Red bumps fungal infection: त्वचेवर अचानक लहान पुरळ किंवा फोड येणे आणि त्यासोबत जळजळ, टोचल्यासारखे वाटणे व वेदना होणे याला अनेकदा त्वचेची एक सामान्य समस्या समजण्याची चूक केली जाते. तथापि, जर ही लक्षणे शिंगल्स किंवा हर्पिस झोस्टरमुळे असतील, तर समस्या केवळ त्वचेपुरती मर्यादित नसते.
संशोधनातून असे दिसून आले आहे की, नागीण झाल्यानंतर पक्षाघात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. संसर्गानंतरचे पहिले काही दिवस आणि आठवडे विशेषतः महत्त्वाचे असतात. म्हणून नागीण म्हणजे काय आणि त्यामुळे पक्षाघात व हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कसा वाढतो, हे जाणून घ्या.
शिंगल्स म्हणजे काय?
नागीण हा आजार कांजिण्यांना कारणीभूत असलेल्या त्याच विषाणूमुळे होतो. याला व्हॅरिसेला-झोस्टर विषाणू, असे म्हणतात. कांजिण्या बऱ्या झाल्यानंतर, हा विषाणू शरीरातून पूर्णपणे नाहीसा होत नाही. त्याऐवजी तो चेतापेशींमध्ये सुप्त अवस्थेत राहतो. अनेक वर्षांनंतर, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे हाच विषाणू पुन्हा सक्रिय होऊन नागीणच्या स्वरूपात होऊ शकतो. त्यामध्ये सामान्यतः शरीराच्या किंवा चेहऱ्याच्या एका बाजूला फोड येतात. त्यानंतर वेदना, जळजळ, खाज किंवा मुंग्या येणे, अशी लक्षणे दिसतात. पुरळ अनेकदा शरीराच्या एका बाजूला चेतांच्या मार्गावर दिसून येते. काही दिवसांतच या फोडांवर खपली धरते आणि सुमारे दोन ते चार आठवड्यांत ते बरे होतात.
वेदना कमी झाल्यानंतरही समस्या कायम राहण्याची शक्यता
नागीणच्या सर्वांत सामान्य गुंतागुंतींपैकी एक म्हणजे पोस्टहर्पेटिक न्यूराल्जिया म्हणजेच दीर्घकाळ टिकणारी नसांची वेदना. ही स्थिती नागीण झालेल्या अंदाजे १० ते १८ टक्के लोकांमध्ये आढळते आणि वाढत्या वयानुसार याचा धोका वाढतो. काही लोकांमध्ये पुरळ गेल्यानंतरही बाधित भागातील वेदना काही महिने कधी कधी तर वर्षे टिकून राहते. जर संसर्ग चेहऱ्यावर किंवा डोळ्यांच्या आसपास असेल, तर त्याचा डोळ्यांवर आणि दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. क्वचित प्रसंगी हा विषाणू एन्सेफलायटीस (मेंदूची सूज) सारख्या गंभीर मज्जासंस्थेच्या समस्या निर्माण करू शकतो.
नागीण आणि पक्षाघात यांच्यात काय संबंध?
अनेक अभ्यासांमधून हर्पिस झोस्टरनंतर पक्षाघाताचा (स्ट्रोकचा) धोका वाढल्याचे दिसून आले आहे. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हा धोका अधिक असल्याचे दिसते. संशोधकांच्या मते, याचे कारण व्हॅस्क्युलोपॅथी असू शकते, जो या विषाणूशी संबंधित रक्तवाहिन्यांच्या सुजेचा एक प्रकार आहे. संशोधनातून शिंगल्स आणि हृदयविकाराच्या झटक्यासह इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी घटनांमध्ये संबंध असल्याचेही दिसून आले आहे. काही अभ्यासांमध्ये पक्षाघात आणि कोरोनरी हृदयरोगाचा वाढलेला धोकादेखील आढळला आहे.
नागीण कशी टाळावी?
भारतात नागीण टाळण्याचा सर्वांत प्रभावी आणि प्राथमिक मार्ग म्हणजे लसीकरण. ही लस विषाणूला पुन्हा सक्रिय होण्यापासून रोखते आणि तीव्र वेदनांचा धोका कमी करते. तुमच्या घरातील कोणाला नागीण झाली असल्यास, त्यांच्या फोडांना किंवा पुरळांना थेट स्पर्श करणे टाळा आणि पुरळ स्वच्छ व झाकून ठेवा. समस्या अधिक गंभीर होण्यापूर्वी डॉक्टरांना दाखवणेदेखील फायदेशीर ठरते.
