Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी पाल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची अशी तयारी करून घ्या, वाचा सविस्तर

२६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

Republic_Day

२६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली होती. तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचं औचित्य साधत शाळा आणि महाविद्याल्यात भाषणं, निबंध स्पर्धा आणि वादविवाद कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या दिवशी विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनाचं संकट असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाइन शाळा आणि महाविद्यालयं सुरु आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी ऑफलाइन शाळा महाविद्यालयं सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मोजक्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थित हा दिन साजरा केला जाणार आहे. यासाठी विद्यार्थी आपल्या भाषणांची तयारी करत आहेत. काही विद्यार्थी ऑफलाइन, तर काही विद्यार्थी ऑनलाइन भाषण देण्यासाठी सज्ज आहेत.

भाषण करताना आत्मविश्वासाबरोबर विषयाची निवडही तितकीच महत्वाची आहे. विषय निवडल्यानंतर आपल्या पाल्याचं वय पाहता छोटी वाक्यरचना आणि सोप्या शब्दांची निवड करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी कठीण शब्दांमुळे अडखळतात. त्यामुळे रोजच्या वापरातील शब्द असतील तर भाषण करणं सोपं होतं. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने श्रोत्यांशी संवाद साधता येतो. त्याचबरोबर ऑनलाइन भाषण करताना कॅमेरा आणि पुरेसा प्रकाश यासह ऑडिओ व्यवस्थित तपासून घेणं गरजेचं आहे. अनेकदा इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने ब्लर दिसतं आणि आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या सर्व बाबी तपासून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाशी निगडीत विषय असायला हवेत.

  • प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि महत्त्व
  • भारतीय संविधानाचा इतिहास
  • तिरंग्याचा इतिहास
  • “जन गण मन…” राष्ट्रगीताची माहिती

भाषण १
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक , वंदनीय शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो! आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मला बोलण्याची मोठी संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यानंतर आपलं नाव आणि विषय सांगून भाषणाला सुरुवात करावी.

आपल्या देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण आज येथे जमलो आहोत. प्रजासत्ताक दिनी भाषण करण्याचा मला सन्मान वाटतो. आपल्या देशात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जातो. १९५० मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे आपणा सर्वांना माहीत आहे, पण देशाला स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते. या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाची राज्यघटना लागू झाली. भारत हा एक लोकशाही देश आहे जिथे देशाचे नेतृत्व करण्यासाठी लोक त्यांच्या नेत्याची निवड करतात. डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. १९४७ मध्ये आपण ब्रिटीशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविल्यापासून आपल्या देशात बरीच प्रगती झाली आहे आणि आपला देश शक्तिशाली देशांमध्ये गणला जात आहे.
आज या संविधानामुळे आपला देश पूर्ण प्रजासत्ताक आहे. लोकशाही देशात राहणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. खऱ्या देशभक्ताप्रमाणे देशाला योगदान देत राहाणं आवश्यक आहे. इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो, धन्यवाद! जय हिंद.

भाषण २
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक , वंदनीय शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो! आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपण आपल्या राष्ट्राच्या अतिशय खास प्रसंगी येथे जमलो आहोत. आज प्रजासत्ताक दिन आहे. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं. तर २६ जानेवारी १९५० मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि ‘पूर्ण स्वराज्य’ मिळाले. २६ जानेवारी हा दिवस आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जाहीर केली. त्यानंतर १९५० मध्ये याच दिवशी भारत प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला.

प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांमध्ये आनंद, उल्लास आणि नवीन विचारांचा प्रेरणा देणारा असतो. भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या देशाबद्दल आपल्याला आदर आहे. आपण यासाठी सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बातम्या वाचल्या पाहिजेत आणि देशात घडणाऱ्या घटना, काय योग्य व अयोग्य घडत आहे, आपले नेते काय करीत आहेत याची माहिती असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण आपल्या देशाचं देणं आहोत ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी, गौरवासाठी आणि उन्नतीसाठी सदैव समर्पित राहू, असा संकल्प केला पाहीजे. धन्यवाद जय हिंद!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Republic day 2022 marathi speech preparation tips online offline for student rmt

Next Story
चेहऱ्याचे सौंदर्य हिरावून घेऊ शकतात स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले, तुम्हीही वापरता का? जाणून घ्या
फोटो गॅलरी