श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल आणि सण आले की सुट्ट्या सुद्धा आल्याच. श्रावणात आता येऊ घातलेला सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा ११ ऑगस्ट ला रक्षाबंधन साजरे होणार आहे पण जर कॅलेंडर नीट तपासून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ११ ऑगस्ट नंतर स्मार्ट नियोजन करून तुम्ही चक्क ४-५ दिवस कामातून सुट्टी मिळवू शकता. याच निमित्ताने आपल्या भावंडांसोबत छान ट्रिप प्लॅन करून मस्त चार दिवस फिरूनही येता येईल. पावसाने थोडी उसंत घेतल्याने आता ट्रिपला कुठे जायचं आणि प्लॅनिंग कसं करायचं याचं टेन्शन सुद्धा तुम्ही घेऊ नका, त्यासाठी काही स्वस्त व कमाल पर्याय आपण आज या लेखातून पाहणार आहोत, चला तर मग..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा रक्षाबंधन ११ तारखेला आहे, या दिवशी गुरुवार आहे, जर का तुम्हाला शनिवार- रविवार सुट्टी असेल तर आपण १२ तारखेला म्हणजेच शुक्रवारी एक सुट्टी घेऊन सलग पुढचे ५ दिवस ब्रेक मिळवू शकता. कारण यंदा १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिन सुद्धा सोमवारी आला आहे. तसेच १६ ऑगस्टला सुद्धा पारशी नववर्षानिमित्त अनेक कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे जवळपास एक आठवडा सुट्टी तुम्हाला घेता येऊ शकते. या आठवड्यात चार दिवसाची ट्रिप व पुढील दोन दिवस आराम करून मग पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करू शकता. या ट्रिप साठी काही पर्याय पाहुयात..

समुद्रकिनारी ट्रिप

जर का तुमचे गोवा प्लॅन अनेक वर्षांपासून रखडून असतील तर यंदा भावंडांसोबत चार दिवस गोव्याला जाऊन येऊ शकता. फार लांब जाण्याची इच्छा नसेल तर अलिबाग किंवा रत्नागिरी पर्यंत जाऊन सुद्धा तुम्ही छान समुद्रकिनारी आनंद लुटू शकता. इथे रिव्हर राफ्टिंग चा प्लॅनही करता येईल.

Sister’s Day: भारतात या दिवशी साजरा होतो सिस्टर डे, रक्षाबंधनाच्या आधीच बहिणाबाईला असं करा खुश

कॅम्पिंग व ट्रेकिंग

जर तुमच्या भावंडांना ट्रेकिंगची आवड असेल तर साधारण तीन दिवसात करता येणारे ट्रेक तुम्ही निवडू शकता. दरवर्षी पावसाळ्यात काही ट्रेकिंग गट पन्हाळा- पावनखिंड- विशाळगड अशा ट्रेकचे आयोजन करत असतात, त्यांच्याशी संपर्क करून तुम्हीही या ऍडव्हेंचरचा भाग होऊ शकता. याशिवाय पावना तलाव, कळसुबाई, भंडारदरा अशा ठिकाणी कॅम्पिंगचा पर्याय सुद्धा नक्की विचारात घेता येईल.

फूड ट्रिप

जर का तुम्हाला खाण्याची आवड असेल तर तुमच्या आवडीच्या शहरात एक मस्त फूड ट्रिप करता येईल. अनेकजण इंदोरच्या सराफा बाजारात फूड ट्रिपचे प्लॅन करतात, यानिमित्ताने तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणांची सहल सुद्धा होईल आणि येथील कमाल पदार्थ सुद्धा चाखता येतील. आपण लांब जाण्यासाठी तयार असाल तर दिल्लीच्या खाऊगल्ली विषयी वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे या पर्यायाविषयी सुद्धा भावंडांसोबत चर्चा करून घ्या.

पावसाळी सहलीची ठिकाणे

माथेरान, पाचगणी, लोणावळा यासारख्या ठिकाणी Zostel सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इथे आपण खास डॉर्मेटरी बुक करून राहू शकता. आपण विविध हॉस्टेलच्या सोशल मीडियावरून दरांची माहिती घेऊ शकता. हे पर्याय ग्रुपने गेल्यास बरेच बजेट मध्ये असतात त्यामुळे तुम्हाला अति खर्चात पडायचं नसेल तर अशी एखादी ट्रिप नक्की प्लॅन करता येईल.

रक्षाबंधनाचा सण हा बहीण भावाच्या नात्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आपण कितीही भांडलो तरी भावंडांवर आपला जीव असतोच आणि हेच प्रेम दाखवण्यासाठी अशी एखादी ट्रिप नक्की फायद्याची ठरेल. मज्जा करा आणि भरपूर फोटो काढा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakshabandhan 2022 on 11th august upcoming long holiday plan this budget trips svs
First published on: 03-08-2022 at 10:27 IST