शैलजा तिवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानसिक आजार म्हटले की सर्वसामान्यपणे आक्रमक होणाऱ्या, असंबंध बोलणाऱ्या किंवा नुसत्याच गप्प राहणाऱ्या व्यक्ती आपल्या डोळय़ासमोर येतात. मानसिक आजार हा शरीराशी संबंधित असून मधुमेह, उच्च रक्तदाब या इतर आजारांशीही निगडित असतो, हे मानायला अजूनही आपण फारसे तयार नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाच्या रुग्णांना मानसिक उपचार किंवा समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे डॉक्टर सांगताच आम्ही काय वेडे झालोय का, अशी पहिली प्रतिक्रिया येते.

हृदय, हाडे, फुप्फुस, पोट, नाक, कान, डोळे इत्यादी शरीराचे अवयव आहेत. या अवयवांना झालेल्या आजाराला सर्वसाधारणपणे आपण शारीरिक आजार म्हणतो आणि याचे उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातो. काही शारीरिक आजारांमध्ये मानसिक आजाराचा सहभाग असतो. त्यामुळे अशा आजारांमध्ये आवश्यकता असल्यास मानसिक आजारावरील उपचार घेणे गरजेचे असते. याबाबतचा अनुभव सांगताना, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे सांगतात, काही आजारांमध्ये जेव्हा रुग्णांना मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञांची मदत घेण्याचा सल्ला डॉक्टरांमार्फत दिला जातो, तेव्हा हे रुग्ण आमच्यापर्यत आल्यावर मला तुमच्याकडे का पाठवले? मी वेडा आहे का? हा पहिला प्रश्न असतो. काही शारीरिक आजार हे मानसिक आजाराशी संबंधित असतात याबाबत मुळातच जनजागृती फारशी नसल्याचे अनेकदा जाणवते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आजारांचा एकमेकांशी संबध का आणि कसा आहे समजून घेणे गरजेचे आहे.

मानसिक आणि शारीरिक आजार संबंध

याबाबत अधिक सविस्तर सांगताना डॉ. देशपांडे म्हणाले, शरीराचे अवयव जसे शरीराचा भाग आहेत. तसे मेंदू हादेखील शरीराचा भाग आहे. त्यामुळे मेंदूचे आजारही शारीरिक आजारच आहे. या आजारांना मानसिक आजार हा खरंतर फारसा योग्य शब्द नाही. काही आजार हे विशिष्ट अवयवांपुरते मर्यादित आजार असतात. त्याला स्थानिक आजार असेही म्हटले जाते, जसे दात दुखणे, गळू होणे इत्यादी. काही आजार हे शरीरातील संस्थेशी निगडित असतात, जसे की पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था इत्यादी. काही आजार हे शरीरातील अनेक संस्थांशी संबंधित असतात. उदारहणार्थ मधुमेह. मधुमेहाचा परिणाम हृदयावर, हाडांवर आणि त्वचेवरही होतो. अशा आजारांना ‘मल्टीसिस्टम इलनेस’ म्हटले जाते.

बहुतांश वेळा मल्टीसिस्टम आजारांमध्ये हार्मोन्स हा महत्त्वाचा घटक असतो. हार्मोन्सचा अभ्यास करणाऱ्या शाखेला इन्डोक्रायनोलॉजी असे म्हणतात. मल्टीसिस्टम आजारांमध्ये मुख्य केंद्रिबदू मेंदू (इंटरफेस) असतो. सर्व प्रकारच्या मल्टिसिस्टम आजारांमध्ये मग मधुमेह असो की उच्च रक्तदाब मेंदूचा सहभाग असतो. त्यामुळे या आजारांचे दुष्परिणाम मेंदूवरही दिसायला लागतात. जसे की मूत्रिपड निकामी झाल्यावर नैराश्य येते. बद्धकोष्ठता त्रास जास्त असल्यास मन अस्वस्थ असते. अनियंत्रित मधुमेहामुळे कालांतराने स्मृतीभ्रंश होतो, असे डॉ. देशपांडे यांनी स्पष्ट केले.

ताणतणावामुळे शरीरावर काय परिणाम होतात याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, मेंदूवर ताणतणाव निर्माण झाल्यास विविध प्रकारची रसायने स्रवली जातात. ही रसायने रक्ताभिसरणातून शरीरात पसरतात. शरीरात जिथे आरोग्यसंस्था कमकुवत आहे तिथे ही रसायने त्या संस्था आणखी कमकुवत करण्यास मदत करतात. ताणतणावाचे रसायनशास्त्र सध्या पूर्णपणे अजूनही उलगडलेले नाही. त्यामुळे ही रसायने शरीरात शोधण्यात यश मिळालेले नाही. परंतु ताणतणावामुळे शरीरावर परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनात्मक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. 

मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब यांचे प्रमाण जास्त असते. त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. सर्वसामान्य माणसापेक्षा सरासरी त्यांचे आयुर्मान पाच ते सात वर्षांनी कमी असते. मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या शरीरावर दुष्परिणाम वेगाने होतात, हे जगभरात आढळले आहे. जनुकीय अभ्यासामध्ये, मल्टीसिस्टम आजार असलेल्या रुग्णांमध्ये मानसिक आजार असण्याची शक्यता जास्त असते, संशोधनातून हेदेखील निष्पन्न झाले आहे, असेही पुढे डॉ. देशपांडे सांगतात.

मधुमेह आणि मानसिक आजार

मानसिक आजार आणि मधुमेह यांचा दुहेरी संबंध आहे. ज्यांना गंभीर मानसिक आजार असतात किंबहुना त्यांना दिलेल्या औषधांमुळे इन्सुलिनला प्रतिरोध, चरबी, वजन वाढणे आणि मधुमेह होण्याची शक्यता वाढते. काही वेळा व्यक्तींमध्ये चरबी वाढलेली असते अशा रुग्णांमध्ये मानसिक आजारांच्या औषधांमुळे चरबी जास्त वाढते आणि पूर्वस्थितीतील मधुमेहाचे रूपांतरण मधुमेहाच्या टप्प्यापर्यत पोहोचते.

याबाबत अधिक सविस्तर मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी सांगतात, मधुमेहाचे चार प्रकार असतात. एक ज्यामध्ये शरीरात इन्सुलिनची निर्मिती होत नसल्यामुळे आयुष्यभर इन्सुलिन द्यावे लागते. दुसरा प्रकार म्हणजे स्थूलपणा किंवा इतर प्रकृतीच्या तक्रारींमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढत राहाते. तिसऱ्या प्रकारचा मधुमेह गर्भारपणात होतो आणि प्रसूतीनंतर तो निघूनही जातो. चौथा प्रकार म्हणजे मधुमेह होण्याची पूर्वस्थिती.

या प्रत्येक प्रकारच्या मधुमेहामध्ये ताणतणाव, अस्वस्थता याचा खूप मोठा हातभार असतो. मानसिक तणाव वाढल्यास रुग्णाच्या शरीरात साखरेवरील नियंत्रण सुटते. नैराश्य असलेल्या व्यक्तींचा ताणतणाव कमी करण्यासाठी खाण्यापिण्यावर भडिमार असतो. याला रेकलेस इंटिग बिहेविअर असे म्हटले जाते. त्यातून वाढणारे वजन, त्यामुळे होणार मधुमेह किंवा उच्च रक्तदाब किंवा मेटाबॉलिक सिन्ड्रोम याचा संबंध असतो. साखरेची पातळी जेव्हा खूप वर खाली होते. तेव्हा त्याचा थेट परिणाम चिडचिडेपणावर होतो. त्याच्यामुळे साखरेच्या नियंत्रणामध्ये मानसिक संतुलन ठेवणे, हसत खेळत राहणे गरजेचे आहे, असेही डॉ. जोशी स्पष्ट करतात.

डॉ. जोशी आणखी एक महत्त्वाची बाब सांगतात ती म्हणजे नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार आनंदी, हसत खेळत असणाऱ्या व्यक्तींमध्ये दुसऱ्या प्रकारचा मधुमेहाच्या तक्रारी नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. मानसिक आरोग्याचा संबंध मधुमेहाशी असल्याचे या अभ्यासात स्पष्ट आढळले आहे. मधुमेहाचे रुग्ण खूप आनंदी राहिले तर त्यांच्या मधुमेहावर मात होण्याची शक्यता वाढते हे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.

मनोरुग्णांमध्ये औषधांमुळे मधुमेह होण्याचा धोका जास्त असल्यामुळे या रुग्णांच्या साखर, उच्च रक्तदाब, वजन याच्या तपासण्या वेळच्यावेळी होणे गरजेचे असते. तसेच त्यानुसार औषधांमध्येही बदल करणे आवश्यक असते, असे डॉ. जोशी सांगतात.

shailaja.tiwale@expressindia.com

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship between physical and mental illness zws
First published on: 29-06-2022 at 00:04 IST