Acidity : तुम्हाला वारंवार छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो का? बहुतेक लोक याकडे केवळ गॅसची समस्या समजून दुर्लक्ष करतात. ते आराम मिळावा म्हणून अँटासिडची गोळी घेतात आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. तथापि, डॉ. शिवम कालिया (सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल नोएडा) यांच्या मते, वारंवार होणारा ॲसिडिटीचा त्रास नेहमीच मसालेदार पदार्थ किंवा तणावामुळे होत नाही; तो पोटातील हेलिकोबॅक्टर पायलोरी (H. pylori) नावाच्या जीवाणूमुळेदेखील होऊ शकतो.

हेलिकोबॅक्टर पायलोरी जीवाणू काय करतात?

हे जीवाणू पोटाच्या आतील आवरणात शिरतात आणि हळूहळू त्याला नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे आम्लपित्त, पोटातील अल्सर आणि सतत जळजळ होण्यासारख्या समस्या उद्भवतात. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे या आरोग्य समस्येवर उपचार केले न गेल्यास, दीर्घकाळात पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)देखील या समस्येकडे पोटाच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण म्हणून पाहिले आहे.

गॅसच्या समस्यांबाबत तुम्ही केव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे?

  • कैक महिन्यांपासून वारंवार होणारा आम्लपित्ताचा त्रास
  • जेवणानंतर पोटात सतत जडपणा जाणवणे
  • अकारण वजन घटणे
  • काळी विष्ठा किंवा रक्त
  • भूक अचानक कमी होणे
  • जर ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिली, तर त्यांच्याकडे केवळ गॅस आहे, असे समजून दुर्लक्ष करणे योग्य नाही.

तुम्हाला वारंवार गॅसचा त्रास होत असेल, तर काय करावे?

जर तुम्हाला वारंवार गॅस आणि आम्लपित्ताचा त्रास होत असेल, तर घाबरण्याची गरज नाही. हेलिकोबॅक्टर पायलोरीचे निदान एका साध्या श्वास तपासणी, रक्त तपासणी किंवा एंडोस्कोपीद्वारे केले जाऊ शकते. जर हे जीवाणू आढळले, तर अँटीबायोटिक्सच्या अल्पकालीन कोर्सने त्यावर यशस्वीपणे उपचार करता येतात.

पोटाचा कर्करोग होऊ शकतो

सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे आजच्या प्रगत एंडोस्कोपी तंत्रज्ञानामुळे (जसे की एनबीआय आणि हाय-डेफिनिशन एंडोस्कोपी) पोटाचा कर्करोग अगदी सुरुवातीच्या टप्प्यात शोधता येतो, जेव्हा उपचार अधिक सोपे आणि प्रभावी असतात. त्यामुळे लक्षणे कायम असताना वेळेवर एंडोस्कोपी करून घेणे जीव वाचवणारे ठरू शकते.

लक्षात ठेवा :

वारंवार होणारा आम्लपित्ताचा त्रास हा तुमच्या शरीराकडून मिळणारा एक संकेत आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी करून घेणे हाच सर्वांत शहाणपणाचा उपाय आहे.