Protein Rich Food: जर तुम्हाला तुमच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल, तर त्यासाठी फक्त चिकन, अंडी किंवा डाळींवर अवलंबून राहण्याची गरज नाही. असे काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. फूड गाइड TasteAtlas ने नुकत्याच आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अशाच काही प्रोटीनयुक्त पदार्थांची माहिती दिली आहे. या यादीत एका अशा पदार्थाचाही समावेश आहे, जो सहसा आपल्या फ्रिजमध्ये असतो. त्याचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते…
सहसा जेव्हा प्रोटीनयुक्त पदार्थांचा विषय येतो, तेव्हा सर्वात आधी चिकन, मासे, अंडी आणि डाळींचा विचार केला जातो. पण या यादीतील एक पदार्थ प्रोटीनच्या बाबतीत या सर्व पदार्थांपेक्षा पुढे आहे. हा पदार्थ म्हणजे परमेसन चीज. हे गायीच्या दुधापासून तयार केले जाते. याची चव थोडी खारट आणि वेगळी असते. पास्त्यावर किसून टाकण्यासाठी किंवा सॅलडमध्ये वापरण्यासाठी याचा वापर केला जातो. काही लोक हे लहान तुकड्यांमध्येही खातात.
TasteAtlas च्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार, १०० ग्रॅम परमेसन चीजमध्ये सुमारे ३६ ग्रॅम प्रोटीन असते. या तुलनेत ते चिकन ब्रेस्ट, टूना मासा, बीफ, बदाम, टोफू, अंडी आणि डाळींपेक्षा जास्त आहे.
परमेसन हे एक प्रकारचे कडक चीज आहे, जे बराच काळ ठेवून तयार केले जाते. याची चव थोडी तिखट, खारट आणि अक्रोडासारखी असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी थोडेसे चीजदेखील जेवणाची चव वाढवते.
परमेसन चीज सहसा कमी प्रमाणात खाल्ले जाते. तर चिकन, मासे आणि डाळींचा आहारात जास्त प्रमाणात समावेश करता येतो. याशिवाय परमेसनमध्ये फॅट आणि सोडियमचे प्रमाणही जास्त असते.
प्रोटीनसाठी चिकन ब्रेस्टलाही अनेकांची पसंती असते. यामध्ये फॅटचे प्रमाण तुलनेने कमी असते. विशेषतः जास्त तेल न वापरता ते शिजवल्यास त्यातील फॅटचे प्रमाण कमी राहते. याचा वापर सॅलड, सँडविच, रॅप आणि रोजच्या जेवणात सहज करता येतो. TasteAtlas च्या तुलनेनुसार, १०० ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे ३२ ग्रॅम प्रोटीन असते. म्हणजेच परमेसन चीजपेक्षा ते फक्त ४ ग्रॅमने कमी आहे.
मासे हादेखील प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. विशेषतः शिजवलेल्या ब्लूफिन टूना माशाच्या १०० ग्रॅममध्ये सुमारे ३० ग्रॅम प्रोटीन असते. हा मासा ग्रिल करून किंवा हलका भाजून खाता येतो. सॅलड आणि इतर पदार्थांमध्येही याचा वापर केला जातो.
जे लोक मांसाहार करतात, त्यांच्यासाठी बीफ स्कर्ट स्टेक हा प्रोटीन मिळवण्याचा एक पर्याय आहे. हा जास्त आचेवर शिजवून त्याचे पातळ तुकडे केले जातात. TasteAtlas च्या आकडेवारीनुसार, १०० ग्रॅम ग्रिल्ड बीफमध्ये सुमारे २९ ग्रॅम प्रोटीन असते.
तर शाकाहारी लोकांसाठी बदाम हा प्रोटीनचा चांगला पर्याय ठरू शकतो. १०० ग्रॅम कच्च्या बदामामध्ये सुमारे २१ ग्रॅम प्रोटीन असते. यामध्ये फायबर आणि शरीरासाठी चांगले फॅटही असतात. मात्र, बदामामध्ये कॅलरीचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे ते मर्यादित प्रमाणात खाणे चांगले.
टोफू हा देखील प्रोटीन मिळवण्याचा एक चांगला वनस्पतीजन्य पर्याय आहे. तो सोयाबीनपासून तयार केला जातो. मांस किंवा मासे न खाणाऱ्या लोकांसाठी तो उपयोगी ठरतो. १०० ग्रॅम साध्या आणि न शिजवलेल्या घट्ट टोफूमध्ये सुमारे १७ ग्रॅम प्रोटीन असते. टोफूचे वैशिष्ट्य म्हणजे तो मसाले आणि सॉसची चव सहज शोषून घेतो. त्यामुळे भाजी, करी किंवा ग्रिल्ड पदार्थांमध्ये त्याचा समावेश करता येतो.
अंडी हादेखील रोजच्या आहारात प्रोटीनचा समावेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. १०० ग्रॅम उकडलेल्या अंड्यांमध्ये सुमारे १३ ग्रॅम प्रोटीन मिळते. नाश्त्यामध्ये अंडी खाता येतात किंवा सॅलड आणि सँडविचमध्येही त्यांचा वापर करता येतो. प्रोटीनसोबतच अंड्यांमधून शरीराला अनेक आवश्यक पोषक घटकही मिळतात.
भारतीय स्वयंपाकघरात डाळींचा वापर रोज केला जातो. डाळी केवळ प्रोटीनच नव्हे, तर आहारातील फायबरचाही चांगला स्रोत आहेत. TasteAtlas नुसार, १०० ग्रॅम शिजवलेल्या आणि पाणी काढलेल्या डाळीमध्ये सुमारे ९ ग्रॅम प्रोटीन असते. डाळींचा वापर आमटी, सूप, सॅलड आणि खिचडी बनवण्यासाठी करता येतो.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
