रेनो कायगर सुखद अनुभव

‘रेनो इंडिया’ने नुकतीच ‘बी एसयूव्ही’ या प्रकारातील ‘कायगर’ ही कार बाजारात आणली असून तिला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

‘रेनो इंडिया’ने नुकतीच ‘बी एसयूव्ही’ या प्रकारातील ‘कायगर’ ही कार बाजारात आणली असून तिला ग्राहकांची पसंती मिळत आहे. ही कार छोटी आहे पण भरपूर जागा देण्याचा प्रयत्न केला आहे. वैशिष्टय़पूर्ण कार असून आधुनिकतेचा अनुभव देते. लहान कुटुंबासाठी व बजेट कार म्हणून हा पर्याय निवडता येऊ शकतो. काही त्रुटी नक्कीच आहेत, पण किमतीचा विचार करता त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकते.

बापू बैलकर

एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) हा अलीकडे कारप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय झाला आहे. मात्र ज्यांना एसयूव्ही कार खरेदी करायची आहे, पण बजेट नाही अशांसाठी अलीकडे अनेक कार निर्मात्यांनी ‘बी एसयूव्ही’ या प्रकारातील दहा लाखांपेक्षा कमी किमतींतील कार बाजारात आणल्या आहेत. त्यांनाही ग्राहकांनी पसंती दिल्यामुळे ‘बी’ एसयूव्हींमध्ये आता किमतीची स्पर्धा निर्माण झाली आहे. अलीकडे निसानने त्यांची मॅग्नाईट ही ‘बी एसयूव्ही’ या ५ लाख ५९ हजारांची सुरुवातीची किंमत असून या कारची विक्रमी विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यानंतर अनेक कार निर्माते असे पर्याय देत असून रेनो इंडियानेही त्यांची ‘कायगर’ ही ‘बी एसयूव्ही’ बाजारात आणली आहे. मॅग्नाईटबरोबर कायगरची मोठी चर्चा होत असून ही कार चालविण्याचा नुकताच अनुभव घेतला.

‘कायगर’ मॅन्युअल कार शहरांतर्गत रस्ते, महामार्ग, द्रुतगती महामार्ग, खराब रस्ते तसेच खराब घाटरस्त्यांवरही चालवली.

अनुभव लिहिण्यापूर्वी या कारची किंमत सर्वाना अवगत हवी. कार एक्स शोरूम किंमत ५ लाख ४५ हजारांपासून सुरू होत असून सीव्हीटी (टॉप मॉडेल) ९.५५ लाखांपर्यंत आहे.

कायगर पहिल्यांदा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा थोडी निराशा होते. गाडी सुरू करण्यापूर्वीच चालक सुरक्षापट्टा लावताना अडचण निर्माण होते. चालू गाडीत तर ते अशक्यच होते. गाडी सुरू केल्यानंतर मॅन्युअल कारसाठी अत्यंत महत्त्वाचे असते ते क्लचपॅड. ते जास्त दाबावे लागते व पटकन सुटते. त्यामुळे किंचितसा धक्का बसल्याचा अनुभव मिळतो.. पण कार काही किलोमीटर चालवल्यानंतर ते सवयीचे होते. त्यामुळे ही समस्या म्हणता येणार नाही पण यात सुधारणा नक्कीच करता येऊ शकते.

तीन ड्राईव्ह मोड (इको, स्पोर्ट व नॉर्मल) दिले आहेत. पण ही कार कोणत्याही रस्त्यावर चालविताना फक्त नॉर्मल मोडचाच चांगला अनुभव मिळतो. स्पोर्ट मोडवर शक्ती जास्त मिळते, मात्र गाडी जड झाल्याचा अनुभव येतो, तर इको मोडवर गाडी चालवण्याचा अजिबात चांगला अनुभव मिळत नाही. कारचे जमिनीपासूनचे अंतर २०५ मिलिमीटर दिले असून व्हीलबेस २५०० मिलीमीटर असल्याने कुठेही अडथळा जाणवत नाही. अगदी खडतररस्त्यांवरही गाडी सहज चालत राहते.

या कारमध्ये तीन सिलिंडर असलेले १.० एल टबरेचाज्र्ड इंजिन दिले १६० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर कार कितीही गतीने ती सहज चालत राहते.

दृश्यमानताही चांगली आहे. चालकाच्या व सहप्रवाशाच्या बाजूच्या आरशातून मागील येणाऱ्या वाहनांचा व्यवस्थित आंदाज येतो. तर पुढील वाहनांचा अपेक्षित वेग व मार्गिका बदलताना सहज लक्षात येते. वळण घेतानाही कुठे अडचण निर्माण होत नाही. कारचे सुकाणू अगदी सहज हाताळता येते. त्यामुळे छोटय़ा वळणदार रस्त्यांवर कार रस्ता सोडत नाही.

आसनक्षमता ठीकठाक आहे. पाच प्रवाशांना कारमध्ये कसलीही अडचण होत नाही. चालक व सहप्रवासी आसनाचा दर्जाही बरा आहे. मागील आसनांवर तीन प्रवासी बसू शकतात. त्यात दोन अधिक एक लहान मूल असेल तरी कसलीच अडचण नाही. पाय अगदी सहज पसरून बसता येते व उंचीचीही अडचण नाही.

