Pressure Cooker: आपल्यापैकी बहुतेकजण प्रत्येक वापरानंतर प्रेशर कुकर स्वच्छ धुतात. पण झाकणाच्या आतील बाजूला असलेली रबर गॅस्केट (सीलिंग रिंग) आपण किती वेळा स्वच्छ करतो?

प्रेशर कुकरचं भांडं नीट घासून धुतलं जातं, पण गॅस्केटकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. मात्र, ही छोटी रबर रिंग अन्नाचे कण, तेलकटपणा आणि ओलावा अडकवून ठेवते. त्यामुळे ती नीट स्वच्छ केली नाही तर त्यामध्ये जिवाणू (बॅक्टेरिया) आणि बुरशी (मोल्ड) वाढण्याची शक्यता असते.

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कर्करोग तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, रबर गॅस्केट नियमित किंवा योग्य प्रकारे स्वच्छ केलं नाही तर त्यामध्ये हानिकारक जंतू वाढू शकतात. त्यामुळे पचनाशी संबंधित दीर्घकालीन समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळे आम्ही याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.

रबर गॅस्केट नियमित का स्वच्छ करावं?

सेलिब्रिटी आयुर्वेदिक आहारतज्ज्ञ आणि Eatfit24/7 च्या संस्थापक श्वेता शाह यांच्या मते, गॅस्केट प्रत्येक वापरानंतर धुवून ते पूर्णपणे वाळवल्यानंतरच पुन्हा झाकणात बसवावं. तसेच आठवड्यातून किमान एकदा ते नीट खोलवर स्वच्छ करावं.

त्या indianexpress.com शी बोलताना म्हणाल्या, “रबर गॅस्केटमध्ये अन्नाचे छोटे कण, तेलकटपणा आणि ओलावा अडकून राहतो. हे डोळ्यांना नेहमी दिसत नाही. अशा भागांकडे दुर्लक्ष केल्यास ते हळूहळू अस्वच्छ होतात.”

श्वेता शाह पुढे सांगतात की, अनेकजण फक्त कुकरचं भांडं धुतात, पण गॅस्केट साफ करायचं विसरतात. त्यांच्या मते, वाफ आणि अन्नाच्या संपर्कात येणारा प्रत्येक भाग स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण चांगले पदार्थ निवडण्याइतकंच स्वच्छता राखणंही गरजेचं आहे.

गॅस्केट कोमट पाणी आणि सौम्य डिशवॉश लिक्विडने धुवावं. त्यानंतर ते नीट स्वच्छ पाण्याने धुऊन पूर्णपणे वाळू द्यावं आणि मगच पुन्हा झाकणात बसवावं. गॅस्केट ओलसर असतानाच कधीही ठेवू नये.

श्वेता शाह यांचा आणखी एक सल्ला म्हणजे, प्रेशर कुकर साठवताना त्याचं झाकण पूर्णपणे बंद करून ठेवू नये. झाकण थोडंसं उघडं ठेवल्यास आतला उरलेला ओलावा बाहेर निघून जातो आणि तो आत अडकत नाही.

याशिवाय काही सामान्य चुका म्हणजे गॅस्केटवर अन्नाचे कण अनेक दिवस तसेच राहू देणे, खूप तीव्र रसायनांचा वापर करून ते स्वच्छ करणे किंवा तडे गेलेलं किंवा खराब झालेलं गॅस्केट वापरत राहणे. गॅस्केट झिजलं असेल किंवा त्याला तडे गेले असतील तर ते बदलणं आवश्यक आहे. यामुळे फक्त स्वच्छताच नाही तर प्रेशर कुकर सुरक्षितपणे काम करतो.

गॅस्केटमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकते का?

“होय, नक्कीच,” असं श्वेता शाह सांगतात. “गॅस्केटमध्ये अन्नाचे कण आणि ओलावा अनेक दिवस अडकून राहिल्यास बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्यासाठी योग्य वातावरण तयार होतं.” कालांतराने कुकरमधून दुर्गंधीही येऊ शकते, जी गॅस्केट नीट स्वच्छ न केल्याचं लक्षण असू शकते.

मात्र, सरवोदय हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा वेस्ट येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. जगत जोत सिंह गिल सांगतात की, व्यवस्थित काम करणाऱ्या प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक करताना तयार होणारं जास्त तापमान बहुतांश हानिकारक जंतूंना नष्ट करण्यासाठी पुरेसं असतं.

तरीही, गॅस्केटवर बुरशी, दुर्गंधी किंवा खूप घाण दिसत असेल तर ते नीट स्वच्छ करावं किंवा बदलून टाकावं. कारण स्वयंपाकानंतर किंवा हाताळताना अन्न दूषित होण्याची शक्यता असते.

घाणेरड्या गॅस्केटमुळे आतड्यांना सूज येऊ शकते किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते का?

डॉ. गिल यांच्या मते, गॅस्केट स्वच्छ न ठेवल्यामुळे अन्न दूषित होण्याचा धोका वाढू शकतो. मात्र, “फक्त घाणेरड्या गॅस्केटमुळेच दीर्घकालीन आतड्यांची सूज, पचनाचे गंभीर आजार किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

श्वेता शाह याही याच मताशी सहमत आहेत. त्या सांगतात की, स्वयंपाकघरातील अस्वच्छतेमुळे अन्नातून पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे उलटी, जुलाब, पोटदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. मात्र, फक्त अस्वच्छ कुकरच्या गॅस्केटमुळे आतड्यांना सूज येते किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, असा थेट वैज्ञानिक संबंध असल्याचा दावा त्या करत नाहीत. कारण आतड्यांचं आरोग्य अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं.

डॉ. गिल पुढे सांगतात की, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यावी.

श्वेता शाह म्हणतात, “बाहेरचं अन्न खाताना आपण स्वच्छतेबाबत सावध असतो, कारण तिथे स्वच्छतेची खात्री नसते. पण आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरातही तितकीच स्वच्छता राखणं गरजेचं आहे. उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेणं नेहमीच चांगलं.”

त्या पुढे सांगतात, “गॅस्केट नियमितपणे स्वच्छ करून पूर्णपणे वाळवण्यासारख्या छोट्या सवयी तुमचं अन्न सुरक्षित ठेवतात आणि तुमचं स्वयंपाकघर निरोगी ठेवण्यास मदत करतात.”

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)