याची हमी देता येत नाही. केस कमी वयात किंवा अचानक मोठ्या प्रमाणात पांढरे होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)