These 5 People Should Never Eat Radish: ही पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाणारी भाजी आहे. कोशिंबीर, भाजी, पराठा अशा विविध प्रकारांनी तिचे सेवन केले जाते. मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय घटक (फायबर), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
मात्र, प्रत्येकासाठी मुळा तितकाच फायदेशीर असेलच, असे नाही. काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींनी मुळ्याचे सेवन टाळणे किंवा मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे; अन्यथा त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. विनोद शर्मा यांच्या मते, “मुळ्यामध्ये अनेक पोषक घटक असले तरी काही आजारांमध्ये त्याचे सेवन त्रास वाढवू शकते. आयुर्वेदानुसार मुळ्याचा स्वभाव उष्ण मानला जातो आणि काही व्यक्तींमध्ये तो पचनावर ताण आणू शकतो.”
मुळ्याचे फायदे काय?
मुळा हा पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानला जातो. तो बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करतो. शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवतो. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो.
मात्र, मुळ्याचे सेवन करताना विशेष काळजी घ्यावी असे पाच प्रकारचे लोक खालीलप्रमाणे :
१. थायरॉईडच्या रुग्णांनी कच्चा मुळा टाळावा
थायरॉईडचा त्रास असलेल्या व्यक्तींनी विशेषतः कच्च्या मुळ्याचे जास्त सेवन करू नये.
डॉ. शर्मा यांनी, “मुळ्यामध्ये गोइट्रोजेनिक घटक असतात. हे घटक थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीवर परिणाम करू शकतात. तसेच त्यामुळे थायरॉईडच्या औषधांचा प्रभावही कमी होण्याची शक्यता असते.” अशा रुग्णांनी मुळा खायचाच असल्यास तो शिजवून आणि मर्यादित प्रमाणात खावा.
२. पचनसंस्था कमकुवत असेल तर सावध राहा
ज्यांना वारंवार गॅस, अॅसिडिटी, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो, त्यांनी मुळ्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे.
मुळ्यामध्ये तंतुमय घटक जास्त असल्याने कमकुवत पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. विशेषतः रिकाम्या पोटी किंवा रात्री मुळा खाल्ल्यास अॅसिडिटी, जळजळ आणि पोटदुखी वाढण्याची शक्यता असते.
३. मूत्रपिंडामध्ये किंवा पित्ताशयात खडे असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
ज्या व्यक्तींना मूत्रपिंडात (किडनी) किंवा पित्ताशयात (गॉल ब्लॅडर) खडे आहेत, त्यांनी मुळा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, काही प्रकरणांमध्ये मुळ्यामधील घटकांमुळे वेदना वाढू शकतात. विशेषतः आधीपासून खडे असल्यास पोटाच्या किंवा कमरेच्या खालच्या भागातील वेदना तीव्र होण्याची शक्यता असते.
४. कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी
मुळा रक्तदाब कमी करण्यास मदत करतो, असे मानले जाते. त्यामुळे ज्यांचा रक्तदाब आधीपासूनच कमी असतो, त्यांनी मुळा जास्त प्रमाणात खाणे टाळावे.
अति प्रमाणात मुळा खाल्ल्यास रक्तदाब आणखी कमी होऊन चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा काही वेळा बेशुद्ध पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
५. अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी मुळा टाळावा
मुळा हा मोहरीच्या कुळातील भाजीपाला आहे. ज्यांना मोहरी, कोबी किंवा या प्रकारातील भाज्यांमुळे अॅलर्जीचा त्रास होतो, त्यांना मुळ्यामुळेही अॅलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते.
त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, घशात जळजळ होणे किंवा सूज येणे, अशी लक्षणे दिसल्यास मुळ्याचे सेवन तत्काळ बंद करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मुळा खाताना या गोष्टी लक्षात ठेवा
- मुळ्याचे अतिसेवन टाळा.
- शक्यतो ताजा आणि स्वच्छ धुतलेला मुळा खा.
- थायरॉईडचा त्रास असल्यास कच्च्या मुळ्याऐवजी शिजवलेला मुळा खाणे अधिक योग्य ठरू शकते.
- कोणताही दीर्घकालीन आजार असल्यास आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(टीप : ही माहिती आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मतांवर आणि उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असते. त्यामुळे कोणत्याही आरोग्य समस्येमध्ये स्वतःहून उपचार किंवा आहारात मोठे बदल करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
