Cold Cough Symptoms And Causes : हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसह अनेक हंगामी संसर्गजन्य आजार होत असतात. यात अनेकांना सतत सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवतो. अशावेळी औषध घेऊनही एक दोन दिवस आराम मिळतो, पण पुन्हा तिसऱ्या दिवशी तोच त्रास जाणवू लागतो. यावर काय उपाय करावा सुचत नाही. दरम्यान, मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन डॉ. हनी सावला यांनी काही उपाय सुचवले आहेत, जे करून तुम्ही सततच्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवू शकता.

वारंवार सर्दी, खोकला होतो का?

हंगामी सर्दी बहुतेकदा तापमानातील चढउतार, आर्द्रतेतील बदल किंवा वाढत्या प्रदूषण पातळीमुळे होते. या परिस्थितीत विषाणू सहजपणे पसरतात आणि शरीराला परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. थंड हवा, ओले कपडे किंवा वातानुकूलित वातावरणाच्या अचानक संपर्कामुळे नाकाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. जे लोक वारंवार प्रवास करतात, जास्त वेळ काम करतात किंवा अनियमित झोपेचे प्रमाण असते त्यांना सर्दी होण्याची शक्यता जास्त असते.

कमकुवत प्रतिकारशक्तीदेखील वारंवार सर्दी आणि फ्लूचे एक कारण असू शकते. झोपेचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, डिहायड्रेशन आणि जास्त ताण या सर्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.
जेव्हा शरीर थकलेले असते किंवा पोषणाची कमतरता असते, तेव्हा शरीराला सौम्य लक्षणे असलेल्या विषाणूंशीदेखील लढण्यासाठी जास्त वेळ लागतो.

मुले, वृद्ध आणि मधुमेह किंवा इतर कोणत्याही आरोग्य स्थितीने ग्रस्त असलेल्या लोकांना हंगामी संसर्गाचा धोका जास्त असतो.

सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी उपाय

१) सर्वप्रथम चांगली झोप घ्या, जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.
२) संतुलित जेवण घ्या. तुमच्या रोगप्रतिकारक पेशींना बळकटी देण्यासाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या आणि प्रथिने समाविष्ट करा.
३) बाहेरून आल्यानंतर हात धुवा आणि शिंकताना किंवा खोकताना तोंड झाकून घ्या.
४) हवामानानुसार योग्य कपडे घाला.थंडी असताना संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला.
५) प्रदूषणादरम्यान चेहऱ्याला मास्क लावा.
६) रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी दररोज थोडे चाला.

जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल, ताप येत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या या टिप्स तुम्हाला सर्दी, खोकला आणि हंगामी संसर्ग टाळण्यास मदत करू शकतात.