भारतात लवकरच PUBG Mobile India या गेमचं पुनरागमन होणार आहे. ‘पबजी लव्हर्स’ या गेमची आतुरतेने वाट बघतायेत. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत हा गेम पुन्हा भारतात लाँच होईल अशी शक्यतावर्तवली जात होती, पण पुन्हा एकदा प्रतीक्षा लांबली आहे. दरम्यान, गेम अद्याप लाँच न होण्याचं महत्त्वाचं कारण आता समोर आलं आहे.

InsideSport च्या रिपोर्टनुसार, अजून भारत सरकारकडून PUBG Mobile India च्या लाँचिंगसाठी परवानगी मिळालेली नाही. PUBG India ला लाँच करण्याआधी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यासाठी गेमच्या अधिकाऱ्यांकडून आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, अद्याप सरकारकडून उत्तर मिळालेलं नाही. गेमच्या चाहत्यांसाठी ही बातमी निराशाजनक असली तरी लवकरच याबाबतचं चांगलं वृत्त समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी 24 नोव्हेंबर रोजी Google Play Store च्या रिव्ह्यू टीमला गेमच्या डेव्हलपर्सकडून एक नोटिफिकेशन पाठवण्यात आलं होतं. यामध्ये डेव्हलपर्सनी PUBG Mobile India गेम अपलोड करताच गुगल प्ले स्टोअरवर हा गेम पब्लिश करण्याची प्रक्रीया जलदगतीने पार पाडावी अशी विनंती करण्यात आली होती. अॅप अपलोड होताच रिव्ह्यू साठी न थांबवता ते अॅप पब्लिश केलं जावं अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीला गुगलकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. गुगल प्ले-स्टोअरकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर GEM Esports ने हा गेम प्ले-स्टोअरवर अपलोड होताच लगेच पब्लिश होईल, अशी माहिती दिली आहे.

दुसरीकडे, PUBG Mobile India हा गेम अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी लाँच होणार नाही अशीही चर्चा आहे. सुरूवातीला हा गेम केवळ अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल, म्हणजे PUBG Mobile India ला गुगल प्ले स्टोअरवर सर्वप्रथम लिस्ट केलं जाईल. तर , iOS युजर्ससाठी हा गेम काही दिवसांनंतर जारी केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, PUBG Mobile India कंपनीच्या रजिस्ट्रेशनला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. पबजी कॉर्पोरेशनने PUBG India Private Limited नावाने कंपनी रजिस्टर केली आहे. पण, गेम नेमका कोणत्या तारखेला लाँच होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.