मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सने डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याचं जाहीर केल्यानंतर आता Renault कंपनीनेही डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे. भारतात १ एप्रिल २०२० पासून इंधनासाठी ‘भारत स्टेज ६’ (बीएस ६) प्रदूषण मानके लागू झाल्यानंतर डिझेल कारचं उत्पादन बंद केलं जाईल, असं फ्रांसच्या Renault कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. तसंच, यानंतर कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर भर देणार असून भारतातच इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाईल असं स्पष्ट केलंय.
‘जगभरात डिझेल गाड्यांच्या मागणीत आणि विक्रीमध्ये घट झाल्याचं निदर्शनास आलं आहे, विक्रीत झालेली घट मोठ्या प्रमाणात आहे पण अचानक नाही. त्यातच भारतात १ एप्रिल २०२० पासून इंधनासाठी ‘भारत स्टेज ६’ (बीएस ६) मानके लागू होत आहेत, त्यामुळे ‘भारत स्टेज ६’ मानके लागू झाल्यानंतर डिझेल गाड्यांचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कंपनीचे ग्लोबल सीईओ थिएरी बोलोर यांनी दिली.
२००० सीसीच्या पुढील इंजिने असलेल्या डिझेल मोटारी व एसयूव्ही यांच्या नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणाच्या कारणास्तव बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने बीएस ६ मानके लवकर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने आता इंधनासाठी भारत स्टेज ६ (बीएस ६) मानके १ एप्रिल २०२० पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात भारत स्टेज ५ हा मानकांचा टप्पा टाळून थेट सहावा टप्पा अमलात आणण्याचे ठरवले आहे.
बीएस-६ मानक लागू झाल्यानंतर डिझेलच्या छोट्या तसेच मध्यम कार महाग होतील, त्यामुळेच कार निर्मात्या कंपन्या डिझेल गाड्यांचं उत्पादन बंद करत आहेत.