Cooking Oil Reheating Risks: स्वयंपाकघरात आपण अनेकदा डीप फ्राय केल्यानंतर उरलेले तेल पुन्हा वापरतो. खर्च वाचवण्याचा हा सोपा मार्ग वाटतो. मोठ्या फास्ट फूड दुकानांमध्येही तेलाचा वारंवार वापर होताना दिसतो; पण हीच सवय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते का? तज्ज्ञांच्या मते याचे धक्कादायक उत्तर होय, असे आहे.
डॉ. प्रियंका सेहरावत या AIIMS मध्ये प्रशिक्षित जनरल फिजिशियन व न्यूरोलॉजिस्ट असून, सध्या गुरुग्राम येथील ‘द न्यूरोमेड क्लिनिक’शी संलग्न आहेत. त्या सांगतात की, स्वयंपाकाचे तेल वारंवार गरम केल्यास दीर्घकाळात गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात.
तेल वारंवार गरम केल्यावर नेमके काय होते?
डॉ. सेहरावत यांच्या मते, डीप फ्रायसाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा तापवले की, त्याची रासायनिक रचना बदलू लागते. तेलातील घटक तुटू लागतात आणि त्यातून अपायकारक रसायने तयार होतात. अलीकडेच जयपूरमधील एका फास्ट फूड दुकानात झालेल्या पाहणीत तेलाचा एकच साठा इतक्या वेळा तापवला गेला होता की, ते पूर्णपणे काळे पडले होते. हे तेल खराब झाल्याचे स्पष्ट लक्षण आहे.
अशा तेलातून कर्करोगास कारणीभूत ठरू शकणारे ‘कार्सिनोजेनिक’ संयुग, टोटल पोलर कंपाउंड्स, पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन (PAHs), ट्रान्स फॅट्स आणि फ्री रॅडिकल्ससारखे धोकादायक घटक तयार होतात. हे घटक शरीरात दाह निर्माण करतात, पेशींना हानी पोहोचवतात आणि डीएनएचे नुकसान करतात. दीर्घकाळ असे अन्न सेवन केल्यास गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते.
फक्त कर्करोगच नव्हे, हृदयालाही धोका
वारंवार गरम केलेले तेल केवळ कर्करोगाचा धोका वाढवत नाही, तर हृदयाच्या आरोग्यासाठीही मोठे संकट ठरू शकते. अशा तेलात बनवलेले पदार्थ नियमित खाल्ल्यास वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर साचण्याचा धोका वाढतो. परिणामी हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदयविकारांचा संभव अनेक पटींनी वाढतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा विषारी घटकांचा परिणाम हळूहळू दिसतो. सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. मात्र, कालांतराने शरीरावर त्याचा दुष्परिणाम स्पष्ट होतो. त्यामुळे आज घेतलेला छोटा निर्णय उद्या मोठा आजार टाळू शकतो.
सुरक्षित पर्याय कोणते?
खर्च वाचविण्यासाठी तेल पुन्हा डीप फ्रायसाठी वापरणे टाळलेलेच बरे. तरीही तेल पूर्णपणे फेकून देणे शक्य नसेल, तर काही मर्यादित उपाय करता येतात. वापरलेले तेल स्वच्छ गाळून हवाबंद डब्यात साठवावे. ते एक ते दोन दिवसांच्या आत केवळ हलक्या वापरासाठी- उदा. फोडणीसाठी वापरावे. मात्र, तेच तेल पुन्हा उच्च तापमानावर डीप फ्रायसाठी वापरणे टाळावे.
तेल जितक्या वेळा तापवले जाते, तितक्या वेगाने त्याची गुणवत्ता खालावते आणि अपायकारक संयुगांची निर्मिती वाढते. त्यामुळे स्वयंपाकघरातील ही साधी सवय बदलणे अत्यावश्यक आहे.
आरोग्य हेच खरे धन आहे. काही रुपयांची बचत करण्यासाठी आपण नकळत मोठ्या आजारांना आमंत्रण देत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे.
