scorecardresearch

आरोग्यवार्ता : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना

हवामान विभागाने चार दिवस उष्णतेची लाट असेल, असे जाहीर केले आहे. सध्या बहुतांश ठिकाणी सरासरी तापमान ४० अंश सेल्सियस आहे.

Heat wave warning issued for Mumbai Thane by IMD Does And Donts

नवी दिल्ली : हवामान विभागाने चार दिवस उष्णतेची लाट असेल, असे जाहीर केले आहे. सध्या बहुतांश ठिकाणी सरासरी तापमान ४० अंश सेल्सियस आहे. काही ठिकाणी हे तापमान ४० अंशापेक्षाही जास्त आहे. या काळात वाढलेल्या उष्णतेने उष्माघाताचा धोका असल्याने स्वत:चे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही उपाय करणे गरजेचेच असते.

भारतात उन्हाळय़ात म्हणजे मार्च ते जूनदरम्यान उष्णतेच्या लाटा येत असतात. या काळात शरीरात निर्जलीकरण (डिहायड्रेशन), उष्णतेने पेटके येणे, अतीव थकवा किंवा उष्माघातासारखे त्रास उद्भवतात. उष्णतेने पेटक्यांसह स्नायूंना सूज, चक्कर आणि तापही येतो. थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, उलटय़ा, मळमळ, घाम येणे ही लक्षणेही जाणवतात. उष्माघातासारख्या त्रासात अस्वस्थता जाणवून व्यक्ती कोमात जाते. ही स्थिती प्राणघातक असू शकते.  

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे :

 • शक्यतो दुपारी बारा ते तीनदरम्यान उन्हात बाहेर पडू नये.
 •   सातत्याने पाणी पीत राहावे.
 • हलके, सैल, सुती व सूर्यप्रकाश परावर्तित करणाऱ्या रंगांचे कपडे घालावेत. गॉगल, छत्री-टोपी घालावी किंवा मोठय़ा पांढऱ्या सुती रुमालाने डोके झाकावे.
 •   मेहनतीची कामे तळपत्या भर उन्हात करू नयेत. उघडय़ावर दुपारी बारा ते तीन कामे करू नयेत.
 •   प्रवास करताना सोबत पाणी ठेवावे.
 • या काळात मद्यसेवन, चहा, कॉफी, कृत्रिम सोडावॉटर पेये घेणे टाळावे.
 • चांगला प्रथिनयुक्त आहार घ्यावा. शिळे अन्न खाणे टाळावे.
 • या काळात बाहेर जावे लागल्यास छत्री वापरावी. ओलसर वस्त्राने डोके, चेहरा, मान झाकावी.
 •   चक्कर अथवा आजारी पडत आहोत, असे वाटल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे.
 • साखर-मिठाच्या योग्य मिश्रणाचे ‘ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस)’ नियमित घ्यावे. ताक, लस्सी, लिंबू सरबत आदी घरगुती पेये प्यावीत.
 •   निवासस्थानात गारवा राहावा, यासाठी खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात, घरात हवा खेळती राहील (वायुविजन) अशी व्यवस्था ठेवावी.
 • पंखा वापरावा. ओलसर कपडय़ाने अंग पुसणे, थंड पाण्याने स्नान करणे याने आपला उन्हाळा सुसह्य होईल. 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prevent heatstroke meteorological department heat wave danger health good remedy ysh

ताज्या बातम्या