क्यूआर कोड फसवणूक

‘क्यूआर कोड’ म्हणजे ‘क्वीक रिस्पॉन्स’ कोड. हा कोड ‘स्कॅन’ करून खरेदी करण्याचा पर्याय लोकप्रिय होऊ लागला आहे.

देशात डिजिटल पेमेंट यंत्रणा व्यापक स्वरूपात पसरली आहे. त्यातच करोनाकाळात खबरदारी म्हणून रोकड व्यवहार करण्याऐवजी ग्राहकमंडळी स्मार्टफोनवरील विविध वॉलेटद्वारे दुकानदाराचा ‘क्यू आर कोड’ स्कॅन करून त्याला खरेदीची रक्कम देतात. त्यामुळे ‘क्यूआर कोड’च्या आधारे आर्थिक व्यवहारही रूढ होऊ लागले आहेत. मात्र, याच पद्धतीचा गैरफायदा घेऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत.

‘क्यूआर कोड’ म्हणजे ‘क्वीक रिस्पॉन्स’ कोड. हा कोड ‘स्कॅन’ करून खरेदी करण्याचा पर्याय लोकप्रिय होऊ लागला आहे. दुकानदार बिल भरण्यासाठी ह्यचा वापर करतात. अगदी लहान विक्रेतेसुद्धाा  त्यांच्या ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरण्याचा किंवा पेमेंट करण्याचा पर्याय देत आहेत . क्यूआर कोड वापरून पेमेंट करण्यासाठी, ग्राहकाला लाभार्थी किंवा लाभार्थीच्या खात्याच्या तपशिलात जाण्याची गरज नाही आणि व्यवहाराचा बंदोबस्त देखील जलद आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी, सर्व बँकिंग आणि ई-वॉलेट अ‍ॅप्स क्यूआर कोड वाचन करण्याचे  सॉफ्टवेअर प्रदान करतात. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, ग्राहक रक्कम प्रविष्ट करतो आणि पासवर्ड प्रविष्ट करून पेमेंट प्रमाणित करतो आणि रक्कम लाभार्थीच्या खात्यात अगदी सहज हस्तांतरित केली जाते. एवढेच नाही तर ग्राहक स्वत: क्यूआरकोड निर्माण करून इतरांना पाठवू शकतो व समोरील व्यक्ती त्याआधारे रक्कम स्वीकारू शकतो.

सध्याच्या डिजिटल युगात झटपट आर्थिक देवाणघेवाणीसाठी हा पर्याय उपयुक्त असला तरी, त्याचा गैरफायदा घेतला जाऊ लागला आहे. फसवणूक करणारे ओएलएक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर वस्तू विकणारम्य़ांशी संपर्क साधतात. यासाठी, ते स्वत: ला सेकंडहँड वस्तू विक्रेते म्हणून दाखवतात  आणि विRेत्याला मालाची तपासणी न करताच  करार अंतिम करण्यास राजी करतात. विश्वस निर्माण करण्यासाठी, फसवणूक करणारा  सुरुवातीला विक्रेत्याच्या खात्यात एक छोटी टोकन रक्कम हस्तांतरित करतो आणि त्याला वाटाघाटी मध्ये गुंतवून ठेवतो. थकबाकी भरण्यासाठी, ते विक्रेत्याला क्यूआर कोड पाठवतात आणि स्पष्ट करतात की हा क्यूआर कोड विक्रेत्याच्या खात्यात मिळालेल्या  पेमेंटच्या  पुष्टीकरणासाठी आहे. प्रत्यक्षात तो कोड पैसे काढण्यासाठी असतो. त्या कोडच्या आधारे विक्रेत्याने पासवर्ड टाकताच त्याच्या बँकखात्यातून रक्कम काढली जाते.

