कीटकनाशकांची प्रक्रिया केलेल्या मच्छरदाण्या या डासांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतात असे एका अभ्यासात दिसून आले आहे. डास आता कीटकनाशकांना सरावले असले तरी त्यांचा वापर मच्छरदाण्यांमध्ये केला असता डासांपासून संरक्षण होते. डेल्टामेथ्रिन या कीटकनाशकाचे काही प्रमाण दिले तर डासाच्या पोटात मलेरियाचा परोपजीवी जंतू वाढण्यास प्रतिबंध होतो. कीटकनाशके ही निष्प्रभ ठरत असल्याने मलेरिया (हिवताप)नियंत्रणाबाहेर जात आहे. लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेचे लो लाइन्स यांनी म्हटले आहे की, कीटकनाशकांचा वापर असलेल्या मच्छरदाण्या आतापर्यंत फार प्रभावी का ठरत नव्हत्या त्याचे स्पष्टीकरण आता करता आले आहे. पॅरासाइट्स अँड व्हेक्टर्स या नियतकालिकात म्हटले आहे की, आताचे संशोधन आफ्रिकेतील अ‍ॅनोफेलीस गॅम्बी डासांवरचे आहे. संशोधकांनी मलेरियाग्रस्त रक्त या डासांना दिले व नंतर कीटकनाशकाचा डोस दिला, नंतर त्यांच्यातील परोपजीवी जंतूच्या वाढीवर लक्ष ठेवले. त्यात डासांमध्ये या कीटकनाशकामुळे कमी परोपजीवी जंतू तयार झाले असे दिसून आले. या अभ्यासानुसार कीटकनाशकांना दाद न देणारे जंतू फार तग धरू शकले नाहीत, कारण डासांमध्ये वेगळीच रसायने त्यामुळे तयार झाली. याचा अर्थ कीटकनाशकांची प्रक्रिया केलेल्या मच्छरदाण्या या मलेरियावर प्रभावी ठरतात. जर तसे असेल तर आणखी पर्याय निर्माण करता येतील असे लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे तारेंकेग्न अबेकू यांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)