Red Grapes Benefits: फळे हा संतुलित आणि पौष्टिक आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. विविध प्रकारच्या फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, नैसर्गिक साखर, तंतुमय पदार्थ, पाणी आणि अनेक जैवसक्रिय घटक आढळतात. त्यामुळे रोजच्या आहारात ऋतूनुसार आणि उपलब्धतेनुसार फळांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. सफरचंद, पेरू, संत्री, मोसंबी, डाळिंब, पपई, केळी, चिकू, कलिंगड, खरबूज, आंबा, द्राक्षे यांसारख्या फळांमध्ये पोषक तत्त्वांचे प्रमाण आणि स्वरूप वेगवेगळे असते. उदाहरणार्थ- संत्री आणि मोसंबीसारख्या फळांमधून क जीवनसत्त्व मिळते, तर केळ्यामध्ये पोटॅशियम आणि ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स असतात. पेरू आणि सफरचंदासारख्या फळांमध्ये तंतू हा उपयुक्त घटक असतो. पपईमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि पाणी असते; तर डाळिंबामध्ये पॉलीफेनॉलसारखे वनस्पतीजन्य घटक आढळतात.
फळांमधील तंतुमय पदार्थ पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. आहारातील तंतुमय पदार्थामुळे पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होते आणि नियमित शौचास मदत होऊ शकते. फळांमध्ये नैसर्गिकरीत्या असलेले पाणी शरीराच्या दैनंदिन द्रव गरजेतही योगदान देते. त्याशिवाय फळांमध्ये आढळणारे विविध अँटिऑक्सिडंट आणि वनस्पतीजन्य घटक शरीराच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्याच्या प्रक्रियेत भूमिका बजावतात.
द्राक्षे ही चवीला गोड, रसाळ आणि अनेकांच्या आवडीची फळे आहेत. बाजारात हिरवी, काळी, लाल, जांभळी अशा विविध रंगांची द्राक्षे पाहायला मिळतात. प्रत्येक रंगाच्या द्राक्षांमध्ये नैसर्गिक वनस्पतीजन्य घटकांचे प्रमाण आणि प्रकार या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात.
हिरवी द्राक्षे साधारणपणे गोड-आंबट चवीची असतात आणि त्यामध्ये क जीवनसत्त्व, पाणी व तंतू मिळतात. काळी आणि जांभळी द्राक्षे त्यांच्या गडद रंगासाठी ओळखली जातात. या रंगामध्ये अँथोसायनिनसारखे नैसर्गिक रंगद्रव्ये असतात. लाल द्राक्षांमध्येही विविध पॉलीफेनॉल आणि अँटिऑक्सिडंट हे घटक आढळतात. त्यामुळे रंग वेगळा असला तरी सर्व प्रकारच्या द्राक्षांचा संतुलित आहारात समावेश करता येतो. द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने ती रसाळ आणि ताजेतवानी वाटतात. त्यातील नैसर्गिक साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते; तर तंतू हा घटक पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र,द्राक्षे गोड असल्याने ती प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. द्राक्षांचा रस करण्याऐवजी संपूर्ण द्राक्षे खाल्ल्यास त्यातील तंतूही मिळतात.
लाल द्राक्षे खाण्याचे फायदे
अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत
लाल द्राक्षांच्या सालीच्या आवरणामध्ये अँथोसायनिन्स आणि इतर पॉलीफेनॉलसारखे वनस्पतीजन्य घटक आढळतात. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्याच्या प्रक्रियेत भूमिका बजावतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
द्राक्षांमधील पॉलीफेनॉल्स आणि पोटॅशिय,म यांसारखे घटक हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहाराचा भाग ठरू शकतात. मात्र द्राक्षे कोणत्याही हृदयरोगावर उपचार नाहीत.
रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास मदत
लाल द्राक्षांतील काही पॉलीफेनॉल्स रक्तवाहिन्यांच्या सामान्य कार्याला मदत करू शकतात. त्यामुळे संतुलित आहारात त्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
पचनासाठी फायदेशीर
लाल द्राक्षांमध्ये तंतू हा घटक असतो. त्यामुळे त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास, त्यातील तंतूंमुळे नियमित पचन आणि शौचास मदत मिळू शकते.
शरीराला हायड्रेशन मिळण्यास मदत
द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे उन्हाळ्यात किंवा शरीराला द्रवाची गरज असताना फळ म्हणून द्राक्षे उपयुक्त ठरू शकतात.
त्वचेसाठी उपयुक्त पोषक घटक
लाल द्राक्षांमधील क जीवनसत्त्व आणि पॉलीफेनॉल्स शरीरातील अँटिऑक्सिडंट संरक्षणात भूमिका बजावतात. संतुलित आहारासोबत द्राक्षांचे सेवन हे त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकते.
मेंदूच्या आरोग्यासाठी वनस्पतीजन्य घटक
द्राक्षांतील पॉलीफेनॉल्सवर मेंदू आणि संज्ञानात्मक आरोग्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे. मात्र, द्राक्षे स्मरणशक्ती वाढवतात किंवा मेंदूचे आजार टाळतात, असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही.
जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात
लाल द्राक्षांमधून क व के ही जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि काही इतर सूक्ष्म पोषक घटक मिळतात.
व्यायामानंतर हलका स्नॅक
द्राक्षांमधील नैसर्गिक कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळू शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात द्राक्षे स्नॅक म्हणून घेता येतात.
संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले
लाल द्राक्षांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण द्राक्षे खाल्ल्यास तंतू हा घटक मिळतो आणि पोट भरल्याची भावना अधिक वेळपर्यंत राहू शकते. त्यामुळे द्राक्षे शक्यतो सालीसह स्वच्छ धुऊन, ती संपूर्ण स्वरूपात खाणे योग्य ठरते.
