दोन वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांनी जिओ लाँच करून टेलिकॉम सेक्टरमध्ये हाहाकार माजवला होता. कॉलिंगसाठी पैसे देणं ही संकल्पना बंद करून मोफत कॉलिंगची संकल्पना त्यांनी सुरू केली. तसंच त्यावेळी त्यांनी आयुष्यभरासाठी मोफत कॉलिंग देणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु ९ ऑक्टोबर रोजी रिलायन्स जिओने एक पत्रक काढून मोफत कॉलिंग बंद करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर जिओच्या ग्राहकांनी त्यावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर #BoycottJio हा हॅशटॅग सुरू केला आहे.

रिलायन्स जिओच्या बाजारातील एन्ट्रीनंतर अन्य टेलिकॉम कंपन्यांचेही धाबे दणाणले होते. त्यानंतर काही कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला होता, तर मोठ्या कंपन्यांनी आपले टॅरिफ कमी केले होते. परंतु बुधवारी जिओने पत्रक काढून आता प्रत्येक कॉलसाठी मिनिटाला ६ पैसे मोजावे लागणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता ग्राहकांनी बॉयकॉट जिओ मोहीम सुरू केली आहे. आययूसी चार्जेसमुळे कंपनीला तब्बस १३ हजार ५०० कोटी रूपये भरावे लागले असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

आजपासून (१० ऑक्टोबर) जिओचं नवं रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आपल्या मुख्य रिचार्जसोबतच १०, २०, ५० आणि १०० रूपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनुक्रमे १२४, २४९, ६५६ आणि १,३६२ मिनिटांचा टॉकटाईम मिळणार आहे. तसंच प्रत्येक रिचार्जमध्ये ग्राहकांना अतिरिक्त डेटादेण्यात येणार आहे. जिओच्या या निर्णयामुळे आता अन्य कंपन्यांनाही टॅरिफ वाढवण्याची संधी मिळाली आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियासारख्या कंपन्यांनाही आता यामुळे आपले टॅरिफ वाढवता येतील आणि फ्री व्हॉईस टॅरिफ पूर्णपणे संपून जाईल, असं मत एसबीआय कॅप सिक्युरिटीचे रिसर्च हेड राजीव शर्मा यांनी व्यक्त केलं. जिओच्या या निर्णयानंतर अनेक ग्राहकांनी आता जिओ सोडून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सेवा घ्यावी लागणार असल्याचं म्हटलं आहे.