Fridge Summer Settings : उन्हाळ्यात प्रत्येक घरात रेफ्रिजरेटरचा वापर केला जातो. याचा उपयोग खाद्यपदार्थ खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आणि अगदी पाणी, दही, दूध थंड ठेवण्यासाठीही केला जातो. पण, उन्हाळ्यात फ्रिजची कूलिंग सुद्धा कमी वाटते, फ्रिज व्यवस्थित काम करत नाही अशी आपल्या सगळ्यांचीच तक्रार असते. पण, फ्रिज खराब होत नाही तर कदाचित तुमच्या सेटिंगमध्ये गडबड असते. अशावेळी योग्य सेटिंग्ज सेट करणे आवश्यक असते. असे केल्याने, रेफ्रिजरेटर व्यवस्थित कूलिंग देऊ शकतो आणि यामुळे ओव्हरलोड किंवा ओव्हरहीटिंगसारख्या समस्या देखील टाळता येतात.

तर नक्की काय सेटिंग केली पाहिजे?

सर्वप्रथम टेम्परेचर बदला

उन्हाळ्यात आपण अनेकदा फ्रिज दिवस-रात्र चालू ठेवतो. पण, त्याचे तापमान बदलायला विसरतो. उन्हाळा सुरू झाल्यावर, डिजिटल थर्मोस्टॅट सर्वात कमी तापमानावर सेट करा. जर तुमच्या रेफ्रिजरेटरवर १ ते ५ अंक असलेला डायल असेल, तर तो १ किंवा २ वर सेट करा. जर त्यावर ‘कोल्ड’ पासून ‘कोल्डेस्ट’ असे लिहिले असेल तर तापमान ‘कोल्डेस्ट’वर सेट करा. यामुळे थंडावा वाढतो.

उन्हाळ्यात हवा खेळती राहील असं बघा

हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे फ्रिजला जास्त मेहनत करावी लागत नाही. उन्हाळा सुरू झाल्यावर, तापमान टिकवून ठेवण्यासाठी फ्रिजला अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे, हवा खेळती ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. फ्रिजमधील व्हेंटिलेशन व्हेंट्स (हवा खेळती ठेवण्याची छिद्रे) मध्ये कोणताही अडथळा येणार नाही असं बघा. म्हणजेच, त्यांच्या थेट समोर कोणतीही वस्तू ठेवू नका.

Award Banner

हवेचा प्रवाह योग्य ठेवा

उन्हाळ्यात तुमचा फ्रिज भिंतीला लागून ठेवू नका. यामुळे हवेच्या योग्य प्रवाहात अडथळा येतो. रेफ्रिजरेटर भिंतीपासून किंचित दूर ठेवा, विशेषतः मागच्या बाजूने. तसेच फ्रिजच्या वर वस्तू ठेवू नये. कारण फ्रिज चालू असताना त्यातून थोडी उष्णता बाहेर पडते. जर वर सामान ठेवले असेल, तर ती उष्णता नीट बाहेर जाऊ शकत नाही.

अँटी-फ्रॉस्ट किंवा डीफ्रॉस्ट सेटिंग

फ्रिजमध्ये जर बर्फाची जाड थर (ice build-up) साचली, तर फ्रिजला थंड करणे अवघड होते. बर्फामुळे आतली हवा नीट फिरत नाही आणि कूलिंग कमी होते. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच फ्रिज डिफ्रॉस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे साचलेली बर्फाची थर काढली जाते आणि फ्रिज पुन्हा चांगले थंड करू लागते. काही फ्रिज (जसे साधे किंवा जुने मॉडेल) आपोआप बर्फ काढू शकत नाहीत, त्यामुळे वापरकर्त्याला मॅन्युअली डिफ्रॉस्ट करावे लागते.