How To Clean Tartar Plaque From Teeth: तुम्हाला वारंवार दात किडणे, हिरड्यांमधून रक्त येणे, गरम किंवा थंड काही खाल्ल्यानंतर दात दुखणे आणि दररोज सकाळी दुर्गंधी अशा अेक समस्या उद्भवतात का? अशा समस्या असतील तर तुमच्या दातांवर टार्टर किंवा प्लेक जमा झाला आहे किंवा तुमच्या दातांमधील फटीमुळे हा त्रास असू शकतो. अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा एखाद्याला दातांची समस्या येते तेव्हा ते लगेच महागडे टुथपेस्ट, माउथ जेल, डेंटल क्लिनिंग आणि इतर उपचार घेतात. त्यावर हजारो रूपये खर्चही करतात. सुरूवातीला या सर्व उपचारांनी आराम मिळतो, मात्र काही काळानंतर या समस्या पुन्हा उद्भवतात.

डॉ. सलीम झैदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाताच्या आणि हिरड्यांच्या या समस्यांसाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय देखील वापरू शकता. असे काही घटक आहेत जे तुमच्या दातांना फक्त ३० ते ४० सेकंदांसाठी लावल्यास हळूहळू अनेक त्रासांपासून आराम मिळू शकतो.

दातांच्या समस्यांमागचे खरे कारण

Award Banner

दातांच्या आणि हिरड्यांच्या समस्यांचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे उपाय दातांच्या समस्येचे मूळ नष्ट करत नाहीत. ते केवळ तात्पुरता आधार देतात. मात्र मूळ कारणाकडे लक्ष देत नाहीत. तोंड हे मुळातच बॅक्टेरियांची वसाहत असते. त्यामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. जेव्हा या बॅक्टेरियांचे संतुलन बिघडते तेव्हा पोकळी तयार होते, हिरड्या फुगतात आणि रक्तस्त्राव होतो, दातांची संवेदनशीलता वाढते आणि तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.

दात किडतात म्हणजे नेमकं काय होतं?

डॉक्टरांच्या मते, लोक अनेकदा म्हणतात की त्यांना पोकळी आहे. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही पोकळी नसते. जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा काही विशिष्ट जीवाणू साखरेचे आम्लात रूपांतर करतात. हे आम्ल हळूहळू दातांवरील मुलामा विरघळवते, त्यामुळे एक पोकळी तयार होते. तसंच हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे आणि तोंडाची दुर्गंधी येणे हे देखील बॅक्टेरिया आणि जळजळीमुळे होते.

त्रिफळाचा माउथवॉश हा बेस्ट पर्याय

त्रिफळा पावडरपासून बनवलेला आयुर्वेदिक माउथवॉश हा सर्व दंत समस्यांवर एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. त्रिफळा हे तीन औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे. आवळा, हरिताकी आणि विभीताकी. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक, दाहक विरोधी, अँटीऑक्सिंडंट आणि उपचारात्मक गुणधर्म आहेत. ते तोंडाच्या आणि दंत आरोग्यासाठी खूप फायदेशीन मानले जातात.

त्रिफळा माउथवॉश कसे काम करते?

त्रिफळा तोंडात हानिकारक जीवाणूंची वाढ रोखण्यास मदत करते. ते प्लेक जमा होण्यास प्रतिबंध करते, पोकळी रोखते, हिरड्यांची जळजळ आणि रक्तस्त्राव कमी करते आणि तोंडाची दुर्गंधी कमी करते. आवळ्यातील व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे हिरड्यांना मजबूत करतात आणि त्यांना बरे होण्यास मदत करतात.

कसा बनवायचा त्रिफळा माउथवॉश?

त्रिफळा माउथवॉश बनवण्यासाठी अर्धा चमचा त्रिफळा पावडर २०० मिली पाण्यात घाला. हे पाणी मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करा. पाणी कोमट झाल्यावर ते गाळून घ्या. पावडर जास्त पिळून घेऊ नका. त्यामुळे त्याचे बारीक कण पाण्यात जाणार नाहीत.

त्रिफळा माउथवॉश वापरण्याची पद्धत

एका ग्लासमध्ये हे पाणी भरा आणि तोंडात एक घोट घेऊन ३० ते ४० सेकंद तोंडात फिरवा आणि नंतर ते थुकून टाका. अशा प्रकारे एक ग्लास पाण्याने हीच क्रिया करा. हिरड्यांमधील रक्तस्त्राव, तोंडाची दुर्गंधी किंवा पोकळी येत असेल तर दिवसातून दोनदा ते वापरा. या समस्या दूर झाल्यानंतर केवळ स्वच्छतेसाठी म्हणून दिवसातून एकदा या पाण्याचा वापर करा.