Walking For Weight Loss : तुम्ही दररोज १५,००० किंवा त्याहून अधिक पावले चालता का? थांबा! हे तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी सुरक्षित तर नाही ना? आजकाल फिटनेसप्रेमींमध्ये अधिकाधिक चालण्याचा एक नवीन ट्रेंड आहे. लोकांना वाटते की,”तुम्ही जितके जास्त चालाल, तितक्या लवकर चरबी कमी होईल. पण दिवसाला १५,००० पावले चालणे खरोखरच प्रत्येकाच्या शरीरासाठी सुरक्षित आहे का, की त्यामुळे गुडघे आणि पाठीच्या कण्याला गंभीर धोका निर्माण होतो? हा संभ्रम दूर करण्यासाठी अस्थिरोग तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. तज्ज्ञांनी या फिटनेस नियमामागील संपूर्ण सत्य सांगितले आहे.

दररोज १५,००० पावले चालल्याने वजन कमी होते का?(Does Walking 15,000 Steps Daily Help Weight Loss?)

द इंडियन एक्स्प्रेसला याबाबत माहिती देताना केआयएमएस हॉस्पिटल्स ठाणे येथील अस्थिरोग आणि सांधे प्रत्यारोपण विभागाचे सल्लागार डॉ. सारंग देशपांडे सांगतात,”दिवसाला १५,००० पावले चालल्याने वजन कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते, विशेषतः ज्यांची जीवनशैली बैठी आहे त्यांच्यासाठी. चालणे हा एक सोपा आणि कमी ताणाचा व्यायाम आहे जो कॅलरी वापर करण्यास, चयापचय सुधारण्यास आणि सर्वांगीण तंदुरुस्ती वाढविण्यात मदत करतो.”

तज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी फक्त रोज १५,००० पावले चालणेच नव्हे तर त्याबरोबर आहार, झोप आणि तणावाची पातळी नियंत्रित करणे देखील आवश्यक आहे. वय, हार्मोनल घटक आणि नियमितता वजन कमी करण्यास मदत करू शकतात. जर एखादी व्यक्ती दिवसाला १५,००० पावले चालत असेल, पण गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खात असेल, तरीही त्याला वजन कमी करण्यात अडचण येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, चालण्याचा सर्वात मोठा फायदा तेव्हा होतो, जेव्हा लोक ते नियमितपणे आणि दीर्घकाळ करतात. अनेकदा लोक काही काळानंतर कठीण आणि तीव्र व्यायामाचा दिनक्रम सोडून देतात.

कोणत्या परिस्थितीत १५,००० पावले चालल्याने नुकसान होऊ शकते? (Under what circumstances can walking 15,000 steps be harmful?)

प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता त्यांचे वय, वजन आणि सांध्यांच्या स्थितीवर अवलंबून असते. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल आणि हळूहळू आपली सहनशक्ती वाढवत असेल, तर १५,००० पावले चालणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. परंतु जर एखादी व्यक्ती निष्क्रिय जीवनशैलीतून अचानक इतकी पावले चालू लागली, तर तिला गुडघेदुखी, घोटा मुरगळणे, टाचादुखी किंवा पाठदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

ही समस्या विशेषतः जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये, संधिवाताच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या लोकांमध्ये, स्नायू कमकुवत असलेल्या लोकांमध्ये किंवा ज्यांना पूर्वी दुखापत झाली आहे अशा लोकांमध्ये सामान्य आहे. आपल्या शरीराला शारीरिक हालचालींच्या नवीन पातळीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. तज्ज्ञांच्या मते, चांगल्या परिणामांसाठी, जर तुम्हाला चालायचे असेल, तर घाई करण्याऐवजी हळूहळू पावलांची संख्या वाढवणे अधिक सुरक्षित मानले जाते.

वजन कमी करण्यासाठी जास्त ताण देणाऱ्या व्यायामापेक्षा चालणे चांगले आहे का?(Is walking better than high-intensity exercise for weight loss?)

अस्थिरोगविषयक दृष्टिकोनातून, अनेक लोकांसाठी धावणे, उड्या मारणे किंवा उच्च-तीव्रतेचे अंतराल प्रशिक्षण (HIIT) यांसारख्या क्रियांपेक्षा चालण्यामुळे सांध्यांवर कमी ताण येतो. फिटनेस सुरू करण्याचा हा एक सुरक्षित मार्ग असू शकतो, विशेषतः मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिक आणि जास्त वजन असलेल्या लोकांसाठी. नियमित व्यायामामुळे सांध्यांभोवतीचे स्नायू मजबूत होतात, संतुलन सुधारते आणि शरीराची हालचालक्षमता टिकून राहते. पण, केवळ चालणे पुरेसे नाही. उत्तम फिटनेससाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि लवचिकतेचे व्यायाम देखील महत्त्वाचे आहेत, कारण मजबूत स्नायू सांध्यांना चांगला आधार देतात आणि दुखापतीचा धोका कमी करतात.

तज्ज्ञांनी सांगितली रोज चालण्याची सुरक्षित मर्यादा (Experts Reveal the Ideal Daily Step Count)

तज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज चालायचे असेल, तर किती पावले चालला यापेक्षा नियमिततेवर लक्ष केंद्रित करा. दररोज सलग ७,००० ते १०,००० पावले जरी चाललात, तरी ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चालताना नियमांचे पालन करा. आरामदायक आणि आधार देणारे बूट घाला. पुरेसे पाणी प्या आणि विशेषतः उष्ण हवामानात अतिश्रम टाळा. तज्ञांच्या मते, चालताना गुडघ्यात वेदना, सूज किंवा धाप लागण्यासारख्या समस्या येत असतील, तर स्वतःवर जास्त ताण देण्याऐवजी वेग कमी करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या

टीप -वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.