‘क्यूआर कोड’द्वारे फसवणुकीचा आणखी एक पर्याय भामटय़ांनी निवडला आहे. विविध समाजमाध्यमांवर लष्करी अधिकारी किंवा सरकारी सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी असल्याचे भासवून भामटे विक्रेत्याच्या रूपात खरेदीदाराशी संपर्क साधतात. लष्करी अधिकारी असल्याचे पाहून सर्वसामान्य नागरिक त्या व्यक्तीशी व्यवहार करण्यास पटकन तयार होतात. त्यानंतर ते भामटे ग्राहकांना ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ म्हणून काही रक्कम पाठवण्यास सांगतात. त्यासाठी ‘क्यूआर कोड’ पाठवला जातो. प्रत्यक्षात या कोडमध्ये नमूद केलेली रक्कम ग्राहकाला सांगितलेल्या रकमेपेक्ष कितीतरी अधिक असते. अजाणतेपणी ग्राहक त्या ‘क्यूआर कोड’द्वारे पैसे देतात. पण नंतर त्यांना त्यांची चूक लक्षात येते. अर्थात तोवर उशीर झालेला असतो.

लष्करी अधिकारी किंवा सुरक्षा यंत्रणेतील उच्चपदस्थ असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांनी ‘रिअल इस्टेट’ संकेतस्थळ वा अ‍ॅपद्वारेही फसवणुकीस सुरुवात केली आहे. नामांकित अ‍ॅपवर भाडेकरू असल्याचे भासवून ते घरमालकांशी संपर्क साधतात. सरकारी यंत्रणेतील अधिकारी असल्याने घरमालकांचा पलिकडील व्यक्तीवर लगेच विश्वास बसतो. यासाठी हे भामटे आपल्या ‘डिपी’ला लष्करी वेशातील छायाचित्रे ठेवत असतात. एकदा घरमालकाचा विश्वास संपादन करताच ते घर नोंदणीची अनामत रक्कम म्हणून काही पैसे घरमालकाच्या खात्यात वळते करतात. त्यानंतर या घरमालकांना ‘क्यूआर’ कोड पाठवण्यात येतो. या कोडवर क्लिक करताच खात्यात पैसे वळते झाल्याचे निश्चित होईल, असे भासवले जाते. घरमालक असलेल्या व्यक्तीने तो कोड स्वीकारताच त्यांच्या बँकखात्यातून घसघशीत रक्कम लंपास केली जाते. अनेकदा संबंधित घरमालक या व्यक्तीशी संपर्क साधून चुकीचा व्यवहार झाल्याचे सांगतो. त्यावर पुन्हा नवीन क्यूआर कोड पाठवून रक्कम परत करण्याचे आश्वासन त्यांना दिले जाते. प्रत्यक्षात मात्र तो कोडही पैसे लुबाडण्यासाठीच पाठवलेला असतो.

–  प्रा. योगेश अशोक हांडगे, पुणे

फसवणूक कशी टाळाल?

  • कोणी तुम्हाला खात्यात पैसे जमा करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ स्कॅन करण्यास सांगत असेल तर ती व्यक्ती फसवणूक करणारी असू शकते. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.
  • ज्या ‘क्यूआर कोड’बद्दल तुम्ही निश्चिंत असाल किंवा विश्वासार्ह व्यक्तींकडून आलेल्या क्यूआर कोडद्वारेच व्यवहार करा.
  • अज्ञात व्यक्तींकडून पाठवण्यात आलेल्या क्यूआर कोडकडे दुर्लक्ष करा.
  • अनेकदा ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक संकेतस्थळ सुरू होते. त्यात तुमची वैयक्तिक माहिती नमूद करण्याची सूचना केली जाते. याद्वारे तुमची खासगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
  • लक्षात ठेवा, तुमच्या खात्यात पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही क्यूआरकोडची गरज भासत नाही.
  • सार्वजनिक ठिकाणी लावलेले क्यूआर कोड खातरजमा न करता स्कॅन करू नका.

