Raw Banana vs Ripe Banana Benefits : निरोगी आरोग्यासाठी आहारात नेहमी आहारात एका फळाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. यात केळी हे एक असे फळ आहे जे प्रत्येत ऋतुत सहज उपल्ब्ध होते. त्यांची चव, त्यातील फायबर आणि असंख्य पोषक तत्वांमुळे ते तुमच्या रोजच्या आहारात पॉवर पॅक आहे. अभ्यासातून असे दिसून आले की, केळी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, शिवाय त्यातील पोषक तत्वे सूज कमी करण्यास आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात.
बाजारात दोन प्रकारची केळी उपलब्ध असतात, कच्ची केळी जी सहसा भाजीसाठी वापरली जातात आणि पिकलेली केळी जी चवीला अधिक गोड आणि मऊ असतात. पण केळी पिकल्याने त्यांच्यातील पौष्टिक घटकांमध्ये किती बदल होतो आणि आरोग्यासाठी कोणती केळी अधिक चांगली आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ..
केळे पिकत असताना त्यातील स्टार्चचा मोठा भाग साखरेत रूपांतरित होतो. यामुळेच पिकलेली केळी कच्च्या केळ्यांपेक्षा जास्त गोड आणि खाण्यास सोपी असतात. पिकलेल्या केळ्यांमध्ये सुमारे ८ टक्के स्टार्च आणि सुमारे ९१ टक्के साखर असते.
पिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान केळ्याच्या रचनेतही बदल होतो, ज्यामुळे ते पचायला सोपे जाते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कच्च्या केळ्यांपेक्षा जास्त असतो. पूर्ण पिकलेल्या केळ्यांमध्ये ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर (TNF) नावाचा एक पदार्थही असतो, ज्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे काही अभ्यासांमधून दिसून आले आहे.
पण पिकलेल्या केळ्यातील वाढलेला गोडवा टाईप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी चिंतेचे कारण ठरु शकतो.
कच्ची केळी सामान्यतः भाजी म्हणून वापरली जातात. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रेझिस्टंट स्टार्चचे (प्रतिरोधक स्टार्चचे) उच्च प्रमाण.
पिकलेली केळी मधुमेहींसाठी हानिकारक ठरू शकतात, तर उच्च रक्तशर्करा असलेल्यांसाठी कच्ची केळी फायदेशीर ठरू शकतात. शिवाय, त्यामध्ये प्रोबायोटिक्सचे प्रमाण जास्त असते, जे आतड्यांचे आणि पोटाचे आरोग्य राखण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
कच्च्या केळ्यांमध्ये अंदाजे ४० टक्के स्टार्च असतो आणि ती पचायला जड जाऊ शकतात. काही लोकांना कच्ची केळी खाल्ल्यानंतर पोट फुगण्याचा आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
कोणतं केळ जास्त फायदेशीर?
पोषणतज्ञांच्या मते, दोन्ही प्रकारच्या केळ्यांचे वेगवेगळे फायदे आहेत. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुम्ही पिकलेली केळी खाणे टाळावे. तुम्ही तुमच्या आरोग्यानुसार केळ्याची निवड करू शकता. दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, आणि दोन्ही विविध पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यामुळे, तुम्ही कोणते केळे निवडावे हे तुमच्या आरोग्यावर अवलंबून आहे.
