Home Remedy For Red Ants: हवामानात थोडाफार बदल झाला की, घरामध्ये डास, कीटक, मुंग्या दिसू लागतात. दरम्यान, अनेक घरांमध्ये मुंग्या आढळतातच. त्या अगदी स्वयंपाकघरापासून बाथरूम आणि बेडरूममध्येही दिसून येतात. अशा वेळी जर काळ्या मुंग्या असतील, तर त्यांचा फार त्रास होत नाही. परंतु, काही वेळा या मुंग्या अगदी बारीक लाल असतात, ज्या त्रासदायक ठरू शकतात. अशा वेळी कीटकनाशकांचा वापर करून आपण मुंग्यांपासून सुटका करून घेतो; पण या मुंग्या पुन्हा पुन्हा येत राहतात. कधी कधी त्यांच्यापासून सुटका करून घेणे खूप कठीण असते. तथापि, काही घरगुती उपायांच्या मदतीने, तुम्ही कोणत्याही रसायनाशिवाय या मुंग्यांना तुमच्या घरातून सहजपणे हाकलून लावू शकता. आम्ही तुम्हाला घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी अतिशय सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे घरात पुन्हा एकही मुंगी दिसणार नाही.
मुंग्यांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय
- मुंग्यांना पुदिन्याचा तीव्र वास आवडत नाही. कापसाच्या बोळ्यांवर पुदिना किंवा लवंग तेलाचे काही थेंब टाका आणि मुंग्या वारंवार येतात अशा ठिकाणी ते ठेवा. त्यामुळे त्या वासाचा त्रास झाल्याने मुंग्या तेथून दूर निघून जातील.
- जर तुम्हाला तुमच्या घरात कुठेही मुंग्यांचा समूह दिसला, तर ताबडतोब त्यांच्यावर व्हिनेगर स्प्रे करा. व्हिनेगरला तीव्र वास असतो, जो मुंग्यांना दूर ठेवतो. त्यामुळे व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळून ते द्रावण स्प्रे बाटलीमध्ये भरून, तो स्प्रे मुंग्यांवर फवारा.
- स्वयंपाकघरात मुंग्या वारंवार येतात अशा ठिकाणी लवंग किंवा त्यांची पावडर शिंपडा. लवंगांचा तीव्र वास मुंग्यांना दूर ठेवतो. तुम्ही पाण्यात लवंग पावडर मिसळून, ते द्रावण फवारून मुंग्यांना पळवून लावू शकता.
- लसणाच्या चार किंवा पाच पाकळ्या बारीक करून, त्यांचा रस काढा आणि मुंग्या जास्त आढळणाऱ्या ठिकाणी त्याची फवारणी करा.
- पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही हे द्रावणदेखील फवारू शकता.
- हळद आणि तुरटी समान प्रमाणात घ्या. तुरटी बारीक करून, पावडर करा. दोन्ही पावडरी थोडी थोडी एकत्र मिसळा आणि ती संमिश्र पावडर मुंग्या वारंवार येणाऱ्या ठिकाणी शिंपडा.
- तमालपत्रांचा तीव्र वास मुंग्यांनाही आवडत नाही. स्वयंपाकघरातील कॅबिनेट, साखरेच्या डब्यात किंवा धान्याच्या डब्यात तमालपत्र ठेवा. त्यामुळे मुंग्या दूर राहतीलच, त्याशिवाय कीटकही दूर होतील.
- कापराला तीव्र वास असतो, जो मुंग्यांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही कापूर पाण्यात मिसळून स्प्रे बनवू शकता. त्याव्यतिरिक्त तुमच्या स्वयंपाकघरात आणि खोलीत हळद पावडर शिंपडा. हळदीमध्ये कीटक, डास, माश्या व मुंग्यांनादेखील दूर करण्याची क्षमता आहे.
- लाल मुंग्यांपासून सुटका करून घेण्यासाओठी कापराचे ४-५ तुकडे घ्या. ते वर्तमानपत्रात गुंडाळा आणि ते कुस्करून घ्या. अर्धा लिटर पाणी गरम करा आणि ते स्वच्छ भांड्यात ओता. त्यात कापूर पावडर टाका. एक टोपण डेटॉल, दोन चमचे बोरिक अॅसिड व एक चमचा व्हिनेगर टाका आणि पूर्णपणे मिसळा. त्यानंतर ते बाटलीत भरा. नंतर तुम्ही मुंग्यांवर हे द्रावण फवारू शकता. ते अत्यंत प्रभावी आहे. भिंती, फुलदाण्या, स्वयंपाकघर आणि शौचालयात जिथे जिथे तुम्हाला मुंग्या दिसतात तिथे तिथे या द्रवाची फवारणी करा. मुंग्या जमिनीवर येऊ नयेत म्हणून तुम्ही हे द्रावण जमीन पुसण्याच्या पाण्यातदेखील मिसळू शकता.
