रक्षाबंधन २०२१: रक्षाबंधन या सणाचे महत्त्व, वेळ आणि इतिहास | Loksatta

रक्षाबंधन २०२१: रक्षाबंधन या सणाचे महत्त्व, वेळ आणि इतिहास

राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.

रक्षाबंधन २०२१: रक्षाबंधन या सणाचे महत्त्व, वेळ आणि इतिहास
श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे.

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, तर पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा केला जातो. या वर्षी रक्षाबंधन रविवार २२ ऑगस्ट २०२१ रोजी साजरं करता येणार असून, श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. रक्षाबंधनासंदर्भात आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळून येतो. रक्षाबंधनाची सुरुवात सतयुगापासून झाली, असा दावा देखील केला जातो.

हिंदू पंचांगानुसार, रक्षाबंधन पौर्णिमा ही २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असून २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३१ वाजता संपणार आहे. मात्र राखी बांधण्याची शुभ वेळ २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६.१५ वाजता सुरू होईल. आणि त्याच संध्याकाळी ५.३१ पर्यंत तुम्ही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करू शकतात.

रक्षाबंधनाचे महत्त्व

आपण अनेकदा पाहतो की, कोणत्या न कोणत्या घरात एक बहीण मोठी असते, ती आपल्या भावाचे रक्षण करते. मात्र स्त्री कितीही कमावती, मोठी असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिच्या भावाच्या कतृत्त्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच त्यांच्या नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखीपौर्णिमा साजरी करण्यात येते. या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे. त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. भावाबहिणीचे नाते हे भांडणाचे, खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरातील हिंदू साजरा करतात.

इतिहास

रक्षाबंधन माहिती किंवा रक्षाबंधनाची सुरूवात नक्की कधीपासून आणि कशी झाली, याबाबत कोणताच निश्‍चित पुरावा कोणाकडेच नाही. पण त्याविषयी अगदी पूर्वपरंपरागत एक आख्यायिका सांगितली जाते. इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे.

तसेच महाभारतात श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडी किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले.

भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.

पौराणिक कथा व इतिहास चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे प्रतिक म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-08-2021 at 13:28 IST
Next Story
आज जागतिक मच्छर दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व