एकूणच ही कार दिसायला चांगली आहे. छोटी असली तरी कारमध्ये जागा जास्त देण्यात आली आहे. वेग व शक्तीत कुठे अडथळा

निर्माण होत नाही. कोणत्याही रस्त्यांवर सहज चालविण्याचा अनुभव मिळतो व सुविधांच्या तुलनेत परवडणारी कार आहे. सुरक्षेसाठी चार एअरबॅग्ज दिल्या आहेत. त्यामुळे छोटय़ा कुटुंबासाठी सुविधा असलेली ही कार एक चांगला पर्याय होऊ शकते.

इंधन परवडते?

पेट्रोलने शंभरी पार केल्याने सध्या कार खरेदी करताना मोठा प्रश्न आहे तो इंधनक्षमता. कार इंधनदृष्टय़ा परवडणारी आहे का? हा प्रश्न आहेच. ही कार पेट्रोलवर असल्याने हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. पण आलेल्या अनुभवनातून ही कार प्रतिलिटर ११ ते १५ किलोमीटर दरम्यान अ‍ॅव्हरेज दिल्याचा अनुभव आला. मात्र कार जास्त वेळ नॉर्मल व स्पोर्ट मोडवर चालविल्याने थोडे कमी अ‍ॅव्हरेज मिळाले. मात्र  ही कार सरासरी ३० ते ४० चा वेग असेल तर प्रतिलिटर १५ किलोमीटर व १०० चा वेग असेल तर प्रतिलिटर १८ ते १९ किलोमीटर आणि ८० चा वेग कायम ठेवत चालविल्यास अगदी २० किलोमीटपर्यंत अ‍ॅव्हरेज देते असा चांगल्या चालकांचा अनुभव आहे.

रेनो कायगरच्या पुढील दोन आसने तसेच मागील आसनांसाठी थ्री-पॉइंट सीटबेल्ट बसवलेला आहे. तर मागे बसलेल्या मधल्या प्रवाशाकरिता टू- पॉइंट सीटबेल्टची व्यवस्था आहे. तसेच ड्रायव्हरसाठी टू साईड एअरबॅग समवेत दोन फ्रंट एअरबॅग देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त सुरक्षेसाठी दोन्ही पुढील आसनांना सुरक्षा पट्टा अलर्टची सुविधा दिली आहे. पार्किंग सेन्सरही देण्यात आले आहेत.

बाजारात नवीन काय?

टाटा मोटर्सने बुधवारी नवीन टियागो एनआरजी ही कार बाजारात आणली.  ‘अर्बन टफरोडर’ म्हणून दर्जा असलेली टियागो एनआरजीची आकर्षकता वाढवण्यात आली आहे. तसेच एसयूव्हीला साजेसे डिझाइन कारला देण्यात आले आहे.  उच्च ग्राऊण्ड क्लिअरन्स देण्यात आले आहे. चार तारांकित सुरक्षा मानांकन मिळालेली ही कार फोरेस्टा ग्रीन, फायर रेड, स्नो व्हाइट, क्लाउडी ग्रे या ४  रंगांमध्ये उपलब्ध  करून देण्यात आली आहे.  शोरूममध्ये ६.५७ लाख रुपये किंमत आहे. त्याशिवाय पुश स्टार्ट बटण, रिअर  पार्किंग कॅमेरा, बाहेरून टणक बॉडी, चारकोल काळे इंटिरिअर अशी अनेक वैशिष्टय़े या कारमध्ये आहेत. सर्वसाधारणपणे आजच्या तरुणाईला आवडेल अशा प्रकारचा लूक कारला देण्यात आला आहे तसेच इंटिरीअर आणि एक्स्टीरिअरमध्ये थोडा डिझायनर लूक  अशी या कारची वैशिष्टय़े आहेत.

टीव्हीएस आयक्यूब विद्युत स्कूटर

टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस ‘आयक्यूब ’ ही विद्युत स्कूटर सादर केली आहे. ही प्रदूषणविरहित, अत्याधुनिक टीव्हीएस स्मार्टक्सोनेक्ट आणि प्रगत  ड्राइव्ह ट्रेन सुविधा यांनी युक्त स्कूटर आहे.

कोणत्याही प्रकारे वायू उत्सर्जन न करणारी आणि उच्च क्षमतेची ४.४ किलोवॅटची विद्युत मोटर आहे. ताशी ७८ किलोमीटर हा या स्कूटरचा जास्तीत जास्त वेग आहे आणि संपूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर ७५ किलोमीटर अंतर पार करते. ही स्कूटर ४.२ सेकंदांत ० ते ४० किमीचा वेग घेते. जनरेटिव्ह ब्रेकिंग, दिशादर्शक सहायक, रिमोट चार्ज स्टेटस, बॅटरी चार्ज स्टेटस अशा सुविधा या विद्युत  स्कूटरमध्ये देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

चमकदार पांढऱ्या रंगात उपलब्ध असलेल्या या स्कूटरमध्ये स्वच्छ सुस्पष्ट एलईडी हेडलॅम्प्स, सगळे एलईडी टेल लॅम्प्स आणि चमकणारा लोगो आहे. ऑन रोड किंमत १,१०,८९८ रुपये इतकी आहे.

चार्जिगसाठीच्या वेगवेगळ्या पर्यायांसह टीव्हीएस मोटर कंपनी ग्राहकांना समग्र चार्जिग सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. स्मार्ट एक्स होम

सुविधेमध्ये ग्राहकांना

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, लाइव्ह चार्जिग स्टेट्स (चार्जिग किती झाले याची माहिती) आणि आरएफआयडी सुरक्षा याद्वारे घरी चार्जिग सुविधा उपलब्ध होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Reno india luxury cars bxuv car sports utility vehicle ssh

ताज्या बातम्या