रिलायन्सने ई-फार्मसी कंपनी Netmeds मध्ये खरेदी केला मोठा हिस्सा, जाणून घ्या कितीमध्ये झाला करार?

‘नेटमेड्स’ ऑनलाइन माध्यमातून ग्राहकांना औषध विक्रेत्यांशी जोडते, याशिवाय औषधांची घरपोच डिलिव्हरी करते

(मुकेश अंबानी यांचं संग्रहित छायाचित्र- Reuters )

रिलायन्स इंडस्ट्रीजने मंगळवारी(दि.18) आपली सहायक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या (आरआरव्हीएल) माध्यमातून Vitalic Health Pvt. Ltd  आणि तिची सहायक ऑनलाइन फार्मसी कंपनी Netmeds मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जवळपास 620 कोटी रुपयांमध्ये हा करार झाला असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने Vitalic च्या इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये 60 टक्के हिस्सा आणि या कंपनीच्या सहायक कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड , नेटमेड्स मार्केट प्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रीब्यूशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 100 टक्के डायरेक्ट इक्विटीची मालकी खरेदी केली आहे.

“ही गुंतवणूक भारतात सर्वांना डिजिटल सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून झालेली आहे. ग्राहकांपर्यंत आरोग्यासंबंधी उत्पादन आणि सेवा स्वस्त दरात पोहोचवण्यामध्ये नेटमिड्सची मोठी मदत होईल” असे याबाबत आरआरव्हीएलच्या संचालक ईशा अंबानी यांनी म्हटले. “ग्राहकांच्या दररोजच्या गरजा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्यपणे विस्तार केला जाईल. कमी कालावधीत नेटमिड्सने ऑनलाइन व्यवसायाचा विस्तार केल्यामुळे आम्ही प्रभावित झालो आहोत. या गुंतवणूक आणि भागीदारीमुळे व्यवसायात अजून वाढ आणि तेजी येईल असा विश्वास आहे”, असेही त्या म्हणाल्या.

डिजिटल फार्मामध्ये नेटमेड्सचं मोठं नाव –
विटालिक आणि तिच्या सहायक कंपन्या फार्मा डिस्ट्रीब्यूशन, सेल्स आणि बिजनेस सपोर्ट सर्व्हिसच्या व्यवसायात आहेत. 2015 पासून या कंपन्या काम करत असून याच कंपन्यांमध्ये Netmeds चा समावेश आहे. नेटमेड्स ऑनलाइन माध्यमातून ग्राहकांना औषध विक्रेत्यांशी जोडते, याशिवाय औषधांची घरपोच डिलिव्हरी करते. “रिलायन्सच्या डिजिटल, रिटेल आणि टेक प्लॅटफॉर्ममुळे आम्ही अजून सक्षम होऊ, या करारानंतर सेवा अजून दर्जेदार करण्याचा प्रयत्न असेल”, असे नेटमेड्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप दाधा म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reliance industries acquires majority stake in online pharmacy netmeds check details sas