व्हॉट्सअ‍ॅपवर नवी सुविधा

व्हॉट्सअ‍ॅपवरील वापरकर्त्यांची संख्या जसजशी वाढत चालली आहे तसतसे या मेसेंजर अ‍ॅपवरील वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. त्यासोबतच वापरकर्त्यांची गोपनीयता आणि खासगीपणा जपण्याचे आव्हानही मोठे आहे. याबाबत विविध माध्यमांतून मिळणाऱ्या वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांच्या आधारे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. असाच एक नवीन बदल व्हॉट्सअ‍ॅपने केला असून त्याद्वारे वापरकर्त्यांला दुसऱ्या वापरकर्त्यांकडे पाठवलेली छायाचित्रे ठरावीक मुदतीनंतर हटवून टाकण्याची सुविधा मिळणार आहे.

सध्या करोना र्निबधांमुळे अनेक व्यवहार ऑनलाइन वा स्मार्टफोनच्या माध्यमातून होत आहेत. कर्ज मिळवण्यासाठी किंवा अन्य कोणत्या कारणांसाठी दस्तावेजांची देवाणघेवाण ईमेलखेरीज व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही होऊ लागली आहे. त्या त्या वेळी आपण बिनदिक्कतपणे एखाद्या दस्तावेजाचे छायाचित्र पलीकडील व्यक्तीला पाठवतो. मात्र ते छायाचित्र त्या व्यक्तीकडे कायमस्वरूपी राहू शकते. अर्थात दस्तावेजाच्या त्या प्रतीचा ती व्यक्ती अन्य कारणांसाठी गैरवापर करण्याची भीती असते. हे टाळण्यासाठीच व्हॉट्सअ‍ॅपने ठरावीक मुदतीपुरतेच छायाचित्र पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खरं तर अशी सुविधा इन्स्टाग्रामवर आधीपासूनच उपलब्ध आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपनेही ती सुरू केली आहे.

काय आहे ही सुविधा?

एखाद्या व्यक्तीला छायाचित्र पाठवताना तुम्ही ‘व्ह्य़ू वन्स’ (View Once)  हा पर्याय निवडला असेल तर पलीकडील व्यक्ती केवळ एकदाच ते छायाचित्र उघडून पाहू शकेल. तसेच ते छायाचित्र त्यांना आपल्या फोटो गॅलरीमध्येही साठवून ठेवता येणार नाही. त्यासोबतच हा पर्याय निवडून पाठवण्यात आलेली  छायाचित्रे तुम्ही इतरांना फॉरवर्डदेखील करू शकणार नाही. त्यासोबतच जर ज्याला छायाचित्रे पाठवण्यात आले आहे, त्या व्यक्तीने १४ दिवसांच्या आत ते खुले करून पाहिले नाही तर ते छायाचित्र आपोआप हटवले जाईल. अर्थात ‘बॅकअप’मधून ते छायाचित्र ‘रिस्टोर’ करणे शक्य होईल. त्याच वेळी खुले करण्यात आलेले छायाचित्र ‘व्ह्य़ू वन्स’च्या पर्यायामुळे ‘बॅकअप’मध्ये समाविष्ट होणार नाही, हे विशेष.

काय करावे लागेल? : या पर्यायाचा अवलंब करण्यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीला छायाचित्र पाठवायचे आहे, त्याच्या मेसेज बॉक्समध्ये ‘अ‍ॅटेचमेंट’चे चिन्ह क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हवे ते छायाचित्र निवडावे लागेल. ते निवडल्यानंतर तुम्हाला घडय़ाळासारखे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करताच ‘व्ह्य़ू वन्स’चा पर्याय सक्रिय होईल. तो सुरू करताच तुम्हाला ‘Photo set to View Once’  हा पर्याय दिसेल.

त्रुटी आहेतच.. : व्हॉट्सअ‍ॅपच्या या पर्यायामुळे वापरकर्त्यांना त्यांची गोपनीयता व खासगीपणा जपणे शक्य होणार असले तरी, त्याबाबत १०० टक्के खात्री देणे शक्य नाही. कारण पलीकडील व्यक्तीने संबंधित छायाचित्राचा स्क्रीनशॉट काढल्यास अथवा दुसऱ्या फोनच्या कॅमेऱ्याद्वारे त्याचे छायाचित्र टिपल्यास त्याला त्या छायाचित्राचा पुढेही वापर करता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Qr code fraud digital payment ssh

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या