Quit Smoking Tips : सिगारेट आणि तंबाखू हे कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते. इतकेच नाही, तर यामुळे व्यक्तीमध्ये अल्झायमर, हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक यांसारख्या जीवघेण्या समस्यांचा धोका वाढतो. सिगारेटमुळे तुमच्या रेटिनल पेशींच्या संरचनेवरही परिणाम होतो. धूम्रपान सोडणे सोपे नाही; पण ते तितके अवघडही नाही. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, धूम्रपानाचे व्यसन लागण्यामागे निकोटीन हे सर्वांत मोठे कारण आहे. सिगारेटची रचनाच अशी असते की, ती आपल्या मेंदूपर्यंत निकोटीन वेगाने पोहोचवते.
धूम्रपानामुळे मेंदूत डोपामाईन स्रवते आणि तत्काळ आनंद मिळतो. ही बाब लक्षात घेऊन, जीवनशैलीत काही बदल केल्यास निकोटीनच्या व्यसनावर मात करता येते आणि धूम्रपान सहजपणे थांबवता येते. चला, या उपायांबद्दल जाणून घेऊया…
सिगारेट सोडण्याचे उत्तम उपाय
१. धूम्रपानमुक्तीचे कारण समजून घेऊन आवश्यक मदत मिळवा
जर तुम्हाला धूम्रपान सोडायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तसे का करू इच्छिता याचे कारण शोधा. जर तुम्ही धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतर विविध वर्ग, समुपदेशन आणि उपयुक्त सल्ल्यांचा अवलंब करा.
२. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीची मदत
जेव्हा कधी तुम्हाला निकोटीन सेवनाची तीव्र इच्छा होईल, तेव्हा तुम्ही निकोटीन रिप्लेसमेंट गम, गोळ्या किंवा पॅचेस वापरू शकता. त्याव्यतिरिक्त तुमचे कुटुंब, मित्र आदी सहचरांची मदत घ्या, त्यांचा पाठिंबा मिळवा. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही तुमचे व्यसन लवकर सोडण्याच्या दृष्टीने स्वत:ला मदत करू शकाल.
३. धूम्रपान टाळण्यासाठी प्रयत्नशील राहा
जर तुम्ही मद्यपान करीत असाल, तर तुम्हाला सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. ही इच्छा टाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही लगेच धूम्रपान सोडू शकत नसाल, तर या घातक व्यसनापासून हळूहळू मुक्त होण्याचा प्रयत्न करा.दिवसाला ओढल्या जाणाऱ्या सिगारेटची संख्या कमी करा आणि दोन सिगारेटमधील अंतर वाढवा.
४. काहीतरी चघळत राहा
जेव्हा तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा होईल तेव्हा काहीतरी चघळत राहा. तलफ कमी करण्यासाठी साखरविरहित च्युइंग गम किंवा कडक गोळ्या वापरा. ज्या ज्यावेळी धूम्रपानाची तीव्र इच्छा होईल, त्या त्यावेळी बदाम आणि अक्रोड यांसारख्या सुक्या मेव्याचे सेवन करा. सिगारेटच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी सुकवलेल्या गाजराचे सेवनही उपयुक्त ठरते.
५. दालचिनीचा तुकडा चघळा
सिगारेट ओढण्याची इच्छा झाली की, दालचिनीचा छोटासा तुकडा चघळत राहा. त्याच्या तिखट-गोड चवीमुळे सिगारेटची तलफ कमी होईल. त्याव्यतिरिक्त दालचिनी हा गरम मसाल्यातील एक पदार्थ तुमचे वजन वाढले असल्यास ते कमी करण्यासाठीही खूप लाभदायक आहे. धूम्रपान सोडणे ही एक आव्हानात्मक प्रक्रिया आहे; परंतु ती नक्कीच साध्य होऊ शकते. मनाची तयारी, योग्य तंत्रांचा अवलंब आणि जवळच्या लोकांचे मानसिक पाठबळ यांच्या मदतीने हा प्रवास सोपा होतो. एकदा का धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला, तर त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतात आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे आजच हा निर्णय घ्या आणि आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करा.
६. विश्रांती तंत्रांद्वारे मन:शांती मिळवा
धूम्रपान सोडण्यासाठी तणाव टाळा. आराम करण्याच्या पद्धतींचा अवलंब करा. स्वतःला शांत ठेवा आणि जुन्या पद्धती वापरा. दीर्घकाळ असे केल्याने तुम्हाला सिगारेटचे व्यसन सोडण्यास मदत होऊ शकते.
७. व्यायाम आणि योगा करा
शारीरिक व्यायाम आणि योग संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहेत. शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्याने धूम्रपान करण्याची इच्छा कमी होऊ शकते. त्यामुळे धूम्रपान करण्याची इच्छा कमी होऊन, तुम्हाला ते सोडण्यास मदत मिळू शकते.
