Prostate Cancer Early Signs : प्रोस्टेट कॅन्सरसंदर्भातील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे या आजाराच्या लक्षणांबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही, अनेक पुरुष लघवीशी संबंधित समस्यांना वाढत्या वयाचा एक भाग मानून महिने किंवा वर्षानुवर्षे त्याकडे दुर्लक्ष करतात. तर दुसरीकडे, काही पुरुष प्रोस्टेट कॅन्सरचे नाव ऐकताच लघवीशी संबंधित प्रत्येक लक्षणाला कॅन्सरशी जोडून घाबरून जातात. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लघवीशी संबंधित सर्वच लक्षणे कॅन्सरची नसतात; पण सातत्याने जाणवणारे बदल वैद्यकीय तपासणीशिवाय सोडून देणे हेही योग्य नाही.
या महत्त्वाच्या विषयावर डॉ. राजीव सूद (प्रिन्सिपल डायरेक्टर, युरोलॉजी सायन्स अँड अँड्रॉलॉजी, पॅसिफिक वनहेल्थ हॉस्पिटल) यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेली माहिती खालीलप्रमाणे :
लघवीची प्रत्येक समस्या म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर नव्हे
तज्ज्ञांच्या मते, वय वाढण्याबरोबर प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे म्हणजेच ‘बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेशिया’ (BPH) ही अत्यंत सामान्य बाब आहे. त्यामुळे लघवीचा प्रवाह कमी होणे, लघवी सुरू होण्यास वेळ लागणे, वारंवार लघवी होणे, रात्री अनेकदा उठावे लागणे किंवा लघवी केल्यानंतरही मूत्राशय (Bladder) पूर्णपणे रिकामे झाले नाही, असे वाटणे अशा समस्यांचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे युरिनरी इन्फेक्शन (UTI), प्रोस्टाटायटिस, ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर व मधुमेह यांमुळेही लघवीची वारंवारता वाढू शकते. त्यामुळे केवळ लक्षणांच्या आधारावर प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.
प्रोस्टेट कॅन्सरबाबत कधी काळजी करावी?
डॉक्टरांच्या मते, प्रोस्टेट कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक पुरुषांमध्ये लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत. त्यामुळे केवळ लघवीमध्ये त्रास सुरू होण्याची वाट पाहणे पुरेसे नाही. आजार वाढल्यावर काही प्रकरणांमध्ये लघवी किंवा वीर्यामध्ये (Seamen) रक्त येऊ शकते. सतत पाठीचा खालचा भाग, नितंब किंवा पेल्विक भागात दुखणे हे ॲडव्हान्स आजाराचे लक्षण असू शकते. ही लक्षणे इतर आजारांमध्येही असू शकतात आणि त्यांचा थेट अर्थ कॅन्सर असा होत नाही.
वय आणि कौटुंबिक इतिहास (Family History) दुर्लक्षित करू नका
प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वयानुसार वाढतो. त्याशिवाय ज्या पुरुषांच्या वडिलांना किंवा भावाला प्रोस्टेट कॅन्सरचा त्रास झाला आहे, त्यांच्यामध्ये याचा धोका सामान्य लोकांच्या तुलनेत जास्त असू शकतो. म्हणूनच कौटुंबिक इतिहास असलेल्या पुरुषांनी प्रोस्टेट कॅन्सर स्क्रीनिंगबद्दल (तपासणी) आधीच डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे.
हे समजणेदेखील महत्त्वाचे आहे की, PSA (Prostate-Specific Antigen) टेस्ट ही कॅन्सर कन्फर्म करणारी एकमेव टेस्ट नाही. PSA चे प्रमाण वाढणे हे प्रोस्टेटचा आकार वाढल्याने किंवा प्रोस्टाटायटिससारख्या स्थितीतही होऊ शकते. तसेच, केवळ नॉर्मल PSA रिपोर्टच्या आधारावर प्रत्येक व्यक्तीमधील कॅन्सरचा धोका पूर्णपणे संपला आहे, असे मानता येत नाही. स्क्रीनिंगचा निर्णय वय, कौटुंबिक इतिहास, लक्षणे, एकूण आरोग्य आणि वैयक्तिक धोका लक्षात घेऊनच घेतला पाहिजे.
पुरुषांनी युरॉलॉजिस्टला (Urologist) कधी भेटावे?
जर लघवीशी संबंधित समस्या नवीन असेल, सतत जाणवत असेल किंवा हळूहळू वाढत असेल, तर तिला केवळ वयोमानानुसार होणारा त्रास मानून टाळू नये. विशेषतः रात्री वारंवार उठावे लागणे, लघवीच्या प्रवाहात सतत होणारे बदल, लघवी सुरू करण्यास त्रास होणे, लघवीत रक्त येणे, अचानक वजन कमी होणे किंवा पाठीच्या खालच्या भागात आणि पेल्विक एरियामध्ये सतत वेदना होणे यांसारख्या लक्षणांवर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
