Emergency C Section Causes : महिला गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत पूर्णपणे निरोगी असतात आणि डॉक्टरही त्यांची प्रकृती पाहून नॉर्मल डिलिव्हरीचा सल्ला देतात. परंतु, प्रसूतीच्या वेळी काही आपत्कालीन परिस्थितीत महिलांची सर्जरी करावी लागू शकते. यामागची कारणं क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, चंदीगढच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या असोसिएट डायरेक्टर डॉ. मोनिका अग्रवाल यांनी सविस्तरपणे सांगितली आहेत.

बऱ्याचदा प्रसूतीदरम्यान आई किंवा बाळाच्या प्रकृतीत असे काही बदल होतात, ज्यामुळे डॉक्टरांना डिलिव्हरीची पद्धत बदलावी लागते. अशा वेळी डॉक्टर आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात.

नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी इमर्जन्सी सर्जरीची ६ प्रमुख कारणे:

१. बाळाच्या हृदयाचे ठोके (Heart Rate) सामान्य नसणे :

डॉ. मोनिका अग्रवाल यांच्या मते, इमर्जन्सी सी-सेक्शनची गरज भासण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बाळाच्या ह्रदयाचे ठोके असामान्य असणे होय. प्रसूती कळा सुरू झाल्यावर बाळाच्या हृदयाचे ठोके तपासले जातात. जर मॉनिटरिंगदरम्यान डॉक्टरांना असे वाटले की, बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाहीये आणि परिस्थितीत सुधारणा होत नाहीये, तर डॉक्टर तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेऊ शकतात, कारण नॉर्मल डिलिव्हरी सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते.

२. प्रसूती प्रक्रिया (Labor) पुढे न सरकणे :

काही प्रकरणांमध्ये कळा सुरू झाल्यानंतर डिलिव्हरीसाठी खूप जास्त वेळ लागतो. कळा येत असूनही जर गर्भाशयाचे तोंड उघडत नसेल किंवा बाळ खाली सरकत नसेल, तर डॉक्टर महिलेची स्थिती तपासतात. हीच स्थिती बऱ्याच वेळ राहिल्यास, आई आणि बाळाच्या सुरक्षेसाठी डिलिव्हरीची पद्धत बदलावी लागते.

३. बाळाच्या पोझिशनमध्ये बदल होणे :

काही वेळा शेवटच्या क्षणी बाळाची पोझिशन बदलू शकते. यामध्ये बाळ ‘ब्रीच पोझिशन’मध्ये (म्हणजेच डोके खाली असण्याऐवजी वर किंवा विरुद्ध दिशेने) असू शकते. अशा स्थितीत नॉर्मल डिलिवरी केल्यास बाळाचा खांदा अडकण्याची शक्यता वाढते. अशा आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी डॉक्टर सी-सेक्शनचा सल्ला देतात.

४. अचानक जास्त रक्तस्राव (Bleeding) होणे :

कळा सुरू असताना काही महिलांना अचानक तीव्र रक्तस्राव होऊ लागतो. अशा वेळी प्लेसेंटाशी (गर्भनाळ) संबंधित समस्यांचा धोका खूप वाढतो. ही आई आणि बाळ दोघांसाठीही धोक्याची घंटा असू शकते. अशा प्रकरणात डॉक्टर त्वरीत डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतात आणि सी-सेक्शन करू शकतात.

५. गर्भनाळ (Umbilical Cord) खाली सरकणे :

डॉ. मोनिका अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार, संपूर्ण प्रेग्नन्सी सामान्य असते, पण डिलिव्हरीच्या आधी कधीतरी गर्भनाळ दाबली जाते किंवा बाळाच्या आधी ती खाली येते. ही एक इमर्जन्सी स्थिती असू शकते, कारण यामुळे बाळाला ऑक्सिजन मिळणे कठीण होते. अशा वेळी वेळेवर डिलिव्हरी करणे अत्यंत गरजेचे असते.

६. बाळाने पोटात शी (Meconium) करणे :

कधीकधी बाळ आईच्या पोटातच शी (मेकोनियम) करते. अशा स्थितीत बाळाभोवतीच्या पाण्याचा रंग बदलतो आणि बाळ श्वास घेताना ते त्याच्या फुप्फुसात जाण्याची शक्यता वाढते. या स्थितीत लेबर पेनदरम्यान इमर्जन्सी सी-सेक्शन करण्याची गरज भासू शकते.

डॉक्टरांचा सल्ला :

डॉ. मोनिका अग्रवाल सल्ला देताना सांगतात की, प्रसूती कळा जास्त असणे किंवा प्रसूतीला थोडा वेळ लागणे म्हणजे नेहमीच सर्जरीची गरज असते असे नाही. डॉक्टर नेहमी बाळ आणि आईची वैद्यकीय स्थिती (Medical Condition) व इतर समस्या पाहूनच सर्जरीचा निर्णय घेतात. डॉक्टरांसाठी प्रसूतीदरम्यान आई आणि बाळाची सुरक्षा हीच सर्वात महत्त्वाची असते.